Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 22 August
2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे
आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत. सुमारे
२५ हजार कोटी रुपयांच्या या कर्जवाटप घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह सत्तर मोठ्या नेत्यांचा सहभाग असल्याचं, याबाबतच्या
याचिकेत नमूद आहे. या सर्वाविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावे असल्यानं, गुन्हे दाखल करण्याचे
आदेश न्यायालयानं दिले आहेत. बँकेच्या संचालक मंडळात राहिलेल्या राजकीय नेत्यांनी आपले
निकटवर्तीय तसंच मर्जीतल्या लोकांना नियमबाह्यपणे कर्जवाटप केल्यामुळे बँक डबघाईला
आल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे याप्रकरणी तत्कालीन संचालक तसंच अधिकाऱ्यांविरुद्ध
गुन्हा नोंदवून चौकशी करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली.
****
कोहीनूर
मिल गैरव्यवहार चौकशी प्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठीशी आहेत, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी
म्हटलं आहे. राज ठाकरे यांना या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय ईडीनं नोटीस बजावली असून,
आज सकाळी राज ठाकरे ईडीच्या मुंबई कार्यालयात दाखल झाले. राज हे चौकशीला सहकार्य करत
आहेत, चौकशी पूर्ण होऊ द्यावी, मात्र ही कारवाई म्हणजे राजकीय सूड असल्याचं म्हणणं,
म्हणजे तपास अधिकाऱ्यांना हतोत्साहित करणं असल्याचं, राऊत यांनी नमूद केलं.
****
आयएनएक्स
मीडिया प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं पी चिदंबरम यांची पाच दिवसांची कोठडी मागितली
आहे. काल रात्री अटक केलेल्या चिदंबरम यांना आज दिल्लीत विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात
आलं. सीबीआयकडून न्यायालयासमोर बाजू मांडताना महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी,
चिदंबरम तपासात सहकार्य करत नाहीत, उत्तरं टाळण्याकडे त्यांचा कल असल्याचं सांगत, त्यांच्या
कोठडीची मागणी केली. दोन हजार सात सालच्या या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं गेल्या
वर्षी खटला दाखल केला आहे.
****
धुळे
जिल्ह्यात सेंद्रीय आणि जैविक खतांमध्ये रासायनिक खताची भेसळ करण्याचा प्रकार उघडकीस
आला आहे. साक्री तालुक्याल्या रामीकर ग्रो इंडस्ट्रीज, जीबी ग्रो इंडस्ट्रीज आणि लाब्धी
ग्रो केमिकल यांनी अशाप्रकारे खतांची भेसळ करुन विक्री केल्याप्रकरणी निजामपूर पोलिस
ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. तसंच या दुकानांमधून पावणे दोन लाख रुपयांचा भेसळयुक्त खतसाठा जप्त करण्यात
आला आहे.
****
राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज परभणी जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी झालेल्या
सभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे,
माजी राज्यमंत्री फौजिया खान, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांना सन्मानाने
जगण्याची उमेद निर्माण करण्याची गरज असल्याचं मत, खासदार कोल्हे यांनी यावेळच्या भाषणातून
व्यक्त केलं. तर पक्ष सोडून गेलेल्यांमुळे पक्षावर काहीही परिणाम होणार नाही, असा विश्वास
अजित पवार यांनी व्यक्त केला.
*****
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आज धुळयातून प्रारंभ
झाला. या यात्रेच्या अनुषंगाने स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी
आज सेलू, पाथरी, तसंच परभणी इथं, पक्षाचे पदाधिकारी, तसंच कार्यकर्त्यांच्या बैठका
घेतल्या. या महाजनादेश यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी पदाधिकारी,
कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन लोणीकर यांनी केलं.
****
यंदाच्या राज्य सांस्कृतिक
पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नाटक विभागातून सतीश पुळेकर, कंठसंगीत - कमल भोंडे, उपशास्त्रीय संगीत- मंगला जोशी, मराठी चित्रपट -मनोहर
आचरेकर, कीर्तन - तारा राजाराम देशपांडे, शाहिरी - अंबादास तावरे, नृत्य -रत्नम जनार्धनम्,
आदिवासी कला - नीलकंठ शिवराम उईके, वाद्यसंगीत
- अप्पा वढावकर, तमाशा-
हसन शहाबुद्दीन शेख, लोककला- लताबाई सुरवसे आणि कलादानसाठी सदाशिव देवराम कांबळे
यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख
रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे
****
जालना जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या ऐन पावसाळ्यातही
कायम आहे. टंचाई निवारण्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यातल्या १०७ गावं आणि २२ वाड्यांमध्ये
१२० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, सर्वाधिक ५६ टँकर अंबड तालुक्यात सुरू आहेत.
****
No comments:
Post a Comment