Sunday, 25 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑगस्ट २०१९ दुपारी .०० वा.
****

 महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंती निमित्त यावर्षी ‘स्वच्छता हि सेवा’ हे अभियान ११ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते. देशवासीयांनी श्रमदानाच्या माध्यमातून महात्मा गांधींना कार्यांजली अर्पण करावी, या कार्यक्रमांत सामुहिकता आणि सेवाभाव असावा, तसंच गांधीजींशी निगडीत देशातल्या कोणत्यातरी एका स्थळाला प्रत्येक नागरिकानं अवश्य भेट द्यावी, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.

 देशातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती, शासकीय-अशासकीय व्यवस्था, सर्व संस्था, प्रत्येक नागरिकानं प्लास्टिक कचरा संकलन आणि साठवणुकीसाठी योग्य ती व्यवस्था करावी. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रानं पुढं यावं, असंही ते म्हणाले.

 कुपोषणा विरुद्धची लढाई प्रभावीपणे लढण्यासाठी सप्टेंबर महिनाभर देशात 'पोषण अभियान' राबवलं जाणार आहे. तसंच २९ ऑगस्टला 'राष्ट्रीय क्रीडा दिना'पासून देशभरात 'फिट इंडिया मूव्हमेंट' सुरू करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
****

 भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आज दुपारी अडीच वाजता दिल्लीतील निगम बोध घाट इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पक्षाच्या मुख्यालयात आणण्यात आलं असून, तेथूनच अंत्ययात्रेला सुरवात होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. जेटली यांचं काल दुपारी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं.
****

 भारतीय रेल्वेनं,  रेल्वेच्या ६० हजार नऊशे सहा डब्यांमध्ये, दोन लाखांहून अधिक जैव शौचालयं बांधली आहेत. इतर डब्यांमध्येही जैव शौचालयं बांधण्याचं काम वेगानं सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. भारतीय रेल्वेच्या या जैव शौचालये प्रकल्पाचं तंत्रज्ञान रेल्वेच्या अभियंत्यांनी आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी विकसित केलं आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या निघाल्याचा प्रकार काल घडला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. फरीदा शेख, डॉ. फैसल खान यांनी जेवण पुरविणाऱ्या कंत्राटदाराला तत्काळ पुरवठा बंद करण्यास सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 जगात शोषण आणि शोषित अशी दरी कायम आहे, तोपर्यंत मार्क्सवादाचं महत्त्व कायम राहील असं मत, प्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केलं. साहित्य अकादमी आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं औरंगाबाद इथं "मार्क्सवाद आणि मराठी साहित्य' या विषयावरील दोन दिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. या चर्चासत्राचं उदघाटन पठारे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
****

 शासन आणि विद्यापीठं आपल्या स्तरावर कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहेत. विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांकडे वळावं आणि नोकरी-व्यवसायाच्या संधी मिळवाव्यात, असं आवाहन भारतीय वाणिज्य आणि व्यवस्थापन परिषदेचे महासचिव नरेंद्र गर्ग यांनी केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या व्यवस्थापनशास्त्र विभागाला त्यांनी काल भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला.
****
 परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात अपुऱ्या पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी काठच्या गावांतल्या लोकांना आणि जनावरांना पिण्याचं पाणी उपलब्ध होण्यासाठी जायकवाडी धरणाचं पाणी गोदापात्रातून दिग्रस बंधाऱ्यात सोडण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पालम तालुका शाखेनं, तहसीलदार संतोषी देवकुळे यांच्याकडे, निवेदनाद्वारे केली आहे.
****
 जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि धरणातील पाणीसाठा लक्षात घेता धरणाचे २४ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. धरणातून एक लाख ३० हजार ९४७ घनफूट प्रति सेकंद वेगाने पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांतील नागरिकांनी दक्ष राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत ४७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, वार्षिक सरासरीच्या ७१ टक्के पाऊस पडला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...