Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 27 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑगस्ट २०१९ दुपारी १.०० वा.
****
काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला
द्विपक्षीय प्रश्न असून, दोघांनी चर्चा करुन त्यावर तोडगा काढला पाहिजे, याबाबत भारत
आणि अमेरिका यांच्यात सहमती झाली आहे. याप्रश्नी कोणत्याही त्रयस्थाच्या मध्यस्थीची
शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. दोन्ही देश चर्चेतून
सर्व प्रश्न सोडवू शकतात, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काल फ्रान्समधे जी-७ देशांच्या
शिखर परिषदेदरम्यान मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांमधे विविध मुद्यांवर चर्चा झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले प्रश्न
द्विपक्षीय असून त्याबाबत इतर कोणत्याही देशाला कष्ट देण्याची आपली इच्छा नाही, हे
मोदी यांचं मत आपल्याना मान्य असल्याचं ट्रम्प यांनी बातमीदारांना सांगितलं. आपला तीन
देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी आज पहाटे नवी दिल्लीला परतले. पंतप्रधानांनी नंतर
भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
****
रिझर्व्ह बँकेनं केंद्र सरकारला एक लाख श्यहात्तर
हजार कोटी रुपये लाभांश आणि अतिरिक्त राखीव निधी म्हणून द्यायचा निर्णय घेतला आहे.
गेल्या आर्थिक वर्षातल्या अतिरिक्त एक लाख तेवीस हजार चारशे चौदा कोटी रुपयांच्या रकमेचा
त्यात समावेश आहे, तर सुधारित आर्थिक भांडवल आराखड्यानुसार निर्धारित अतिरिक्त तरतूद
म्हणून बावन्न हजार सहाशे सदोतीस कोटी रुपये दिले जाणार आहेत. अतिरिक्त राखीव निधी
सरकारकडे हस्तांतरित करण्याबाबत, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या
नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या शिफारशी रिझर्व्ह बँकेनं
स्विकारल्या असल्याचं बँकेनं एका निवेदनात म्हटलं आहे.
****
देशात डाळींचा अजिबात तुटवडा नसल्याचं सरकारनं स्पष्ट
केलं आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी नवी दिल्ली इथं ही
माहिती दिली. यंदा डाळींचं उत्पादन दोन कोटी साठ लाख टन होण्याचा अंदाज असून, दहा लाख
टन आयातीचा अंदाज आहे. सरकारकडे यंदा एकूण तीन कोटी सात लाख टन डाळ उपलब्ध असेल, त्यापैकी
दोन कोटी नव्वद लाख टन डाळ लागेल. शिवाय कुठंही साठेबाजी आढळली, तर सरकार कडक कारवाई
करेल. ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकार
दरांवर लक्ष ठेवून आहे, आणि गरजेनुसार योग्य कारवाई करेल, असं अन्न आणि सार्वजनिक वितरण
मंत्री पासवान यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेसाठी
आज जालना आणि औरंगाबादला येत आहेत. त्यांच्या महाजनादेश
यात्रेचं आज दुपारी एक वाजता शहागड इथं स्वागत
होणार आहे. दुपारी अडीच वाजता अंबड इथं महाजनादेश यात्रा जाहीर सभा होणार आहे. औरंगाबाद
मधील महाजनादेश यात्रा संध्याकाळी पाच वाजता चिकलठाणा इथून त्यांच्या उपस्थितीमध्ये
सुरू होणार आहे. मुख्यमंत्री संध्याकाळी सात वाजता खडकेश्वर इथल्या सांस्कृतिक मंडळाच्या
मैदानावर जाहीर सभा घेणार असून रात्री आठ वाजता मुंबईला रवाना होणार आहेत.
****
राज्यातलं भाजप शिवसेना सरकार घोषणाबाजी करण्यात
तरबेज असून, कार्यक्रम राबवण्याबाबत मात्र त्यांची कामगिरी सुमार असल्याची टीका काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेला प्रती
उत्तर देण्यासाठी काँग्रेसनं सुरू केलेल्या `पोल खोल` यात्रेप्रसंगी ते अमरावती इथं
पत्रकारांशी बोलत होते. सरकारनं दोन वर्षांपेक्षा अधिक काळापुर्वी जाहीर केलेली पीक
कर्ज माफीची योजना शेतकऱ्यांच्या व्यथा दूर करण्यात अयशस्वी ठरली असल्याचं त्यांनी
यावेळी नमुद केलं. राज्यातील सरकारनं पाच वर्षांत केलेली एकही घोषणा पूर्ण केली नसल्याचा
आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्यातील बेरोजगारी वाढत असून सरकार मात्र खासगी कंपन्या,
बांधकाम व्यावसायिकांना लाभ देत असल्याची टीकाही थोरात यांनी यावेळी केली.
****
राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या चाळीस हजार प्राथमिक
शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत असून, बावीस लाख विध्यार्थ्यांना त्याचा
लाभ मिळाला आहे. या कार्य़क्रमांतर्गत विद्यार्थ्यांमधील रचनावादी दृष्टीकोन विकसीत
करण्यावर भर देण्यात आहे तसंच विध्यार्थ्यांचं ज्ञान, कौशल्य आणि आकलन क्षमता वाढविण्यास
मदत होत आहे. हा कार्यक्रम मराठी प्रमाणेच हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषांमध्येही उपलब्ध
करण्यात आला असल्याची माहिती शासनानं कळवली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment