Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -३१ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v सार्वजनिक क्षेत्रातल्या
दहा बँकांचं विलिनीकरण करण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा
v यंदाचा
दुष्काळ हा मराठवाड्यातला शेवटचा दुष्काळ ठरणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
v मुंबई लैंगिक अत्याचार
प्रकरणी विशेष तपास पथकामार्फत चौकशीची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
v दहावीच्या पुनर्परीक्षेत
सुमारे २३ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण
आणि
v बैलपोळ्याचा सण
सर्वत्र उत्साहात साजरा
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या
दहा बँकांचं विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी
काल नवी दिल्लीत केली. या निर्णयामुळे आता सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी बँकांची
संख्या २७ वरून १२ झाली आहे. या निर्णयानुसार कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचं विलिनीकरण
होणार आहे, अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेत विलिनीकरण होणार असून युनियन बँक, आंध्रा
बँक आणि कार्पोरशेन बँक या तीन बँकांचं विलिनीकरण होणार आहे. युनायटेड बँक आणि ओरिएंटल
बँक ऑफ कॉमर्स या दोन बँकांचं पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण होणार असल्याची माहिती सीतारामन
यांनी दिली. थकीत कर्जांचं प्रमाण आठ लाख ६५ हजार कोटींवरुन सात लाख ९० हजार कोटी रुपयांपर्यंत
कमी झाल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
****
यंदाचा दुष्काळ हा मराठवाड्यातला
शेवटचा दुष्काळ असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल हिंगोली
इथं, महाजनादेश यात्रेच्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या
गोरेगावला अतिरिक्त तालुक्याचा दर्जा दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली,
ते म्हणाले.....
गोरेगावला अतिरिक्त तालुका म्हणून
याठिकाणी मी घोषित करतो. आणि त्या ठिकाणी अतिरिक्त तहसिलदाराचं कार्यालय आणि सगळ्या
प्रकारची कार्यालय हे त्या गोरेगाव मध्ये येतील. म्हणजे उद्या ज्या दिवशी त्या तालुका
करायचा असेल, सगळी तयारी झालेली असेल, कार्यालयावरची पाटी फक्त बदलावी लागेल, अतिरिक्त
तालुक्याचा अतिरिक्त काढावा लागेल. आणि नुस्त तालुका ठेवावा लागेल. अश्या सगळ्या सोयी या ठिकाणी गोरेगाव मध्ये तुमच्या माध्यमातंन होतील.
हा विश्वास मी तुम्हाला देतो.
परभणी इथंही मुख्यमंत्र्यांनी
महाजनादेश यात्रेदरम्यान सभेला संबोधित केलं. गेल्या तीन-चार वर्षापासून अनियमित पावसामुळे
शेतकरी सातत्यानं संकटात सापडला असून, या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या
पाठीशी ठामपणे उभं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. मराठवाड्याचा सर्वांगीण विकास
करण्यासाठी रस्त्यांचं जाळं निर्माण करण्यात येणार असून, त्यापैकी बरीच कामं प्रगतीपथावर
असल्याचं मुख्यमंत्र्यांनी परभणी इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काल नांदेड इथं
पोहोचली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांच्यासह भोकर नगर
परिषदेतल्या पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत भारतीय जनता पक्षात काल
प्रवेश केला.
****
विरोधकांचं मनोबल खचलं
असल्याची टीका भारतीय रिपब्लीकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी
केली आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. युतीमध्ये मतभेद नाहीत परंतु जागा वाटपात अडचणी
आल्याच, तर युतीत प्रवेश केलेल्यांना रिपाईच्या कोट्यातून उमेदवारी देऊ असंही त्यांनी
नमूद केलं.
****
मुंबईतल्या लैंगिक
अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीनं खासदार
सुप्रिया सुळे, यांच्या नेतृत्वात काल मुंबईत निषेध मोर्चा काढला. गुन्हा होऊन महिनाभरानंतरही
आरोपी पकडले जात नाहीत, हे राज्य सरकारच्या गृहखात्याचं अपयश असल्याचं सांगतानाच, सुळे
यांनी हे निष्क्रीय सरकार कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याऐवजी यात्रा काढण्यात मग्न
असल्याची टीका केली. विशेष तपास पथकामार्फत या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी खासदार
सुळे यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल
घेतली आहे. या प्रकरणी आतापर्यंतच्या
तपासाचा अहवाल सादर करण्याच्या
आणि आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना आयोगाने मुंबई पोलिसांना
दिल्या आहेत. जालना इथल्या
तरुणीवर गेल्या सात जुलैला मुंबईत
चुनाभट्टी परिसरात सामुहिक
लैंगिक अत्याचार झाला होता, या तरुणीचा परवा औरंगाबाद इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
दहावीच्या
पुनर्परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. राज्यभरातून पुनर्परीक्षेला बसलेल्या दोन लाख
एकवीस हजार सहाशे एकोणतीस परीक्षार्थींपैकी २२ पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के म्हणजेच
पन्नास हजार सहाशे सदुसष्ट परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह
दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेले एक लाख अठरा हजार एकशे एकसष्ठ परीक्षार्थी ए टी के टी
सवलतीच्या माध्यमातून अकरावी प्रवेशासाठी पात्र आहेत. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी
आजपासून येत्या नऊ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
****
भ्रष्टाचारमुक्त, कर्जमुक्त,
प्रदुषणमुक्त, बेरोजगारमुक्त, नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी जनाआशीर्वाद यात्रा काढल्याचं,
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं जन आशीर्वाद यात्रेच्या
विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते. नागरिकांच्या विविध समस्यांसाठी शिवसेनेनं सत्तेत
असतांना सुध्दा विविध आंदोलनांच्या माध्यमातून संघर्ष केला, याकडे आदित्य ठाकरे यांनी
लक्ष वेधलं. ठाकरे यांच्या हस्ते १०० महिलांना शिलाई यंत्राचं वाटप करण्यात आलं. पैठण,
गंगापूर, वैजापूर आणि कन्नड तालुक्यांमध्येही ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला.
****
बैल पोळ्याचा सण
काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. गावोगावी शेतकऱ्यांनी बैलांना विविध आभुषणांनी
सजवून संध्याकाळी मिरवणूक काढली. वाशिम जिल्ह्यातल्या ढोरखेडा इथं महिलांच्या हाती
बैलांचा कासरा देण्याचा नवीन पायंडा सुरु करण्यात आला. नांदेड, परभणी, औरंगाबाद जिल्ह्यात
काही गावात पोळ्याच्या मुहूर्तावर पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.
दरम्यान, परभणी
जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या मौजे ब्राह्मणगाव इथं पोळ्यानिमित्त बैलांना स्वच्छ
करत असतांना बैलानं धडक दिल्यानं आसाराम राठोड या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात मोहगाव इथं बैलानं लाथ मारल्यामुळे
एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातल्या पिंपळगाव कड इथे बैल धुण्यासाठी
नदीवर गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
****
परभणी जिल्ह्यातल्या
परभणी आणि पूर्णा शहरात काल पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर परिसरात काल रात्री
सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाला, जालना जिल्ह्यातही जालना, बदनापूर, अंबड परिसरात
काल पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद
शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी तीन दिवस चाललेल्या प्रक्रियेत एकूण ४०२ विषय
शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली. उर्दू भाषा, सामाजिक शास्त्र, गणित, विज्ञान,
मराठी माध्यमासाठी सामाजिक शास्त्र, तसंच भाषा
विषयासाठी ही पदभरती करण्यात आली.
****
लातूर-पुणे दरम्यान प्रवाशांची वाढती संख्या
लक्षात घेता लातूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस ही नवी रेल्वे गाडी सुरु करण्याची मागणी आमदार अमित
देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी काल दिल्लीत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची
भेट घेवून ही मागणी केली. लातूर इथं रेल्वे बोगी कारखाना उभारण्याच्या कामाला गती
द्यावी, लातूर मुंबई रेल्वेसेवा पूर्ववत करावी, यासह इतर अनेक मागण्याही देशमुख
यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या
१३३ कोटी ५८ लाख रूपयांच्या आराखड्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या
हस्ते झाला. शहरांतर्गत २० कोटी रुपयांच्या रस्ते कामालाही मुंडे यांच्या उपस्थितीत
प्रारंभ करण्यात आला.
****
राज्य रेशीम संचालनालयाच्या वतीनं जालना इथं आजपासून
दोन दिवसीय महारेशीम महोत्सव आणि शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
जुना मोंढा परिसरातल्या मैदानावर हा महोत्सव होणार आहे.
****
जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मानं
दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक, तर सौरभ चौधरीनं कांस्य पदक मिळवलं. पन्नास
मीटर एअर रायफल प्रकारात संजीव राजपुत यानं रौप्य पदक पटकावलं आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या क्रिकेट
कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर भारताच्या पाच बाद दोनशे चौसष्ट धावा झाल्या.
कालच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार विराट कोहली ७६ तर मयंक अग्रवाल ५५ धावांवर
होता.
*****
***
No comments:
Post a Comment