Saturday, 31 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.08.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१  ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आपल्या महाजनादेश यात्रे अंतर्गत नांदेड आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करत आहेत. त्यांची लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथं दुपारी दोन वाजता सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी साडे चार वाजता उद्गीर इथंही या महाजनादेश यात्रे अंतर्गत त्यांची सभा होणार आहे. लातूर इथली सभा संध्याकाळी सात वाजता होणार आहे.  शिरुर ताजबंद, हंडरगुळी, आणि लोहारा, येरोळमोड, तळेगावरोड, आष्टामोड आणि ममदापूर या ठिकाणी त्यांच्या महाजनादेश यात्रेचं स्वागत होणार आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काल संध्याकाळी नांदेड जिल्ह्यात दाखल झाली आहे.
****

 नांदेड जिल्‍हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी तीन दिवस चाललेल्या प्रक्रियेत एकूण चारशे दोन विषय शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली आहे. सामाजिक शास्‍त्र, गणित, विज्ञान, तसंच भाषा विषयासाठी ही पदभरती करण्यात आली आहे.
****

 बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी ५८ लाख रूपयांच्या आराखड्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते काल झाला. शहरांतर्गत वीस कोटी रुपयांच्या रस्ते कामालाही मुंडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
****

 राज्य रेशीम संचालनालयाच्या वतीनं जालना इथं आजपासून दोन दिवसीय महारेशीम महोत्सव आणि शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जुना मोंढा परिसरातल्या मैदानावर हा महोत्सव होणार आहे.
****

नाशिक जिल्ह्यातील पेठ इथले नायब तहसीलदार बाळासाहेब नवले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. या नायब तहसिलदारानं तक्रारदाराकडून वडिलोपार्जित शेतजमिनीचे हिस्से वाटप पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात सहा हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावरून आलेल्या तक्रारीनुसार नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून ही कारवाई केली.
****

 नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील शिरड या गावातील एका युवकाचा काल बुडून मृत्यू झाला. पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी पाण्यात उतरलेल्या शिवाजी संभाराव फाळके या तरुणाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
*****
***

No comments: