Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 August
2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दहा बँकांच्या
विलिनीकरणाची घोषणा केली. या निर्णयामुळे आता सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी बँकांची
संख्या २७ वरून १२ झाली आहे. या निर्णयानुसार कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचं विलिनीकरण
होणार आहे. अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेत विलिनीकरण होणार असून युनियन बँक, आंध्रा
बँक आणि कार्पोरशेन बँक या तीन बँकांचं विलिनीकरण होणार आहे. युनायटेड बँक आणि ओरिएंटल
बँक ऑफ कॉमर्स या दोन बँकांचं पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण होणार असल्याची माहिती सीतारामन
यांनी दिली. थकीत कर्जांचं प्रमाण आठ लाख ६५ हजार कोटींवरुन सात लाख ९० हजार कोटी रुपयांपर्यंत
कमी झाल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं आज देशभरात दीडशे ठिकाणी
छापे घातले. सर्वसामान्य नागरिक तसंच छोट्या व्यावसायिकांच्या दृष्टीकोनातून अत्याधिक
भ्रष्टाचार असलेल्या सरकारी ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात
म्हटलं आहे. या कारवाईबाबत अधिक माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.
****
दहावीच्या पुनर्परीक्षेचा निकाल आज माध्यमिक आणि उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेस्थळावर जाहीर झाला. राज्यभरातून पुनर्परीक्षेला बसलेल्या
दोन लाख एकवीस हजार सहाशे एकोणतीस परीक्षार्थींपैकी २२ पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के
म्हणजेच पन्नास हजार सहाशे सदुसष्ट परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन विषयांत अनुत्तीर्ण
झालेले एक लाख अठरा हजार एकशे एकसष्ठ परीक्षार्थी ए टी के टी सवलतीच्या माध्यमातून
अकरावी प्रवेशासाठी पात्र असल्याचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालपत्रात
म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी उद्या ३१ ऑगस्टपासून येत्या नऊ सप्टेंबरपर्यंत
अर्ज करता येणार आहेत.
****
यंदाचा दुष्काळ हा मराठवाड्यातला शेवटचा दुष्काळ असेल,
असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज हिंगोली इथं, महाजनादेश यात्रेच्या
सभेत मुख्यमंत्री बोलत होते. जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या गोरेगावला अतिरिक्त
तालुक्याचा दर्जा दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. हा तालुका लवकरच नियमित
केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी
उपस्थित होते. परभणी इथंही मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान सभेला संबोधित
केलं. गेल्या तीन-चार वर्षापासून अनियमीत पावसामुळे शेतकरी सातत्यानं संकटात सापडला
असून, या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचंही
मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
कर्मवीर भाऊराव पाटलांच्या त्यागातून कर्तृत्ववान पीढी
घडवण्याचं काम रयत शिक्षण संस्थेनं केलं असून ही परंपरा पुढे चालवण्यासाठी संस्थेची
पुढची पिढीही सज्ज आहे, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त
केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथं, रयत शिक्षण संस्थेच्या विविध इमारतीचं
उद्घाटन आणि नामकरण आज शरद पवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर-सांगली
पूरग्रस्तांना रयत परिवारच्या वतीनं नऊ लाख रुपयांची मदत करण्यात आली.
दरम्यान सध्याच्या राजकीय परिस्थितच्या पार्श्वभूमीवर
श्रीरामपूर इथं पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी खासदार पद्मसिंह पाटील हे
पक्ष सोडणार असल्याच्या बातम्यांबाबत काहीही माहिती नसल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
विरोधकांचं मनोबल खचलं असल्याची टीका भारतीय रिपब्लीकन
पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बोलत
होते. युतीमध्ये मतभेद नाहीत परंतु जागा वाटपात अडचणी आल्याच, तर युतीत प्रवेश केलेल्यांना
रिपाईच्या कोट्यातून उमेदवारी देऊ असंही त्यांनी नमूद केलं.
****
केंद्र सरकारनं देशातील प्रत्येक गावात चार प्रकारचे शाश्वत
स्वच्छतेचे संदेश भिंतीवर रंगविणे तसंच प्रत्येक गावात स्वागत फलक लावणे या स्पर्धेची
घोषणा केली होती. यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांनी सहभाग घेऊन राज्यभरात
एक लाख १६ हजारांपेक्षा जास्त संदेश रंगवले. या कामगिरीसाठी महाराष्ट्राला विशेष पुरस्कार
जाहीर झाला आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज जालना इथं
ही माहिती दिली. ६ सप्टेंबर रोजी दिल्ली इथं स्वच्छता महोत्सवात राष्ट्रपतींच्या हस्ते
हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे
****
राज्य रेशीम संचालनालयाच्या वतीनं जालना इथं उद्यापासून
दोन दिवसीय महारेशीम महोत्सव आणि शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
जुना मोंढा परिसरातल्या मैदानावर हा महोत्सव होईल. या महोत्सवात परवा एक सप्टेंबर रोजी
सिरसवाडी इथल्या रेशीम कोष बाजारपेठेच्या इमारतीचं भूमीपूजन होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा आणि परभणी शहरात आज पावसानं
हजेरी लावली. पूर्णा शहरात दुपारच्या सुमारास तर परभणी शहरात सायंकाळी पाऊस झाल्याचं
आमच्या वार्तहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment