आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ ऑगस्ट २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय जनता पक्षाची
महाजनादेश यात्रा आज जालना जिल्ह्यात भोकरदन इथं पोहोचत आहे. आज सकाळी सिल्लोडनंतर
दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान ही यात्रा भोकरदन इथं पोहोचेल. भोकरदन इथं, कृषि उत्पन्न
बाजार समितीच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभेला संबोधित करतील.
सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जालना शहरातही मुख्यमंत्री जाहीर सभेला संबोधित करतील.
दरम्यान, मराठवाड्यातला दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी कोकणातून
पाणी आणलं जाईल, यामुळे मराठवाड्यातल्या भावी पिढ्यांना दुष्काळ पाहावा लागणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद तसंच जालना
जिल्ह्यातल्या अंबड इथं महाजनादेश यात्रेदरम्यान जाहीर सभेत ते काल बोलत होते.
मात्र कोकणाची पाण्याची
गरज भागल्याशिवाय मुंबईला पाणी नेऊ देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी घेतली आहे. ते काल रोहा इथं वार्ताहरांशी बोलत होते.
कोयनेचं सहासष्ट अब्ज घनफूट पाणी कुंडलिका नदीत येतं, त्यामुळं परिसरातल्या गावांना
पाणी मिळतं. मात्र हे पाणी इतरत्र गेल्यास पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळं
सरकारनं अगोदर कोकणातल्या गावांना पाण्याचा साठा उपलब्ध करून द्यावा आणि नंतरचं हे
पाणी अन्यत्र वळवावं असंही तटकरे यांनी यावेळी नमूद केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बी. डब्ल्यू. एफ पॅरा
बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत १२ पदक जिंकणार्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. समस्त
भारतीयांना या खेळाडूंचा अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
या खेळाडूंचं यश प्रोत्साहन देणारं असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
दरम्यान, टाईम या जगप्रसिद्ध
मासिकाने जगभरातल्या शंभर सर्वोत्तम स्थानांमध्ये सरदार सरोवरावर उभारलेल्या सरदार
वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचा समावेश केला आहे. याबद्दलही पंतप्रधानांनी आनंद
व्यक्त केला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment