Thursday, 22 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.08.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२२  ऑगस्ट  २०१ सकाळी ७.१० मि.
****

v एनएक्स मीडिया भ्रष्टाचाप्रकरणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक
v नाशिक जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांचा शिवसेनेत प्रवेश
v औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या मतदानाची आज मतमोजणी
आणि
v  मुंबई उच्च न्यायालयात चार नवीन अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती
****

 एनएक्स मीडिया भ्रष्टाचाप्रकरणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना केन्द्रीय अन्वेषण विभाग -सीबीआयनं काल रात्री दिल्ली त्यांच्या घरातून अटक केली. अटकेनंतर चिदंबरम यांना सीबीआयच्या मुख्यालयात ठेवण्यात आलं असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाईल.

 दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांची अटकपूर्व जामिन देण्याची याचिका फेटाळल्यानंतर मंगळवारपासून सीबीआयचे अधिकारी त्यांचा शोध घेत होते. चिदंबरम यांनी उच्च न्यायालयाच्या या निकालाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील केले, मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार आहे.

 तत्पूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं जामिन याचिका फेटाळल्यानंतर चिदंबरम गायब झाले होते. मात्र काल संध्याकाळी काँग्रेस मुख्यालयात येऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काल रात्रीपासून वकिलांसोबत जामिन याचिकेसंदर्भात कागदपत्र तयार करत असल्याचं सांगत त्यांनी कायद्यापासून स्वतःचा बचाव करत असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं.

 आईएनएक्स मीडियात परदेशी गुंतवणुक कथित घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी  त्यांना ताब्यात घेण्याची मागणी सीबीआयनं केली होती. गेल्या वर्षी त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होत, मात्र ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. सीबीआनं २०१७मध्ये याबाबत गुन्हा नोंदवला होत, २००७ मध्ये आईएनएक्स मीडियात परदेशी गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन ३०५ कोटी रूपये मिळवल्याचा त्यांच्याविरूद्ध आरोप आहे. यानंतर सक्तवसूली संचालनालयानं २०१८ मध्ये या बाबतीत आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप लावत या प्रकरणी खटला दाखल केला होता.
****

 थेट परदेशी गुंतवणुकीसंदर्भात नियमभंग प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं, एनडीटीव्ही वृत्त वाहिनीचे प्रवर्तक प्रणव रॉय त्यांच्या पत्नी राधिका रॉय आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन हजार सात ते दोन हजार नऊ या कालावधीत ३२ सहयोगी कंपन्यांच्या माध्यमातून ही गुंतवणूक झाल्याचा सीबीआयचा आरोप आहे. यासंदर्भात कंपनीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमादित्य चंद्रा यांच्याविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांना गेल्या नऊ ऑगस्टला भारताबाहेर जाताना मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं होतं.
****

 कोहिनूर मिलप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय ईडीच्या चौकशीतून ठोस काही निष्पन्न होणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना या प्रकरणी ईडीनं नोटीस बजावली असून, उद्या त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेश जोशी यांची ईडीनं या प्रकरणी काल सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली.
****

 नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघात सलग दोनवेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित यांनी काल मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या बरोबरच या दोन्ही तालुक्यातल्या बहुतांशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. निर्मला गावित या काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल यांनीही काल शिवसेनेत प्रवेश केला.
****

 येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. पक्षाची शिवस्वराज्य यात्रा काल यवतमाळमध्ये पोहोचल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नेमकं कोण, कोणत्या पक्षात आहे, हे विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असं मतही पवार यांनी व्यक्त केलं.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****

 औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या मतदानाची आज मतमोजणी करण्यात येणार आहे. गेल्या सोमवारी या निवडणुकीचं मतदान झालं होतं. ६४७ मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं आहे. शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे भवानीदास कुलकर्णी यांच्यात ही निवडणूक होत आहे.
****

 मराठवाड्यात काल काही ठिकाणी पाऊस झाला. औरंगाबाद शहरात दुपारच्या सुमारास हलक्या सरी बरसल्या. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कुरुंदा, आखाडा बाळापूर परिसरात तसंच नांदेड, परभणी, जालना, हिंगोली आणि बीड जिल्ह्यातही काल पाऊस झाला. या पावसामुळे या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
****

 मुंबई उच्चन्यायालयात चार नवीन अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती ए.जी.घरोटे, एन.बी.सूर्यवंशी, ए.एस.किरोल आणि मिलिंद जाधव यांचा यात समावेश असल्याचं विधी मंत्रालायातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान,केरळ उच्च न्यायालयातही तीन नवीन न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला आहे.
****

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६१व्या वर्धापनदिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी काल वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ.आर. एस. मोरवंचीकर यांना या कार्यक्रमात जीवनसाधना पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात लातूरच्या पाणी प्रश्नासह जनसामान्यांच्या मुलभूत प्रश्नावर काय केलं, असा प्रश्न लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी विचारला आहे. ते काल लातूर शहर विधानसभा मतदार संघातल्या काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. लातूरला कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था एक ऑगस्टपर्यंत करण्याचं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, जिल्हा नियोजन समिती बैठकीत ३१ जुलैपर्यंत लातूरला कायस्वरूपी पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित होईल असं आश्वासन दिलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा रेल्वेद्वारे लातूरला पाणी पुरवठ्याचा विचार सत्ताधारी करत आहेत, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधलं. लोकसभेच्या निकालाची चिंता न करता, कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावं, असं आवाहनही आमदार देशमुख यांनी केलं.
****

 शेतकरी हिताच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलं आहे. ते काल सोलापूर इथं पक्षाच्या संमेलनात बोलत होते. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, उत्पादनावर आधारित दीडपट हमीभावाची अंमलबजावणी, तेलबियांच्या आयातीवर वाढवलेले कर, अशा अनेक शेतकरी हिताच्या योजनांची माहिती पाशा पटेल यांनी यावेळी दिली.
****

 पुराचं संकट हे राष्ट्रीय आहे, तेव्हा  केंद्राकडून, राज्याला मदत मिळावी, अशी अपेक्षा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची ठाकरे यांनी काल पाहणी केली. त्यावेळी इस्लामपूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. देशात कुठंही कोणतंही संकट आलं तर महाराष्ट्र पुढे असतो, तेव्हा महाराष्ट्रालासुद्धा अन्य राज्यांसारखी मदत मिळावी असं सांगून  याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून लोकांनी सादर केलेल्या मागण्या आणि अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.
****

 पंतप्रधान किसान मानधन योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे. या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी उद्यापासून येत्या २५ तारखेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्याच्या प्रत्येक गावात मेळावा घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेत सर्व पात्र शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रूपये निवृत्ती वेतन दिलं जाणार आहे.
****

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात आज ‘मेगा जॉब फेअर-२०१९’चं आयोजन करण्यात आलं आहे. या संदर्भातली सर्व माहिती विद्यापीठाच्या वेब साईटवर तसंच रोजगार कार्यालयाच्या महास्वयं पोर्टल वर उपलब्ध आहे. नांदेड  जिल्ह्यातही बेरोजगार उमेदवारांसाठी उद्या नांदेड इथं पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं  आयोजन करण्यात आलं आहे. 
****

 भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान, दोन सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका आजपासून वेस्ट इंडिज इथं सुरु होत आहे. कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात भारतीय संघ  हे सामने खेळणार आहे.
****
 केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा सन २०१८ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार अहमदनगर इथल्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेतले शिक्षक डॉ. अमोल बागुल यांना जाहीर झाला आहे. रजत पदक, मानपत्र आणि पन्नास हजार रुपये रोख असं पुरस्काराचं स्वरूप असून ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
*****
***

No comments: