Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
आयएनएक्स
घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय परवा
शुक्रवारी सुनावणी घेणार आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयानं चिदंबरम यांना अटकपूर्व
जामीन नाकारला, या निर्णयाला चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. न्यायालयानं
तत्काळ सुनावणी घेण्यास नकार देत, ही याचिका येत्या शुक्रवारी सुनावणीला घेणार असल्याचं
सांगितलं.
दरम्यान,
अंमलबजावणी संचालनालय ईडीने चिदंबरम यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआयने ही चिदंबरम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना चौकशीसाठी ताब्यात
घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चिदंबरम सापडले नसल्यानं, त्यांच्या घरावर सीबीआयने चौकशीला
हजर होण्याची नोटीस चिकटवली.
काँग्रेस
पक्षानं या कारवाईवर टीका करत, सध्याच्या सरकारचे अपयश निर्भीडपणे जनतेसमोर मांडत असल्यामुळे
चिदंबरम यांच्यावर सरकार सूड उगवत असल्याचं, म्हटलं आहे. द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे
प्रमुख एम के स्टॅलिन यांनी भाजप सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत, चिदंबरम यांची
पाठराखण केली. अण्णाद्रमुक पक्षानं मात्र, चिदंबरम यांना या प्रकरणी कारवाईपासून पळ
न काढता कारवाईला सामोरे जाण्याचा सल्ला दिला आहे.
****
थेट परदेशी
गुंतवणुकीसंदर्भात नियमभंग प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं, एनडीटीव्ही वृत्त वाहिनीचे
प्रवर्तक प्रणव रॉय त्यांच्या पत्नी राधिका रॉय आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला
आहे. दोन हजार सात ते दोन हजार नऊ या कालावधीत ३२ सहयोगी कंपन्यांच्या माध्यमातून ही
गुंतवणूक झाल्याचा सीबीआयचा आरोप आहे. यासंदर्भात कंपनीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी
अधिकारी विक्रमादित्य चंद्रा यांच्याविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांना गेल्या नऊ ऑगस्टला भारताबाहेर जाताना मुंबई विमानतळावर
रोखण्यात आलं होतं.
****
कोहिनूर
मिलप्रकरणी अंमलबजावणी संचलनालय ईडीच्या चौकशीतून ठोस काही निष्पन्न होणार नाही, असं
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना या प्रकरणी ईडीनं नोटीस बजावली
असून, उद्या त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. शिवसेना नेते मनोहर
जोशी यांचे पुत्र उन्मेश जोशी यांची ईडीनं या प्रकरणी आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली.
दरम्यान या कारवाईच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्ते उद्या मुंबईत ईडी कार्यालयाबाहेर
आंदोलन करणार आहेत.
****
नाशिक
जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघात सलग दोनवेळा प्रतिनिधित्व
करणाऱ्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित यांनी आज मुंबईत शिवसेना पक्ष
प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या बरोबरच दोन्ही
तालुक्यातील बहुतांशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे
माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या निर्मला गावित या कन्या आहेत.
****
केंद्र
सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा सन २०१८ चा राष्ट्रीय शिक्षक
पुरस्कार अहमदनगर इथल्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेतले शिक्षक डॉ. अमोल बागुल
यांना जाहीर झाला आहे. रजत पदक, मानपत्र आणि पन्नास हजार रुपये रोख असं पुरस्काराचं
स्वरूप असून ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार
प्रदान करण्यात येणार आहे. कमी वयात पुरस्कार प्राप्त करणारे अमोल बागुल महाराष्ट्रात
एकमेव तर देशात गुणानुक्रमाने पहिले शिक्षक ठरले आहेत.
****
पुण्यात
शालेय पोषण आहार घेतल्यानंतर २१ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे. कात्रज
इथल्या रामभाऊ म्हाळगी माध्यमिक शाळेत आज सकाळी अकरा वाजेदरम्यान हा प्रकार घडला. या
सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या शाळेनं एका स्वयंसहायता
गटाला पोषण आहार शिजवण्याचं कंत्राट दिलेलं असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत, कुरूंदा, आखाडा बाळापूर परिसरात
आज दुपारी चार वाजता
पावसाने हजेरी लावली. गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने हजेरी लावल्याने
बळीराजा सुखावला आहे.
नांदेड
इथंही आज दुपारी तासभर चांगला पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा वर्धापनदिन २३ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार
आहे. यानिमित्त विद्यापीठाच्या मुख्य सभागृहामध्ये सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली आहे. ते आज
विद्यापीठात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांना जीवनसाधना पुरस्कारानं
सन्मानित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं
****
No comments:
Post a Comment