Sunday, 25 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.08.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बहारिइथून फ्रान्सला रवाना झाले. आज रात्री ते बियारिट्झ इथं पोहोचतील. जगातल्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या जी-सात देशांच्या शिखर बैठकीत पंतप्रधान सहभागी होणार आहेत.
बहारिन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दि किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसाँ” या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार म्हणजे बहारिन आणि भारत यांच्यातल्या घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंधांचं प्रतीक आहे, असं ट्विट मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलं आहे. बहारीमधल्या भारतीय समुदायालाही त्यांनी आपल्या या दौऱ्यात संबोधित केलं. बहारीन स्टेडियम इथं झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या इशाऱ्यामुळे, पोलिसांनी पैठणच्या जायकवाडी धरणाच्या परिसरात हाय अलर्ट जारी केला असून, बंदोबस्तातही वाढ केली आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागानं तसं पत्रही पोलिस प्रशासनाला दिलं होतं.
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण नुकतंच ९० टक्के भरलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाथसागरावर पर्यटकांची मोठी गर्दीही होत आहे. मात्र आता पोलिसांनी पर्यटकांना धरणाच्या भिंतीवर जाण्यापासून रोखलं असून, परिसरात खासगी सुरक्षारक्षक आणि पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या महाजनादेश यात्रेचा पुढचा टप्पा उद्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी इथून पुन्हा सुरू होत आहे. माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील उत्तर भागातील या यात्रेच्या सभा रद्द करण्यात आल्या. उद्या मुख्यमंत्री शेवगाव पाथर्डी मतदारसंघात पाथर्डी इथं सभा घेणार आहेत. त्यानंतर बीड जिल्ह्यातल्या कडा आष्टी आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं सभा होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर आजपासून चार दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज आडत व्यापाऱ्यांच्या बैठकीला ते उपस्थित राहिले. तसंच, जनसेवा मानसोपचार आणि व्यसनमुक्ती केंद्राचं उदघाटनही त्यांनी केलं. पुढील तीन दिवसांत सोलापूर-औरंगाबाद चार पदरी रस्त्याच्या कामाबाबत बीड तालुक्यातील नागरिकांची बैठक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर कामाचे भूमिपूजन ते करणार आहेत.
****
ज्येष्ठ साहित्यिक मधू जाधव यांचं आज सोलापूर इथं कर्करोगानं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. प्रा. जाधव यांनी उस्मानाबाद, रत्नागिरी आणि चिपळूण इथं ३७ वर्षं मराठीचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केलं. त्यांनी लिहिलेल्या २१ पुस्तकांपैकी भूत भानामती, जादूटोणा आणि शोध भुताचा या पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी मरणोत्तर देहदान केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यातल्या आदिवासी भागातल्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी १६ जिल्ह्यांमध्ये उद्यापासून चार दिवस विविध ठिकाणी वैद्यकीय आणि दंत महाआरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. या महाआरोग्य शिबीराचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या ठाणे इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गरजू रुग्णांना १४ प्रकारच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा मिळण्याबरोबरच, शिबिराच्या ठिकाणी पौष्टिक आहार, अॅनेमिया, स्वच्छता आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विविध कार्यक्रमांबाबत प्रदर्शनातून जागृती करण्यात येणार आहे.
****
स्वित्झर्लंड मधल्या बसेल इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. सिंधूनं तिसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून, काल झालेल्या उपांत्य फेरीत तिनं चीनच्या खेळाडूचा २१-७,२१-१४ असा पराभव केला. या दोन्ही खेळाडूं दरम्यान १५ सामने झाले आहेत, त्यापैकी सिंधूनं आठ सामने जिंकलेले आहेत. पुरुष एकेरीत बी साई प्रणितला मात्र या स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानाव लागलं आहे.
****

No comments: