Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२७ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø
येत्या पाच वर्षांत मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्याचं मुख्यमंत्र्यांचं
आश्र्वासन
Ø
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी
७० संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल
Ø
३ लाख ९० हजार
शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात कांदा अनुदान वाटप सुरू; औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद
आणि बीड जिल्ह्यांतल्या शेतकऱ्यांचा समावेश
आणि
Ø
वायदे बाजारातल्या तेजीमुळे सोन्याचा दर प्रति तोळा ४० हजार रूपयांवर
****
येत्या पाच वर्षांत मराठवाडा दुष्काळ मुक्त करू,
असं आश्र्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या
कडा- आष्टी इथं महाजनादेश यात्रा जाहीर सभेत बोलत होते. बीड जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला
बदलण्यासाठी मतदारांनी पुन्हा एकदा संधी द्यावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं काल मुख्यमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा
झाल्या. दुष्काळी मराठवाड्यासाठी समुद्राचं पाणी आणून दुष्काळ हा भूतकाळ करण्यासाठी
पाच हजार कोटी रूपयांची तरतुद केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बीड इथल्या जाहीर सभेत
बोलतांना सांगितलं. या सभांना राज्याच्या ग्रामविकास मंत्री
पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, मुख्यमंत्री
महाजनादेश यात्रेसाठी आज जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात येत आहेत. दुपारी एक वाजता शहागड
इथं, अडीच वाजता अंबड इथं त्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर ते औरंगाबादकडं प्रयाण
करणार असून जिल्ह्यात आडूळ इथून महाजनादेश यात्रा सुरू होईल आणि संध्याकाळी सात वाजता
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार असल्याचं
राज्याचे उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
****
ज्यांच्या घरातला लाल
दिवा पक्षानं कधीच विझू दिला नाही असे लोक पक्षाशी फितुर होत असून ज्यांचे राष्ट्रवादी
काँग्रेसच्या सात बाऱ्यावर नाव आहे ते जर पक्ष बदलणार असतील तर त्यांना शरद पवारांच्या
विचारांचे मावळे स्थान देणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनी दिला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी इथं शिवस्वराज्य यात्रेनिमित्त
आयोजित सभेत पाटील बोलत होते. यासभेला डॉ. पद्मसिंह पाटील आणि आमदार जगजितसिंह राणा
यांच्या अनुपस्थीतीमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
****
दरम्यान, काँग्रेस पक्षानं
कालपासून अमरावती इथून महापर्दाफाश यात्रा सुरू केली आहे. मुख्यमंत्री राज्यातल्या
जनतेची दिशाभूल करत असून वस्तुस्थिती आणि वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी आम्ही ही यात्रा
सुरू केली असल्याचं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल अमरावती इथं
पत्रकारांशी बोलतांना सांगितलं.
युवासेनाप्रमुख आदित्य
ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून नागपूर इथून सुरूवात
होत आहे.
****
महाराष्ट्र राज्य सहकारी
बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह
३१ जिल्हा बँकांचे अध्यक्ष आणि संचालकांविरूद्ध काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात
कोल्हापूरचे हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकरराव चव्हाण,
माणिकराव कोकाटे आदीं ७० जणांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार
हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ हजार कोटी रूपयांच्या अनियमित कर्ज वाटपप्रकरणी
हा गुन्हा दाखल झाला असून याबाबतची तक्रार तीन वर्षांपूर्वी दाखल झाली होती. १ जानेवारी
२००७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत हा घोटाळा झाला आहे.
****
राज्यातल्या ३ लाख ९०
हजार शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात कांदा अनुदान वाटप करण्यात येणार असून यासाठी ३८७
कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू
झाली असल्याचं पणनमंत्री राम शिंदे यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. दुसऱ्या
टप्प्यात मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांचा
समावेश आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून
हे वाटप होणार असून बँकेचे प्रतिनिधी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपलब्ध असल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
राज्यातल्या १६ जिल्ह्यांमध्ये
घेण्यात येत असलेल्या महाआरोग्य शिबिराचा राज्यस्तरीय शुभारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे
आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत काल ठाण्यात झाला. एखाद्या रोगावर उपचारापेक्षा
तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्य विभागाने भर दिला असून त्यासाठी राज्यात
महाआरोग्य शिबीरे घेतली जात असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
वायदे बाजारातल्या तेजीमुळे काल सोन्याचा दर प्रति
तोळा म्हणजेच प्रतिदहा ग्रॅम ४० हजार रूपयांवर पोहोचला. आतापर्यंतचा सोन्याचा भाव हा
सर्वाधिक आहे. मुंबई, अहमदाबाद आणि जयपूर शहरात काल भावाचा हा उच्चांक होता. मुंबईमध्ये
२४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ४० हजार ४० रुपयांवर गेला. गेल्या आठवड्यात
हाच दर ३८ हजार ७७० रुपये होता. राजधानी दिल्लीत २२ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति
१० ग्रॅमसाठी ३ हजार ७२० रुपयांवरून ३९ हजार ८९० रुपयांवर पोहोचला आहे. जयपूरमध्ये
२४ कॅरेट सोन्याचा दर ४० हजार २० रुपये तर २२ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ३९ हजार ९००
रुपये नोंदवला गेला. सोन्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदाबाद शहरातही
२४ कॅरेट ४० हजार आणि २२ कॅरेट सोन्याचा दर ३९ हजार ८७० रुपये इतका होता.
सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून,
चांदीचा दर प्रति किलोग्रॅमसाठी ४६ हजारांवर गेला आहे.
****
वीस टक्के अनुदानित शाळांना
प्रचलित नियमांनुसार अनुदान द्यावं, तसंच राज्यातल्या अघोषित शाळांना घोषित करून अनुदान
द्यावं, या मागण्यांसाठी काल औरंगाबाद जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या शैक्षणिक बंदला
संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातल्या सुमारे एक हजार प्राथमिक आणि माध्यमिक शाळा
तसंच जवळपास दिडशे महाविद्यालयं या बंदमध्ये सहभागी झाली. शिक्षक संघटनांनी एकत्रित
येत औरंगाबाद इथं आंदोलनही केलं. जोपर्यंत शासन अनुदान देत नाही तोपर्यंत हे आंदोलन
सुरूच राहणार असल्याचा इशारा या शिक्षक संघटनांनी दिला आहे.
दरम्यान, परभणी जिल्यात या आंदोलनादरम्यान शाळा, महाविद्यालयं बंद होती. संस्था चालकांनीही
शिक्षकांच्या या बंदमध्ये सहभाग घेतला होता.
याच मागणीसाठी मुंबईच्या
आझाद मैदानात मोर्चा काढणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांवर पोलिसांनी काल लाठीमार केला. त्यात १० ते १५ शिक्षक जखमी झाले. त्यानंतर या शिक्षकांच्या
पाच जणांच्या शिष्टमंडळानं काल शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन चर्चा केली.
****
हिंगोली जिल्ह्यातील
औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग इथं श्रावण महिन्यांमधील चौथ्या आणि शेवटच्या सोमवारी काल
भाविकांची मोठी गर्दी झाली होती. चार लाख भाविकांनी यावेळी श्री नागनाथाचं दर्शन घेऊन प्रामुख्यानं मराठवाड्यावरील दुष्काळाचं
सावट दूर व्हावं आणि भरपूर पाऊस पडावा यासाठी साकडं घातल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे. मंदिर समितीनं रात्री दोन वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं केलं होतं. बीड जिल्ह्यातल्या
परळी वैद्यनाथ आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या घृष्णेश्र्वर मंदिरातही महादेवाच्या दर्शनासाठी
काल भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
****
जालना जिल्ह्यातल्या
बदनापूर तहसील कार्यालयासमोर काल छावा मराठा संघटनेच्या २५ कार्यकर्त्यांनी रॉकेल अंगावर
ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना
ताब्यात घेतलं. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा तसंच लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विजयकुमार घाडगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा
म्हणून हे कार्यकर्ते आत्मदहन करत होते. या आंदोलकांविरूद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment