Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२३ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** राज्य
सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
** माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना, २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
** विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक
स्वराज्य संस्था मतदार संघात शिवसेनेचे अंबादास दानवे विजयी
आणि
** वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पाहिल्या डावात सहा बाद २०३ धावा
**
राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे
आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत. सुमारे
२५ हजार कोटी रुपयांच्या या कर्जवाटप घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ
नेते अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह राज्यभरातल्या सत्तर मोठ्या नेत्यांचा सहभाग असल्याचं, याबाबतच्या याचिकेत
नमूद आहे. या सर्वांविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावे असल्यानं, गुन्हे दाखल करण्याचे
आदेश न्यायालयानं दिले आहेत. बँकेच्या संचालक मंडळात राहिलेल्या राजकीय नेत्यांनी आपले
निकटवर्तीय तसंच मर्जीतल्या लोकांना नियमबाह्यपणे कर्जवाटप केल्यामुळे बँक डबघाईला
आल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे याप्रकरणी तत्कालीन संचालक तसंच अधिकाऱ्यांविरुद्ध
गुन्हा नोंदवून चौकशी करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
****
आयएनएक्स
मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी चिदंबरम
यांना, न्यायमूर्ती अजय कुमार कुहर यांच्या विशेष न्यायालयानं येत्या २६ ऑगस्टपर्यंत
गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सीबीआयकडून न्यायालयासमोर
बाजू मांडताना महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी, गंभीर कारस्थानात सहभागी झालेले
चिदंबरम तपासात सहकार्य करत नाहीत, उत्तरं टाळण्याकडे त्यांचा कल असल्याचं सांगितलं.
मात्र चिदंबरम यांनी आपण सीबीआयचा
एकही प्रश्न अनुत्तरीत ठेवला नसल्याचं
सांगितलं.
****
केंद्रीय
अन्वेषण विभाग -सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय - ईडी या दोन्ही यंत्रणा, वैयक्तिक
सूड घेण्याचे विभाग म्हणून सरकारकडून वापरले जात असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.
काँग्रेस नेते तसंच माजी केंद्रीय अर्थ आणि गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या अटकेच्या
पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
आयएनएक्स मीडिया प्रकरणातले अन्य अनेक आरोपी मोकाट असताना, चिदंबरम यांना मात्र कोणताही
कायदेशीर आधार नसताना, अटक केल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला.
दरम्यान,
जम्मू काश्मीरमधल्या ताब्यात घेतलेल्या विविध नेत्यांची तत्काळ सुटका करावी, या मागणीसाठी
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आणि द्रमुकसह इतर विरोधी पक्षांनी काल नवी दिल्लीत निदर्शनं
केली. चिदंबरम यांचे पुत्र खासदार कार्ति चिदंबरमही या आंदोलनात सहभागी झाले. काश्मीर
खोऱ्यात दूरसंचार सेवा बहाल करण्यासह इतर मागण्याही या पक्षांकडून करण्यात आल्या.
****
कोहीनूर
मिल गैरव्यवहार चौकशी प्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठीशी आहेत, असं शिवसेना नेते
खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांना या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय-
ईडीनं नोटीस बजावल्यानंतर ठाकरे काल सकाळी ईडीच्या मुंबई कार्यालयात दाखल झाले. राज
ठाकरे चौकशीला सहकार्य करत आहेत, चौकशी पूर्ण होऊ द्यावी, मात्र ही कारवाई म्हणजे राजकीय
सूड असल्याचं म्हणणं, हे तपास अधिकाऱ्यांना निराश करणं असल्याचं, राऊत यांनी नमूद केलं.
दरम्यान,
काल इडीनं राज ठाकरे यांची रात्री साडेआठ वाजेपर्यंत चौकशी केली.
****
विधान
परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेना
- भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार अंबादास दानवे विजयी झाले. काँग्रेस आघाडीचे भवानीदास
उर्फ बाबुराव कुलकर्णी यांचा त्यांनी पराभव केला. दानवे यांना ५२४ मतं मिळाली तर कुलकर्णी यांना १०६ मतं मिळाली. शहानवाज खान यांना
३ मतं मिळाली तर १४ मतं बाद झाली. दानवे यांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी औरंगाबाद शहरात विजय मिरवणूक काढली तर
जालना इथंही जल्लोष केला.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****
राज्य
शासनानं गृह विभागातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्य रस्ते परिवहन
मंहामंडळाचे मुख्य दक्षता अधिकारी, मनोज लोहिया यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस
महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर यांची
नांदेडचे पोलीस अधीक्षक म्हणून तर नागपूरचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांची उस्मानाबादचे
पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. मुंबईच्या विशेष सुरक्षा विभागाच्या पोलीस
अधीक्षक - प्रशासन कल्पना बारावकर यांची नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी
नियुक्ती करण्यात आली आहे.
****
राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा काल परभणी जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी झालेल्या
सभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे,
माजी राज्यमंत्री फौजिया खान, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांना सन्मानानं जगण्याची उमेद
निर्माण करण्याची गरज असल्याचं मत, खासदार कोल्हे यांनी यावेळच्या भाषणातून व्यक्त
केलं. तर पक्ष सोडून गेलेल्यांमुळे पक्षावर काहीही परिणाम होणार नाही, असा विश्वास
अजित पवार यांनी व्यक्त केला.
****
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला काल धुळ्यातून प्रारंभ
झाला. या यात्रेच्या अनुषंगानं स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी
काल सेलू, पाथरी, तसंच परभणी इथं, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन
आढावा घेतला. या महाजनादेश यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन लोणीकर यांनी केलं.
****
जालना
जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ३९ टक्केच पाऊस झाल्यानं, पाणीटंचाईची समस्या ऐन पावसाळ्यातही
कायम आहे. टंचाई निवारण्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यातल्या १०७ गावं आणि २२ वाड्यांमध्ये
१२० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, सर्वाधिक ५६ टँकर अंबड तालुक्यात सुरू आहेत.
पावसाअभावी खरीपाची पिकं धोक्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर
जिल्ह्यात औसा तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान द्यावं
या मागणीसाठी निराधार संघर्ष समिती, दुष्काळ संघर्ष समिती, शेतकरी संघटना, बहुजन रयत
परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संघटनांनी
औसा तहसील कार्यालयाला काल घेराव घातला. पालकमंत्र्यांनी उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल
आंदोलनकर्त्यानी यावेळी नाराजी व्यक्त केली .
यावर्षी
अद्याप पाऊस न झाल्यामुळे बहुतांश भागात पेरण्याही झालेल्या नाहीत. यामुळे शेतकरी आणि
सामान्य नागरिक संकटात सापडले आहेत. परिणामी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी
छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी आमरण उपोषण सुरु केलं असून, प्रशासनानं त्याची
दाखल घेतली नाही, त्यामुळे संघटनांनी हे आंदोलन केलं.
****
उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागात बल्लभगड
इथं चौथ्या रेल्वे मार्गाचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे नांदेड विभागातून जाणाऱ्या
काही गाड्या रद्द झाल्या असून काही गाड्यांच्या मार्गात बदल झाला आहे. नांदेड- अमृतसर
- नांदेड सचखंड एक्सप्रेस, दोन आणि चार सप्टेंबर रोजी वेगळ्या मार्गाने धावेल. श्रीगंगानगर-नांदेड- श्रीगंगानगर ही गाडी तीन आणि
पाच सप्टेंबर रोजी तर अम्ब अन्दौरा-नांदेड-अम्ब अन्दौरा ही गाडी पाच आणि सात सप्टेंबर
रोजी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेनं
केलं आहे.
****
भारत आणि
वेस्ट इंडिज दरम्यान, दोन सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेच्या पहिल्या दिवशी काल
खेळ संपेपर्यंत भारतानं सहा गडी गमावत २०३ धावा केल्या. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजनं
प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात निराशाजनक राहिली मात्र,
अजिंक्य रहाणेच्या ८१ आणि के. एल. राहुलच्या ४४ धावांनी डाव सावरला. कर्णधार विराट
कोहली ९, चेतेश्वर पुजारा २ तर मयांक अगरवाल केवळ पाच धावांवर बाद झाले.
****
बीड जिल्ह्यातल्या
परळी औष्णिक केंद्रातला वीज निर्मितीचा एक संच काल सुरु करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीमुळे
गेल्या ८ महिन्यांपासून या केंद्रातली वीज निर्मिती प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यात
आली होती. जायकवाडी धरणातून डाव्या कालव्याद्वारे खडका बंधाऱ्यात पाणी पोहोचल्यामुळे
वीज निर्मीतीचा निर्णय घेतला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पाण्याच्या उपलब्धतेमुळे
या केंद्रातले इतरही संच सुरु करण्याची तयारी प्रशासनानं केली आहे.
****
राज्याचं रेशीम संचालनालय येत्या १ सप्टेंबर रोजी जालना
इथं रेशीम दिन साजरा करणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर
या कालावधीत रेशीम कृषि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. रेशीम साहित्य निर्मिती
करणारे, कृषि कंपन्या, विमा कंपन्या, खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी तसंच कृषिसाठी
उपयुक्त साहित्य निर्मिती करणारे उत्पादक तसंच विविध बचतगट आदींची दालनं या प्रदर्शनात
असतील.
****
धुळे जिल्ह्यात
सेंद्रीय आणि जैविक खतांमध्ये रासायनिक खताची भेसळ करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
साक्री तालुक्यातल्या रामीकर ग्रो इंडस्ट्रीज, जीबी ग्रो इंडस्ट्रीज आणि लाब्धी ग्रो
केमिकल यांनी अशाप्रकारे खतांची भेसळ करुन विक्री केल्याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात
सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसंच या दुकानांमधून पावणे दोन लाख रुपयांचा भेसळयुक्त खतसाठा जप्त करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment