Saturday, 24 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.08.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४  ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 केंद्र सरकारकडे राज्यातल्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाशी संबंधित जे जे विषय प्रलंबित असतील त्याबाबत पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे. या  प्रलंबित प्रस्तावांबाबतची आढावा बैठक काल मंत्रालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. पुढील आठवड्यात याबाबत दिल्ली इथं बैठक घेतली जाणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं.
****

 शेतकरी गटांनी कापूस विक्री करण्याऐवजी, गाठी तयार करून विकल्यास अधिक नफा मिळेल. त्यामुळं मालावर प्रक्रिया करण्यावर अधिक भर देण्याचं आवाहन, कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केलं आहे. काल अमरावती जिल्ह्यातल्या वरूड इथं कापूस गाठी मूल्य शोध कार्यशाळेत ते बोलत होते. गट शेतीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं अनेक योजना आणल्या असून गट शेतीची  सबसिडी ८० टक्यांपर्यंत वाढवणे आणि क्षेत्र मर्यादा ५० एकरपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव असल्याचं ते म्हणाले.
****

 नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील बारुळ आणि उस्मानगर महसूल मंडळात जून २०१८ मध्ये अतिवृष्टीत २ हजार २५७ हेक्टर बाधित क्षेत्राच्या पीक नुकसानीसाठी २ कोटी १ लाख ७ हजार ६०० रुपये अनुदान प्राप्त झालं आहे. या अनुदानाचा लाभ १० हजार ५८८ शेतकऱ्यांना होणार आहे
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्या २५  ऑगस्टला होणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमातून, देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या मालिकेचा, या सत्रातील हा तिसरा भाग असेल. मन की बात कार्यक्रम आकाशवाणी समूहावर, दूरदर्शनवर आणि आकाशवाणीचं संकेतस्थळ www.allindiaradio.gov.in. वर पाहता येईल. मन की बात कार्यक्रम प्रधानमंत्री कार्यालय, सूचना आणि प्रसारण मंत्रालय, ऑल इंडिया रेडिओ तसंच दूरदर्शन आणि युट्यूबवर प्रसारित होईल. आकाशवाणीवर बातम्याच्या प्रसारणा नंतर प्रादेशिक भाषांमधेही मन की बात प्रसारण होईल. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता आकाशवाणीवरुन होईल.
*****
***

No comments: