Saturday, 24 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.08.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२४ ऑगस्ट  २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  उच्च आर्थिक विकासाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजनांची घोषणा
Ø  पीक विमा योजनेअंतर्गत सरसकट सर्व शेतकऱ्यांना भरपाईची शिवसेनेची मागणी
Ø  कृष्णा खोऱ्याचं पाणी मराठवाड्याला देण्याच्या आराखड्यासाठी माहिती संकलनाला प्रारंभ
Ø  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा वर्धापनदिन साजरा
आणि
Ø  जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत, पी व्ही सिंधू तसंच बी साई प्रणीतची उपांत्य फेरीत धडक
****

 उच्च आर्थिक विकासाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल विविध उपाययोजनांची घोषणा केली. भांडवल बाजारात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी, शेअर्स आणि युनिटच्या खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारामध्ये होणाऱ्या अल्प आणि दीर्घ कालावधीच्या भांडवली लाभावर अर्थसंकल्पात सांगितलेला अधिभार, रद्द करत असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. स्टार्टअप आणि त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर आकारण्यात येणारा अँजेल कराची तरतूदही रद्द करण्यात आली आहे. कंपन्यांकडून सामाजिक जबाबदाऱ्यांचं उल्लंघन होण्याचा प्रकार फौजदारी ऐवजी दिवाणी कारवाईला पात्र मानला जाईल. करांशी संबंधित सर्व आदेश आणि नोटीस आता केंद्रीकृत आणि संगणकीकृत प्रणालीतून पाठवली जातील, असं त्यांनी सांगितलं. स्टार्टअपशी संबंधित समस्यांवर विचार करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या एका सदस्याच्या अधिपत्याखाली गट तयार केला जाणार आहे.

 सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकासाठी ७० हजार कोटी रूपयांची अतिरिक्त मदत दिली जाणार असून पाच लाख कोटी रूपये कर्ज तथा तरलता कायम ठेवण्यासाठी दिली जातील. कंपन्यांसह, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, तसंच लहान - मोठ्या व्यापाऱ्यांना याचा लाभ मिळेल. बँकांनी व्याज दरात केलेल्या कपातीचा फायदा कर्जदारांना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. 
****

 भारतीय स्टेट बँकेने मुदत ठेवींवरच्या व्याज दरात अर्ध्या टक्क्यानं कपात केली आहे. सोमवारपासून हे नवीन दर लागू होतील. बचत खात्यावर एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर साडे तीन टक्के व्याज दर सध्या कायम ठेवण्यात आला आहे.
****

 तिहेरी तलाक कायद्यातल्या दंडात्मक तरतुदीची वैधता तपासण्यास, सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे. यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीसही बजावली आहे. नव्याने झालेल्या या कायद्यात, तिहेरी तलाक दिल्यास तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.

 मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण २०१९ कायद्याअंतर्गत घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन केल्यानं हा कायदा असंवैधानिक असल्याचं घोषित करावं, अशा आशयाच्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत.
****

 राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशा प्रमाणे दोषींविरोधात कारवाई करु असं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल महाजनादेश यात्रे दरम्यान धुळे इथं वार्ताहरांशी बोलत होते. भारतीय जनता पक्षात प्रवेश देतांना कार्यकर्त्यांना खुलेपणानं मात्र नेत्यांना चाळणी लावून प्रवेश दिला जाईल. कोणालाही पक्षात घेताना, तपासूनच घेतलं जाईल, असं सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केलं. धुळे जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांची पूर्तता तसंच मनमाड-धुळे -इंदूर रेल्वे मार्गाचं भूसंपादन, या अनुषंगाने बोलतांना मुख्यमंत्र्यांनी, या भागाच्या विकासासाठी भविष्यातही निधीची कमतरता पडू देणार नाही, असं नमूद केलं.
****

 सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळायाला हवी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असलेल्या पीक विमा योजनेत कंपन्यांच्या चुकीच्या कारभारामुळे ९० लाख शेतकरी या पीक विम्यास अपात्र ठरवले गेले, हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. आतापर्यंत १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपये भरपाई मिळाली आहे.
****

 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये आतापर्यंत ५०लाख ७० हजार कर्जदार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात आलं असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली, ते काल मुंबईत बोलत होते. या अंतर्गत २४ हजार १०२ कोटी रूपये, शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत ही योजना सुरू राहणार असल्याचं ते म्हणाले.
****

 कृष्णा खोऱ्यातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्याला देण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यासाठी माहिती संकलनाला प्रारंभ झाला आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी ५२९ मीटर उंच आहे तर पंढरपूर जवळ भीमा नदीची पातळी ४४० मीटर इतकी आहे. कृष्णा नदीचं पाणी ९० मीटर उंच असल्यानं हे पाणी देता येणं शक्य असल्याचा अभिप्राय जलसंपदा विभागाने दिलेला आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात हा प्रकल्प मार्गी लावण्याचे नियोजन सुरू झालं असल्याचं, आमच्या सांगलीच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा वर्धापनदिन काल विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यापीठात झालेल्या विशेष समारंभाला इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सचिव, माजी कुलगुरू डॉ. सच्चिनानंद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात डॉ जोशी यांनी, प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या तरुणांच्या बळावर या विद्यापीठाला पुढे नेण्याचं आवाहन केलं.
प्रख्यात इतिहास संशोधक डॉ. रा.श्री.मोरवंचीकर यांना यावेळी 'जीवन साधना पुरस्कार' प्रदान करण्यात आला. औरंगाबादचं देवगिरी महाविद्यालय, जालन्याचं बद्रीनारायण महाविद्यालय, बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथलं सुंदरराव सोळुंके महाविद्यालय आणि उस्मानाबादच्या रामकृष्ण परमहंस महावि़द्यालयाना आदर्श परीक्षा केंद्र पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.
****

 आगामी निवडणुकीत जनता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिशी उभी राहील, असा ठाम विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. काल परभणी जिल्ह्यात पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीचं उद्घाटन तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर, शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

 दरम्यान, येणारं सरकार कुठलेही असलं तरी मंत्रिमंडळ आपलंच असेल असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पक्षाच्या संवाद यात्रे दरम्यान, त्या काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. ईडी, सीबीआय, कारखान्यांचे कर्ज अशा चार-पाच कारणांमुळे पक्षांतर सुरू असून ही दबाव नीती असल्याचं आरोप त्यांनी यावेळी केला.
****

 शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर स्वतंत्र भारत पक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ३० जागा लढवणार असल्याचं, पक्षाकडून सांगण्यात आलं. औरंगाबाद इथं झालेल्या संयुक्त राज्य कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, काल औरंगाबाद इथं वार्ताहरांना याबाबत माहिती देण्यात आली. शेतीशी निगडित सर्व कर्ज आणि शेतकऱ्यांचं २३ हजार कोटी रुपयांचं वीज देयक माफ करण्यात यावं, शेतकऱ्यांना तंत्रज्ञान तसंच बाजारपेठेचं स्वातंत्र्य बहाल करण्यात यावं, आदी ठराव या बैठकीत घेण्यात आले.
****

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या प्राणीशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ यशवंत खिल्लारे यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६४ वर्षांचे होते. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या चोंडी या त्यांच्या मूळगावी काल त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****

 मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यातली एक जागा महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी म्हणून लढवणार असल्याची माहिती माजी आमदार लक्ष्मण माने यांनी दिली आहे. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कॉंग्रेस हा आमचा नैसर्गिक मित्र पक्ष आहे, त्यांच्यासोबत जाण्यात काही गैर नाही, या शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
****

 स्वित्झर्लंडमध्ये बसेल इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत, भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या, तर बी साई प्रणीतनं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या काल झालेल्या सामन्यात सिंधूनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या तैवानच्या झू यिंग ताई हिचं आव्हान १२-२१, २३-२१, २१-१९ असं परतवलं. तर पुरुष एकेरीत साई प्रणितनं, इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्ती खेळाडूचा २४-२२, २१-१४ असा पराभव केला.
****

 वेस्ट इंडीज इथं सुरू असलेल्या पहिल्या किकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर वेस्ट इंडीजच्या आठ बाद १८९ धावा झाल्या आहेत. भारतानं पहिल्या डावात दोनशे सत्त्याण्णव धावा केल्या असून, भारत एकशे आठ धावांनी आघाडीवर आहे.
****

 श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मध्यरात्री सर्वत्र भक्तिभावानं साजरा झाला. आज दहीहंडीचा उत्सव साजरा होईल.
*****
***

No comments: