Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 26 August 2019
Time 7.10 AM to 7.20
AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२६ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø
जागतिक बॅडमिंटन
स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला तर जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत कोमालिका बारीला अजिंक्यपद; कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर ३१८
धावांनी विजय
Ø
देश प्लास्टिक
मुक्त करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Ø
पालघर जिल्ह्यातले
बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांचा शिवसेनेत प्रवेश
आणि
Ø
पावसाचं कमी
होणारं प्रमाण ही मराठवाड्यासाठी धोक्याची घंटा असल्याचा पाणी परिषदेचा इशारा
****
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत
पी. व्ही. सिंधूनं तर जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत कोमालिका बारीनं काल अजिंक्यपद
मिळवलं. क्रिकेटमध्येही काल भारतीय संघानं वेस्ट इंडिजविरूद्ध ३१८ धावांनी विजय मिळवला.
स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन
अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावत
इतिहास रचला आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात
सिंधुनं आपल्या दिमाखदार आणि धडाकेबाज खेळाद्वारे जपानच्या नोझोमी ओकुहारा हिला २१-७, २१-७ असं केवळ ३३ मिनिटांतच पराभूत
केलं. बॅडमिंटनमधल्या पहिल्या क्रमांकाच्या, अत्यंत
प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत, पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावण्याचा मान सिंधुनं मिळवला आहे.
****
स्पेनमधल्या माद्रीद इथं सुरु असलेल्या जागतिक युवा
तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या कोमालिका बारीनं अजिंक्यपद मिळवलं. बारीनं जपानच्या सोनोदा
वॉका हिचा अंतिम फेरीत सात-तीननं पराभव केला. आणि भारतासाठी दुसरं सुवर्णपदक जिंकलं.
भारतानं त्याआशी कनिष्ठ मिश्र जोडी स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं आहे.
****
वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात
काल भारतानं ३१८ धावांनी विजय मिळवला. अजिंक्य राहणेच्या १०२, हनुमा विहारीच्या ९३
धावांच्या जोरावर भारतानं दुसरा डाव ७ बाद ३४३ धावांवर घोषित केला. त्यामुळे वेस्ट
इंडिजला विजयासाठी ४१९ धावाचं आव्हान मिळालं.
मात्र त्यांचा दुसरा डाव अवघ्या २६ षटक आणि ५ चेंडूत १०० धावांवर संपुष्टात आला.
****
महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंती निमित्त यावर्षी
प्लास्टिक मुक्त भारत अभियान सुरू करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं
आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते. केवळ एक वेळ उपयोगात येणाऱ्या
प्लॉस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यात यावा, असा आग्रह त्यांनी यावेळी केला असून देशातल्या
सर्व नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती, शासकीय-अशासकीय व्यवस्था,
सर्व संस्था, प्रत्येक नागरिकानं प्लास्टिक कचरा संकलन आणि साठवणुकीसाठी योग्य ती व्यवस्था
करावी. या प्लॉस्टिकची दिवाळीपूर्वी विल्हेवाट लावण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रानं पुढं
यावं, असंही ते यावेळी म्हणाले.
११ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा’
या अभियानातही सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कुपोषणाविरुद्धची लढाई प्रभावीपणे
लढण्यासाठी सप्टेंबर महिनाभर देशात 'पोषण अभियान' राबवलं जाणार आहे. तसंच २९ ऑगस्टला
'राष्ट्रीय क्रीडा दिना'पासून देशभरात 'फिट इंडिया मूव्हमेंट' सुरू करणार असल्याचंही
त्यांनी जाहीर केलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या
महाजनादेश यात्रेचा पुढचा टप्पा आजपासून अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी इथून पुन्हा
सुरू होत आहे. माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे अहमदनगर शहर आणि
जिल्ह्याच्या उत्तर भागातल्या सभा रद्द करण्यात आल्या आहेत. आज पाथर्डीत मुख्यमंत्री
पहिली सभा घेतील, त्यानंतर बीड, कडा -आष्टी आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं त्यांच्या
सभा होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा काल जालना
आणि बीड जिल्ह्यात गेवराई इथं आली. जालन्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गेवराईत
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभेतून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष
आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली.
****
पालघर जिल्ह्यातले बोईसर मतदारसंघाचे बहुजन विकास
आघाडीचे आमदार विलास तरे यांनी काल आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याचं पक्षात स्वागत केलं.
****
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी अर्थमंत्री
अरूण जेटली यांच्या पार्थिवावर काल दिल्लीच्या निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
करण्यात आले. तत्पूर्वी, जेटली यांचं पार्थिव भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात अंतिम
दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. शनिवारी जेटली यांचं दीर्घ आजारानंतर निधन झालं होतं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
दिवसेंदिवस पावसाचं कमी होणारं प्रमाण ही मराठवाड्यासाठी
धोक्याची घंटा आहे, असं मत काल दुसऱ्या दिवशी औरंगाबाद इथं पाणी परिषदेत व्यक्त करण्यात
आलं. काल या परिषदेचा समारोप झाला. पाणीटंचाईच्या स्थितीवर नियोजन आणि उपाय सुचविण्यासाठी
ही पाणी परिषद भरवण्यात आली होती. परिषदेत मांडण्यात आलेल्या सर्व सूचनांचा एकत्रित
ठराव राज्य शासनास सादर केला जाणार असल्याची माहिती परिषदेचे मुख्य संयोजक औरंगाबाद
विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.
परिषदेच्या कालच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे, कृषीभूषण विजयअण्णा बोराडे,
शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक भास्कर मुंढे यांच्यासह इतरांनी मार्गदर्शन
केलं.
****
देशाचं सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी चिंतन आणि
मार्क्सवादाच्या विचाराची गरज असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं काल साहित्य अकादमी आणि मराठवाडा साहित्य परिषदेनं
घेतलेल्या मार्क्सवाद आणि मराठी साहित्य या विषयावरील दोन दिवशीय चर्चासत्राच्या समारोप
प्रसंगी ते बोलत होते. सध्याचं सरकार जागतिकीकरणाच्या
रेट्यात एकेक कायदे नष्ट करत असून कॉर्पोरेट
क्षेत्राच्या इशाऱ्यावरच हे सगळे सुरू असल्याचा आरोपही त्यांची यावेळी केला.
****
शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्यास सामाजिक दुष्परिणाम
होतील, असं मत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं एमजीएम
परीसरात एका व्याख्यानात काल ते बोलत होते. केंद्र शासनानं शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी २१ दिवसांचे
अधिवेशन बोलवावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
****
लातूर इथ काल लिंगायत समाज राज्यव्यापी आरक्षण अधिवेशन
पार पडलं. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे आमदार अमित देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांसह अन्य मान्यवर उपसस्थित होते.
****
परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात अपुऱ्या पावसामुळे
भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी काठावरच्या गावांतल्या लोकांना आणि जनावरांना
पिण्याचं पाणी उपलब्ध होण्यासाठी जायकवाडी धरणाचं पाणी गोदापात्रातून दिग्रस बंधाऱ्यात
सोडण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पालम तालुका शाखेनं, तहसीलदार
संतोषी देवकुळे यांच्याकडे, निवेदनाद्वारे केली आहे.
****
राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री
जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत काल बीड इथं आडत व्यापाऱ्यांची बैठक झाली. तसंच,
जनसेवा मानसोपचार आणि व्यसनमुक्ती केंद्राचं उदघाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
पारंपारिक प्रथा आणि प्रतिकांच्या जोखडामध्ये अडकलेल्या
महिलांनी, यातून बाहेर पडण्याचं आवाहन राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष
कवयित्री निरजा यांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच प्रगती
सार्वजनिक वाचनालयानं बुलढाणा इथं हे संमेलन घेतलं. संमेलनाचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या
मुक्ता दाभोळकर यांच्या हस्ते काल झालं.
*****
***
No comments:
Post a Comment