Tuesday, 27 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.08.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
मराठवाड्यातल्या भावी पिढ्यांना दुष्काळ पहावा लागू नये, असा संकल्प राज्य सरकारनं केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज जालना जिल्ह्यातील अंबड इथं महाजनादेश यात्रेवेळी आयोजित जाहीर सभेत बोलत होते. मराठवाडा एकात्मिक पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून वीस हजार कोटी रुपये खर्चून चौसष्ट हजार किलोमीटर जलवाहिनीच्या माध्यमातून धरणं एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. गावं आणि शहरातला पिण्याचा पाण्याचा दुष्काळ त्याद्वारे संपवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसला विरोधी पक्ष बनवण्या इतक्याही जागा मिळणार नाही, अशी टीका त्यांनी केली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची भाषणंही यावेळी झाली. मुख्यमंत्री फडणवीस हे आता औरंगाबादच्या दौऱ्यावर येत असून संध्याकाळी सात वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. 
****
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात निश्चीतचं युती होणार असून एका दिवसात जागा वाटप केलं जाईलं, अस मुख्यमंत्री फडणीस यांनी बीड इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थीती चिंताजनक असून एकात्मिक पाणी पुरवठा योजना तसंच कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात आणल्यानंतर मराठवाड्यातील दुष्काळ `इतिहास जमा` होईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मराठवाड्यात कृत्रिम पावसाची चाचणी सुरू असून ढगाळ वातावरण जसं येईल तसा पाऊस पाडला जाईल. आतापर्यंत कृत्रिम पाऊस पाडण्यात यशं आलं असल्याची माहिती त्यांनी दिली. कायम विनाअनुदानित शिक्षक आंदोलनाबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच योग्य तो निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.
विधानसभा निवडणूक जवळ आलेली असून त्यांच्या महाजनादेश यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं नमुद करताना त्या तुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरू केलेल्या अभियानाला प्रतिसाद मिळत नसल्याची प्रतिक्रीया मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि इतर नेत्यांविरूध्द दाखल झालेल्या गुन्ह्या संबंधित सर्व तपास यंत्रणा चौकशी करून योग्य ती कारवाई करेल असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
देशातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं धोरणं आखण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. त्या आज नाशिक इथं पक्षाच्या संवाद दौऱ्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. देशातल्या बेरोजगारीसह अनेक प्रश्न सोडवण्यात केंद्र सरकार अयशस्वी ठरलं असल्याची टीका त्यांनी  केली. अर्थव्यवस्था सुधारावी यासाठी निश्चित धोरण ठरविण्याची गरज आहे आणि त्यासाठी उद्योगक्षेत्रात स्थैर्य निर्माण होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. शासनाच्या विरोधात बोलणाऱ्यांविरुद्ध कारवाई होत असल्याचा आरोपही खासदार सुळे यांनी यावेळी केला.
****
राज्य सरकारकडून कोयनेचं सहासष्ट टीएमसी पाणी मुंबईला नेण्याचा विचार सुरू असुन कोकणची पाण्याची गरज पूर्ण झाल्याशिवाय मुंबईला पाणी नेऊ देणार नाही, अशी भूमिका रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी आज रोहा इथं पत्रकार परिषदेत जाहीर केली. कोयनेचं सहासष्ट टीएमसी पाणी कुंडलिका नदीत येतं, त्यामुळं परिसरातील गावांना पाणी मिळतं. मात्र हे पाणी इतरत्र गेल्यास पाण्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होईल, त्यामुळं  सरकारनं अगोदर कोकणातील गावांना पाण्याचा साठा उपलब्ध करून द्यावा आणि नंतरचं हे पाणी अन्यत्र वळवावं असंही तटकरे यांनी यानिमित्त नमुद केलं.
****
मराठवाड्यातला मानव विकास निर्देशांक वाढवण्यासाठी पन्नास कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जालना, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांचा मानव निर्देशांक सरासरीपेक्षा कमी असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं. स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून या संदर्भात योजना राबवण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात येणार आहेत. मानव विकास तसंच विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रस्तावांची छाननी करून मान्यता देणार असल्याचं डॉ. कराड यांनी सांगितलं.
****

No comments: