Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2019
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
३१ ऑगस्ट २०१९ दुपारी
१.०० वा.
****
धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातल्या वाघाडी इथल्या
एका रसायनांच्या कारखान्यामध्ये आज सकाळी झालेल्या भीषण स्फोटात सात जण ठार, तर ४६
जण गंभीर जखमी झाले आहेत. या कारखान्यात आणखीनही काही कामगार अडकले असून, मृतांचा आकडा
वाढू शकतो अशी माहिती पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे यांनी दिली आहे. स्फोटानंतर भीषण
आग लागली असून, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कंपनीत अजूनही
रसायनांच्या मोठ्या टाक्या फुटण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाघाडी गावातील
लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. स्फोटामुळे परिसरातल्या गावातल्या घरांचंही
मोठं नुकसान झालं असून, स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
जनतेची इच्छा असल्यास आगामी विधानसभा निवडणूक लढवणार
असल्याची माहिती शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं जन आर्शिवाद
यात्रेनिमित्त आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
वरळी, दिग्रस आणि मालेगावमधून आगामी निवडणूक लढवण्यासंदर्भात कार्यकर्त्यांनी आपल्याला आग्रह केला असल्याची
माहितीही त्यांनी यावेळी दिली. राज्यात सध्या बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचा
पीकविमा योजना, कर्जमुक्तीसाठी आक्रोश, हे प्रश्न गंभीर असल्याचं त्यांनी नमुद केलं. हे प्रश्न सोडवण्यासंदर्भात सरकारकडे
पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या त्रेचाळीस निसर्गपर्यटन
स्थळांचा परिपूर्ण विकास झाला असून आणखी एकशे एकोणचाळीस निसर्ग पर्यटन स्थळांच्या
विकासासाठी निधीचं वाटप करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली
आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. स्थानिकांच्या रोजगारनिर्मितीसाठी पर्यटन हे राज्याचं मोठं शक्तीस्थान आहे. या
सर्व गोष्टींचा विचार करूनच निसर्ग पर्यटन मंडळ विविध उपक्रम राबवत असल्याचं मुनगंटीवार
यांनी सांगितलं.
****
चालू आर्थिक वर्षात
एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर पाच टक्के राहिला. मुख्य आर्थिक
सल्लागार के. सुब्रमणिअन यांनी नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. याआधी जानेवारी ते मार्च
या तिमाहीत हा दर पाच पूर्णांक आठ दशांश टक्के होता. विकास दरातील घसरणीला देशांतर्गत
तसंच आंतरराष्ट्रीय बाबीदेखील कारणीभूत आहेत असं त्यांनी सांगितलं. यासंर्भातल्या अधिकृत
सांख्यिकीनुसार या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्रात शून्य पूर्णांक
सहा दशांश टक्क्यांची घट झाली, तर खाणकाम क्षेत्रात दोन पूर्णांक सात दशांश टक्क्याची
वाढ झाली अशी माहितीही सुब्रमणिअन यांनी दिली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार
परिषदेचे अध्यक्ष बिबेक देबरॉय हे देखील या वार्ताहर परिषदेला उपस्थित होते. या वर्षात
भारताचा विकास दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्के राहील असा विश्वास देबवर्मा यांनी व्यक्त
केला आहे.
****
भारताचं चांद्रयान दोन
चंद्राच्या आणखी जवळ सरकलं आहे. चंद्राच्या जवळच्या चौथ्या कक्षेत हे यान नेण्याची
प्रक्रिया काल संध्याकाळी यशस्वी झाली. त्यामुळे हे यान चंद्रापासून सर्वात जवळ
124 किलोमीटर आणि सर्वात लांब 164 किलोमीटर अंतरावर असलेल्या कक्षेत दाखल झालं आहे.
या यानामधली सर्व यंत्रणा योग्य पद्धतीनं काम करत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
या मोहिमेअंतर्गत कक्षाप्रवेशाची शेवटची प्रक्रिया रविवारी संध्याकाळी केली जाणार आहे.
****
जालना शहर परिसरात आज
सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पाऊणतास पावसानं चांगली हजेरी लावली.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातल्या परभणी आणि पूर्णा शहरात काल पावसानं
हजेरी लावली. औरंगाबाद शहर परिसरात काल रात्री सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाला.
जालना,जळगाव,बीड जिल्ह्यातही काल पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद,
बीड, परभणी, सातारा इथं आज ढगाळ वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
अकोला जिल्ह्यातील काही
भागात भोई आणि कुंभार समाज घटकांतर्फे काल `गाढव पोळा` साजरा करण्यात आला. राज्यात
सर्वत्र बैल पोळा साजरा करण्यात येतो. त्याच धऱतीवर गाढवाचीही प्रत्येक कामात होत असलेली
मदत अधोरेखित करण्यासाठी त्याची पुजा करण्याकरता हा सण साजरा करण्याची अकोला जिल्ह्यात
परंपरा आहे.
****
मराठवाड्यातला
मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी आज औरंगाबाद इथं मराठवाडा विकास मंडळाच्यावतीनं चर्चासत्र होणार आहे. मानव विकास विभाग, आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या
उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातल्या जिल्हा नियोजन सभागृहात
हे चर्चासत्र होत आहे. ‘मानव विकास निर्देशांक’ या विषयावर विदर्भ विकास मंडळाचे तज्ञ
सदस्य डॉ. कपील चांद्रायन यांचं व्याख्यान होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment