Thursday, 22 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ ऑगस्ट २०१९ दुपारी .०० वा.
****

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईत अंमलबजावणी संचालनालय- ईडीच्या कार्यालयात हजर झाले, यावेळी त्यांचे कुटुंबीयही हजर होते. ईडीनं कोहीनूर मिल गैरव्यवहार प्रकरणी ठाकरे यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं.

दरम्यान ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण मार्गानं आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरात जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
****

 अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी आज दहाव्या दिवशी सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनापीठासमोर आज, गोपालसिंह विशारद यांच्यावतीनं ज्येष्ठ विधीज्ञ रणजीत कुमार हे युक्तिवाद करत आहेत. ही जागा स्वत:च दैवी स्थान असून, त्या ठिकाणी पूजा करण्याचा आपला अधिकार कायम राहावा, या अधिकारावर गदा आणली जाऊ नये, असं विशारद यांच्यावतीने रणजीत कुमार यांनी न्यायालयाला सांगितलं.

 अलाहाबाद उच्च न्यायालयानं, ही वादग्रस्त जागा सुन्नी वक्फ मंडळ, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला विराजमान या तीन पक्षांमध्ये समान वाटप करण्याचा निर्णय दिला होता, या निर्णयाला चौदा विविध याचिकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, विशारद हे या चौदा याचिकाकर्त्यांपैकी एक आहेत.
****

 केंद्रीय अन्वेषण विभाग -सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय - ईडी या दोन्ही यंत्रणा, वैयक्तिक सूड घेण्याचे विभाग म्हणून वापरले जात असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. काँग्रेस नेते तसंच माजी केंद्रीय अर्थ आणि गृहमंत्री पी चिदंबरम यांना काल सीबीआयनं अटक केली, या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणातले अन्य अनेक आरोपी मोकाट असताना, चिदंबरम यांना मात्र कोणताही कायदेशीर आधार नसताना, अटक केल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधल्या ताब्यात घेतलेल्या विविध नेत्यांची तत्काळ सुटका करावी, या मागणीसाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आणि द्रमुकसह इतर विरोधी पक्षांनी आज नवी दिल्लीत निदर्शनं केली. चिदंबरम यांचे पुत्र खासदार कार्ति चिदंबरम ही या आंदोलनात सहभागी झाले. काश्मीर खोऱ्यात दूरसंचार सेवा बहाल करण्यासह इतर मागण्याही या पक्षांकडून करण्यात आल्या.

 प्रधानमंत्री किसान मानधन ही योजना अल्प आणि अत्यल्प भू धारक असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्‍न करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले. पालघर इथं प्रधानमंत्री किसान मानधन आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा त्यांनी घेतला. प्रधानमंत्री किसान मानधन ही ऐच्छिक आणि अंशदायी निवृत्ती वेतन योजना असून, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा ३००० रूपये मिळणार आहेत. तसचं प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत गरीब रूग्णांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा मिळणार असुन, जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावं असं आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केलं आहे.
****

 सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परिक्षेतला गलथान कारभार उघडकीस आला आहे. राज्य परिवहन वाहक, चालक 2018-2019 च्या परीक्षेत ३८ गुणांनी उत्तीर्ण असणाऱ्यांना पात्र केले, मात्र ५२ गुण असणाऱ्यांना अनुत्तीर्ण घोषीत केल्यामुळे १४१ उमेदवार  नोकरीपासून वंचित राहिले आहेत. संबंधीत उमेदवारांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना निवेदन दिलं, ठाकरे यांनी परिवहन मंत्र्याबरोबर चर्चा करुन, या प्रश्नी मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं आहे.
****

 अमरावती इथं राज्यशासनानं जिल्हा बँकेच्या ८७ हजार शेतकऱ्यांना ३३४ कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्हा प्रशासन आणि जिल्हास्तरीय बॅकर समितीद्वारे जिल्ह्यातील बँकांना लक्षांक दिला जातो. जून आणि जुलै मध्ये कर्ज वाटप केल्यानंतर ऑगस्टमध्ये कर्जवाटपाचं प्रमाण कमी होत, आतापर्यंत 157 कोटी ६५ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आलं असल्याची माहिती, आमच्या वार्ताहरानं कळवली आहे.
****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान, दोन सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका आजपासून वेस्ट इंडिज इथं सुरु होत आहे. कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात भारतीय संघ हे सामने खेळणार आहे.
*****
***

No comments: