Thursday, 29 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.08.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२९  ऑगस्ट  २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  अघोषित - घोषित शाळा आणि तुकड्यांना २० टक्के अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
Ø  ज्येष्ठ साहित्यिक तसंच कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ
Ø  साखरेच्या निर्यात धोरणाला केंद्र सरकारची मंजुरी; वर्षभरात ६० लाख टन साखर निर्यात करणार
आणि
Ø  बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भातला चौकशी समितीचा अहवाल सरकारला सादर
****

 अघोषित प्राथमिक, माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्या तसंच घोषित उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांना २० टक्के अनुदान मंजुरीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. यापूर्वी २० टक्के अनुदान मंजूर असलेल्या शाळा तसंच तुकड्यांना वाढीव अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला.

 राज्यभरात चार हजार ६२३ शाळा तसंच आठ हजार ८५७ तुकड्यांवरच्या ४३ हजार ११२ शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. यासाठी तीनशे चार कोटी रुपये अनुदानाला मंजुरी देण्यात आली. 

 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा दुसरा तसंच तिसरा टप्पा राज्यात राबवण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या योजनेच्या अंमलबजावणीत ७५ हजार कृषी पंप बसवण्यात येणार असून त्यासाठी एक हजार ५३१ कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चालाही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली. योजना प्रत्यक्ष सुरु झाल्यापासून १८ महिन्यात ती राबवण्यात येणार आहे.

 शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, शासन अनुदानित आयुर्वेद तसंच युनानी महाविद्यालयातल्या आंतरवासितांचं विद्यावेतन सहा हजार रुपयांवरून अकरा हजार रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला.

 ज्येष्ठ साहित्यिक तसंच कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला, या निर्णयाचा राज्यातल्या २६ हजार साहित्यिक-कलावंतांना लाभ मिळणार आहे.

 यासह दारुचा अवैध साठा तसंच विक्री प्रकरणी शिक्षेत वाढ करण्यासाठी दारुबंदी अधिनियमात सुधारणा, कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन आणि संशोधन केंद्राची स्थापना, विघटनशील अर्थात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान, अशा अनेक निर्णयांवर मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं.
****

 वॉटर ग्रीड योजनेच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या कामासाठी चार हजार कोटी रूपयांची निविदा काल प्रसिध्द झाली असून पुढच्या चार महिन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथं बोलत होते. यावेळी विविध सामाजिक संस्थाकडून २३ लाख ६१ हजार रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले. सिल्लोड इथंही मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

 दरम्यान, जालना आणि औरंगाबादमध्ये देशातलं सर्वात मोठं औद्योगिक केंद्र निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी जालना इथं माहजनादेश यात्रेच्या सभेत बोलतांना दिली. मराठवाडा हा  सातत्यानं दुष्काळग्रस्त असतो मात्र येणाऱ्या काळात मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्यासाठी सरकार योजना राबवणार आहे, असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

 दरम्यान, ही महाजनादेश यात्रा आज देवगावफाटा मार्गे परभणी जिल्ह्यात येणार आहे. आज दुपारी सेलू तसंच पाथरी इथल्या जाहीर सभांना संबोधित करून, मानवत मार्गे ही यात्रा सायंकाळी पाच वाजेपर्यंत परभणी शहरात पोहोचेल.
****

 २०१९-२० च्या साखर हंगामादरम्यान अतिरिक्त  साठ्याच्या समस्येवर उपाय म्हणून केंद्रीय मंत्रिमडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं साखरेच्या निर्यात धोरणाला मंजूरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि  प्रसारण मंत्री जावडेकर यांनी ही माहिती दिली. या आर्थिक वर्षात जवळपास ६० लाख टन साखरेची निर्यात केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

 २०२१-२२ पर्यंत देशात ७५ नवीन वैद्यकीय महाविद्यालयं स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजूरी दिली. यामुळं एमबीबीएसच्या १५ हजार सातशे अतिरिक्त  जागा निर्माण  होतील. ज्या ठिकाणी दोनशे खाटांचं जिल्हा रूग्णालय आहे त्या ठिकाणी ही महाविद्यालयं सुरू केली जातीलं असं जावडेकर म्हणाले.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीनं आपला अहवाल काल सरकारला सादर केला. ऊस तोडणीसाठी जाण्यापूर्वी आणि जाऊन आल्यानंतर महिलांची वैद्यकीय तपासणी करावी. त्यासाठी महिलांना आरोग्य कार्ड देणं, ऊस तोडणीच्या ठिकाणी साखर कारखान्यांनी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणं, खासगी रुग्णालयांनी गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांबाबत जिल्हा शल्यचिकीत्सकांना अहवाल सादर करणं अशा  महत्वपूर्ण शिफारशी समितीनं  केल्या आहेत. या शिफारसींवर  आरोग्य विभागासह संबंधित विभागांनी तातडीनं  कार्यवाही करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
****

 राज्य परिवहन महामंडळाच्या ५७८ बस स्थानकांच्या बाधकामांसाठी सरकारकडून मोठा निधी प्राप्त झाला असून या बस स्थानकांमध्ये प्रवाशांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. औरंगाबाद शहरात मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुर्नबांधणी आणि सिडको इथल्या बसपोर्टचं भूमिपूजन रावते यांच्या हस्ते काल झालं. त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यामध्ये तीस बसस्थानकांचं बांधकाम करण्यात येत असल्याचं सांगतांना ते म्हणाले….
 आमच्या सर्व बसस्थानकांमध्ये बाधकामांसाठी मोठा निधी प्राप्त झालेला आहे. आणि येत्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या ५७८ ठिकाणी संपूर्ण अमूलाग्रह बदल दिसतील. मराठवाड्यामध्ये आता ३० नविन बसस्थानक बाधायल्या घेतलेली आहे. स्वच्छता गृह हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. आणि खास करून महिलांना करीता, हि बघवत नव्हती अवस्था. परंतू अजून एक स्वच्छता गृह बाधायला घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये  चित्तवर्धक  तयार होणार आहे छोटी-छोटी आणि ती  फक्त केवळ मराठी करीता असणार आहे.  
****

 सोलापूर जिल्ह्यातले बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सोपल तसंच सोलापूरचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सोपल यांनी परवाच आमदारकीचा राजीनामा दिला होता.
****

 लातूर इथल्या श्री केशवराज विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त, घेण्यात आलेल्या, ‘एक दिवस साहित्यिकाच्या सहवासात’ या उपक्रमाच्या शेवटच्या सत्रात काल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ अरुणा ढेरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. कोणत्याही वैचारीक प्रवाहाच्या मागे न लागता तटावर उभं राहून प्रवाहाला दिशा देण्याचं काम साहित्यिकाला करता आलं पाहिजे असं मत यांनी यावेळी व्यक्त केलं. 
****

 वंजारी समाजाचं आरक्षण आठ टक्क्यांवरुन दहा टक्के करावं या मागणीसाठी या समाजातर्फे काल बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन समाजातर्फे देण्यात आलं.
****

 पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांनाच माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं काल रद्द केला. फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारनं याबाबतचे आदेश जारी केले होते.
*****
***

No comments: