Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०२ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये शंभर टक्के
पावसाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज
** विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिंलेडरच्या दरात ६२ रुपये ५०
पैशांनी घट
** भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेला प्रारंभ; अन्य पक्ष
नेत्यांना आता भारतीय जनता पक्षात प्रवेश नाहीः मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
** विधान परीषदेच्या औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य मतदार संघ
निवडणुकीसाठी सात उमेदवारांचे अर्ज दाखल; आज छाननी
आणि
** औश्याचे माजी आमदार विधीज्ञ शिवशंकरअप्पा उटगे यांचं निधन
****
मान्सूनच्या उत्तरार्धात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांमध्ये देशाच्या
बहुतांश भागांमध्ये शंभर टक्के पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला
आहे. काल दिल्लीतून मान्सूनच्या उत्तरार्धाचा अंदाज जाहीर करण्यात आला. या अंदाजात
८ टक्के कमी अधिक तफावत होण्याची शक्यता असल्याचं विभागानं म्हटलं आहे. ऑगस्ट महिन्यात
९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता विभागानं व्यक्त केली आहे.
****
स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवर घट झाली असल्यानं
विनाअनुदानित एलपीजी सिंलेडरचे दर प्रति सिंलेडर ६२ रुपये ५० पैशांनी कमी झाले आहेत.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं काल ही घोषणा केली. त्यामुळे आता १४ किलो दोनशे ग्राम वजनाच्या
सिंलेडरची किंमत ५७४ रुपये ५० पैसे अशी झाली आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात या सिंलेडरच्या
दरात १०० रुपये ५० पैशांची कपात झाली होती, त्यामुळे या दोन महिन्यात विनाअनुदानित
एलपीजी सिंलेडरच्या दरात एकूण १६३ रुपयांची घट झाली असल्याचं, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या
निवेदनात म्हटलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या
महाजनादेश यात्रेला काल अमरावती जिल्ह्यातल्या मोझरी इथं केंद्रीय संरक्षण मंत्री
राजनाथ सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवला. या यात्रेच्यामाध्यमातून मुख्यमंत्री राज्यातल्या
बत्तीस जिल्ह्यांमधल्या दिडशे विधानसभा क्षेत्रातून
जवळपास साडे चार हजार किलोमीटरचा प्रवास करणार
आहेत.राज्यातला दुष्काळ संपवण्यासाठी ही महाजनादेश यात्रा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी बोलतांना सांगितलं. यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि संरक्षणमंत्री
राजनाथसिंह यांनी गुरूकुंज मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळी
जाऊन अभिवादन केलं. अन्य पक्षातून येणाऱ्या नेत्यांना आता भारतीय जनता पक्षामध्ये
प्रवेश दिला जाणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलतांना सांगितलं.
****
विधानपरिषदेच्या औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या
निवडणुकीसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
होता. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार अंबादास दानवे, कॉग्रेस-राष्ट्रवादी
काँग्रेस युतीकडून भवानीदास कुलकर्णी, शिवराज्य बहुजन पक्षाचे विशाल नांदरकर तर माजी
नगरसेवक शाहनवाज खान, अब्दुल जावेद अब्दुल वाहेद, नंदकिशोर सहारे यांनी अपक्ष उमेदवारी
अर्ज दाखल केले आहेत. आज सकाळी ११ वाजता या अर्जांची छाननी केली जाईल. पाच ऑगस्टपर्यंत
उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून १९ ऑगस्टला मतदान होईल.
****
मातंग समाजासाठी राज्य सरकारनं पंचवीस हजार घरं दिली असून आणखी
पंचवीस हजार घरं लवकरच देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
केली आहे. ते काल मुंबईत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी
वर्षानिमित्त त्यांच्यावरील टपाल तिकीट प्रकाशन समारंभात बोलत होते. राज्य सरकार मातंग
समाजाला एक लाख घरं देणार असल्याच्या घोषणेचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वंचितांसाठीच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत
पोहोचवून त्यांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी
सांगितलं.
लातूर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला आमदार अमित
देशमुख, महापौर सुरेश पवार यांच्यासह सार्वजनिक जंयती उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यानी
पुष्पहार घालुन अभिवादन केलं. औरंगाबाद शहरातही विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह
मान्यवरांनी साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. जालना इथं
राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी साठे यांच्या पुर्णाकृती
पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जयंती उत्सव समितीच्यावतीनं सकाळी शहरातून
दुचाकी फेरी काढण्यात आली. परभणी शहर आणि जिल्ह्यातल्या विविध शाळा महाविद्यालयं आणि
सामाजिक संघटनांच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
यांच्या पुण्यतिथिनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाले.
****
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमीत्त काल विधानभवनात
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांना अभिवादन केलं.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक ऑगस्ट १९२०
रोजी स्थापन झालेल्या औरंगाबाद शहरातल्या बलवंत वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवाला काल सुरवात झाली. यावेळी माजी न्यायमूर्ती नरेंद्र
चपळगावकर, सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाचकांची सभा
घेण्यात आली. बलवंत वाचनालय शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी शासनातर्फे दोन लाख रुपयांचं
अनुदान देण्याची घोषणा सहायक ग्रंथालय संचालक हुसे यांनी अध्यक्षीय भाषणात केली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा काल लातूर इथं
पोहोचली. लातूर इथं त्यांनी जनतेशी संवाद साधला. ते आज नांदेड इथं जनतेशी संवाद साधणार
आहेत. काल जिल्ह्यातल्या मुक्रामाबाद इथं ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
****
वयोमानानुसार उमेद राहिली नसल्यामुळे उस्मानाबाद इथं होणाऱ्या अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आपण होऊ इच्छित नसल्याचं प्रसिद्ध साहित्यिक
रा.रं. बोराडे यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणारे एक पत्रक त्यांनी
जारी केले आहे.
****
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण परिसरात काल
रात्री नऊ वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. तीन पूर्णांक एक रिस्टर
स्केल तीव्रतेचा हा धक्का होता.
****
लातूर जिल्ह्यातले औश्याचे माजी आमदार विधीज्ञ शिवशंकरअप्पा उटगे
यांचं काल निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. औसा नगर पालिकेचे नगराध्यक्ष, किल्लारी
सहकारी साखर कारखान्याचे संचालक, मनोरंजन क्लबचे संस्थापक अध्यक्ष, मुक्तेश्वर शिक्षण
प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशी विविध पदं त्यांनी भूषवली होती. मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक
मंडळाचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. आज सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर औसा
इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
प्रसिद्ध कवी गझलकार अनिल कांबळे यांचं काल पुण्यात निधन झालं.
ते ६६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून
आजारी असलेल्या कांबळे यांच्यावर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची
सहाशेहून अधिक गाणी स्वरबद्ध झाली आहेत. अनेक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात
आलेलं आहे.
****
राष्ट्रीय बाल हक्क आयोग आणि राज्य बाल हक्क आयोगाच्या वतीनं, लातूर
बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बाल हक्क उल्लंघनाच्या तक्रारींवर, येत्या नऊ ऑगस्ट
रोजी, उस्मानाबाद इथं सुनावणी घेतली जाणार आहे, असं जिल्हाधिकारी डॉक्टर दीपा मुधोळ
मुंडे यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण
घुगे यांच्यासह राष्ट्रीय आणि राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्यांसमोर ही सुनावणी घेतली
जाणार आहे. या सुनावणीसाठी तक्रारदारांनी जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी उस्मानाबाद
यांच्याकडे तक्रारी नोंदवण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मुधोळ - मुंडे यांनी केलं
आहे.
****
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या ज्ञानाचा
वापर करण्याची वृत्ती ठेवली तर सर्वसामान्यांची कामं मार्गी लावणं शक्य असल्याचं मत
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केलं आहे. महसूल दिनानिमित्त औरंगाबाद
जिल्हाधिकारी कार्यालयात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव आयुक्त
केंद्रेकर यांच्या हस्ते काल करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आपण लोकसेवक असल्याची
जाणीव दृढ करून सर्वांनी जनसामान्यांची काम प्राधान्यानं करावीत असं आवाहन त्यांनी
यावेळी केलं.
****
लातूर शहरातली मालमत्ता कर वसुली तात्काळ थांबवण्यासाठी नागरिक
हक्क कृती समितीनं काल महापालिका इमारतीच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.
पूर्वीप्रमाणेच कर स्वीकारावा तसंच व्याज, दंड आकारू नये अशी मागणी करणार निवेदन समितीनं
उपायुक्तांना दिलं.
दरम्यान, महापालिकेनं केलेली कर आकारणी योग्य असून नागरिकांनी थकबाकी
आणि चालू कर भरणा करून सहकार्य करण्याचं आवाहन लातूर महापालिकेनं केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी
आठ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरण क्षेत्रात ४० हजार दसलक्ष घनफूट प्रतिसेकंद क्षमतेनं
पाणी दाखल होत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या नागमठाण, गंगापूर, वलवडी, दारणा, पालखेड आणि
कडवा धरणातून हे पाणी येत आहे, असं जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता
राजेंद्र काळे यांनी सांगितलं.
****
निझामाबाद - पंढरपूर - निझामाबाद प्रवासी रेल्वेगाडी आजपासून २७
सप्टेंबर पर्यंत पूर्ववत करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे
मार्गाच्या दुरूस्तीच्या कामामुळे ही रेल्वे २७ सप्टेंबर पर्यंत रद्द करण्यात आली होती.
दरम्यान, पंढरपूर-निझामाबाद हि प्रवासी गाडी आज काही तांत्रिक कारणास्तव धावणार नसल्याचं
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागान कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment