Wednesday, 28 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑगस्ट २०१९ दुपारी .०० वा.
****

 राज्यात पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथकं आज दाखल होत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरूपुगझ यांच्या नेतृत्वाखालील सात जणांची ही पथकं पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करुन झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत. यंदाच्या भीषण पूरपरिस्थितीनंतर राज्य सरकारने सहा हजार ८१३ कोटी रुपये मदतीचा केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवला असून हा निधी मिळण्यापूर्वीच राज्याने मदतकार्याला सुरूवातही केली आहे आज केंद्रीय पथकाकडून या भागाची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती  मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे.
****

 जम्मू काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारं ३७०वं कलम रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे. पाच न्यायाधीशांचं संविधान पीठ या प्रकरणांची सुनावणी करणार आहे. न्यायालयानं केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर सरकारलाही यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी नोटीस जारी करण्याची गरज नाही, असा दावा महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी केला होता, तो देखील सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळून लावला आहे.
****

 जम्मू काश्मीर संदर्भात पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र संघात दाखल केलेल्या याचिकेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं नाव घेतल्या प्रकरणी, काँग्रेसनं पाकिस्तानवर टीका केली आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हा भारताचा अभिन्न भाग असून जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान हिंसा भडकावत असल्याचं, काँग्रेस पक्षानं म्हटलं आहे. काश्मीर मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून, त्यात बाहेरच्या कोणीही हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचं, राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
****

 सर्वोच्च न्यायालयानं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांना जम्मू काश्मीरचे त्यांच्या पक्षाचे माजी आमदार मोहम्मद युसुफ तरीगामी यांची भेट घेण्याची परवानगी दिली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, येचुरी यांना काश्मीर दौऱ्यात फक्त मोहम्मद युसुफ यांनाच भेटावं, या दौऱ्याचा राजकीय फायदा घेऊ नये, असं सांगितलं आहे. येचुरी हे जर राजकीय कार्यक्रमात सहभागी झाले, तर प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयाला माहिती द्यावी, अशी सूचनाही न्यायालयानं केली आहे.
****

देशाला पाच ट्रीलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा महत्त्वपूर्ण असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज पोलिस संशोधन आणि विकास विभाग - बीपीआरडीच्या ४९व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आतापर्यंत ३४ हजार पोलिसांपेक्षा जास्त पोलिसांनी बलिदान दिल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं. पोलिस सुधारणा ही मोठी आणि सातत्यपूर्ण प्रक्रिया असून, येणाऱ्या आव्हानांनुसार पोलिसांनी स्वत:मध्ये बदल केले पाहीजे, असंही गृहमंत्र्यांनी नमूद केलं. 
****
 चांद्रयान -२ चंद्राच्या कक्षेत अजून जवळ पोहोचलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोच्या संशोधकानी ही माहिती दिली. हा टप्पा १९ मिनिटांच्या कालावधीत चांद्रयानानं पूर्ण केला. या प्रयोगादरम्यान चंद्रयान -२ चे  चंद्रामधील कमीत कमी अंतर १७९ किलोमिटर आणि जास्तीत जास्त अंतर चौदाशे ४२ किलोमीटर होतं. पुढचा प्रयोग ३० ऑगस्टला होणार असल्याची माहिती इस्रोनं दिली आहे. 
****

 शताब्दी, तेजस तसंच गतिमान या रेल्वे गाड्यांच्या प्रवास भाड्यात रेल्वेनं पंचवीस टप्प्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे. अहमदाबाद मुंबई शताब्दी एक्सप्रेससह काही गाड्या मात्र सध्या सवलतीच्या दरात प्रवास उपलब्ध करून देत असल्यानं, या गाड्यांना ही सवलत लागू नसेल. अन्य गाड्यांना मूळ प्रवास भाडे, त्यावरचा वस्तू सेवा कर, आरक्षण शुल्क, यासह इतर अधिभारातही सवलत मिळणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बी. डब्ल्यू. एफ पॅरा बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत १२ पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. समस्त भारतीयांना या खेळाडूंचा अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे. या खेळाडूंचं यश प्रोत्साहन देणारं असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
*****
***

No comments: