Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 August
2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
दहशतवाद, घराणेशाही,
भ्रष्टाचार आणि जनतेच्या पैशाची लूट यावर नव्या भारतानं चाप लावला असल्याचं, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज फ्रान्समध्ये पॅरीस इथं, संयुक्त राष्ट्र शिक्षण
विज्ञान आणि सांस्कृतिक संस्था - युनेस्को मुख्यालयात भारतीय समुदायाशी बोलत होते.
दरम्यान, एअर इंडियाची
दोन विमानं अनुक्रमे १९५० तसंच १९६६ साली फ्रान्स मध्ये अपघातग्रस्त झाली होती, या
अपघातातल्या मृतांच्या स्मृतिस्थळाचं लोकार्पणही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावेळी
करण्यात आलं.
****
भारतीय स्टेट बँकेने
मुदत ठेवींवरच्या व्याज दरात अर्ध्या टक्क्यानं कपात केली आहे. सोमवारपासून हे नवीन
दर लागू होतील. बचत खात्यावर एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर साडे तीन टक्के व्याज
दर सध्या कायम ठेवण्यात आला आहे.
****
सरसकट सर्व शेतकऱ्यांना
पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळायाला हवी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांनी केली आहे. ते आज मुंबईत मातोश्री या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत
होते. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असलेल्या पीक विमा योजनेत कंपन्यांच्या चुकीच्या कारभारामुळे
९० लाख शेतकरी या पीक विम्यास अपात्र ठरवले असून, हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं ठाकरे
म्हणाले.
आतापर्यंत १० लाख
शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करून शेतकऱ्यांना
मदत मिळवून देईल, असं ते म्हणाले.
शिवसेनेच्या सर्व
खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली
असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जे पैसे विमा कंपन्यांना
दिले आहेत, त्यातून कंपन्यांचा नफा वगळून सर्व पैसे शेतकऱ्यांना मिळावेत, त्यासाठी
या योजनेतील त्रुटी दूर व्हायला हव्यात, असं ठाकरे यांनी नमूद केलं.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा
अवमान करणाऱ्यांना भर चौकात शिक्षा करावी, म्हणजे त्यांना स्वातंत्र्याची किंमत समजेल,
असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. दिल्ली विद्यापीठात घडलेल्या एका घटनेबाबत विचारलेल्या
प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.
दरम्यान, या प्रकरणी
कडक कारवाई केली जाईल, मात्र कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल, असं कृत्य कोणीही करू
नये, असं आवाहन असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज धुळ्यात महाजनादेश
यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेत, सावरकर अवमान प्रकरणी बोलत होते. स्वातंत्र्यलढ्यासाठी
सावरकर कुटुंबाने केलेल्या त्यागाचा सन्मान राखला पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
****
आगामी निवडणुकीत जनता
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिशी उभी राहील, असा ठाम विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते
अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीचं
उद्घाटन तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर, शेतकरी मेळाव्यात
ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत जिंतूर, गंगाखेड आणि घनसावंगी विधानसभा मतदार संघात
दगाफटका झाला. परंतु हिंमत न हारता, चांगल्या पद्धतीने राजकीय लढाई लढण्याचं आवाहन
पवार यांनी यावेळी केलं.
दरम्यान, येणारं सरकार
कुठलेही असलं तरी मंत्रिमंडळ आपलंच असेल असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार
सुप्रिया सुळे यांनी केला आहे. अहमदनगर मध्ये संवाद यात्रेच्या निमित्तानं आयोजित पत्रकार
परिषदेत त्या बोलत होत्या. ईडी, सीबीआय, कारखान्यांचे कर्ज अशा चार-पाच कारणांमुळे
पक्षांतर सुरू असून ही दबाव नीती असल्याचं आरोप त्यांनी यावेळी केला.
****
शेतकरी संघटनेच्या
पाठिंब्यावर स्वतंत्र भारत पक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ३० जागा लढवणार असल्याचं,
पक्षाकडून सांगण्यात आलं. औरंगाबाद इथं झालेल्या संयुक्त राज्य कार्यकारिणीच्या दोन
दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत याबाबत माहिती
देण्यात आली. शेतीशी निगडित सर्व कर्ज संपवण्यात यावीत, शेतकऱ्यांचं २३ हजार कोटी रुपयांचं
वीज देयक संपवण्यात यावं, शेतकऱ्यांना तंत्रज्ञान तसंच बाजारपेठेचं स्वातंत्र्य बहाल
करण्यात यावं, आदी ठराव या बैठकीत घेण्यात आले.
****
महाराष्ट्र विनाअनुदानित
शिक्षक शिक्षकेत्तर संघटना - मुप्टाच्या वतीनं आज औरंगाबाद इथं ‘पुंगी बजाव’ आंदोलन
करण्यात आलं. सर्व अशंत: २० टक्के अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान द्यावं, अघोषित
शाळांना घोषित करून अनुदान द्यावं, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्या आंदोलकांनी केल्या
आहेत. मुल्यांकनात पात्र ठरलेल्या अघोषित शाळांना घोषित करण्याचा निर्णय येत्या आठ
ते दहा दिवसांत न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment