Monday, 26 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.08.2019 11.00


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२६  ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 जम्मू काश्मिरमधल्या बहुतेक भागातून दिवसा घातलेले निर्बंध उठवण्यात आले आहेत. जम्मू काश्मिरमधे सर्व परिस्थिती नियंत्रणात असून इथं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असल्याचं पोलीसांनी म्हटलं आहे.  जम्मू काश्मिरमधल्या एकशे अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा निर्बंध लागू होते.
****

 नांदेड इथं काल एकदिवसीय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मोत्सव शताब्दी साहित्य संमेलनात अण्णाभाऊंचे साहित्य विचार आणि चळवळ या विषयावरील परिसंवादासह कथाकथन तसंच शाहिरी जलसा झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचं उदघाटन झालं. संमेलनाचं अध्यक्षपद डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी भूषवलं.
****

 नंदुरबार रेल्वे स्थानकावर काल रात्री झालेल्या दगडफेकीप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुरत - भुसावळ रेल्वेमध्ये महिलेची छेड काढल्याच्या प्रकार घडला होता. त्यानंतर संतप्त जमावानं रेल्वे स्थानक आणि परिसरात दगडफेक केली होती. 
****

 विना अनुदानित महाविद्यालयं आणि शाळांतल्या शिक्षकांना अनुदान सुरू करण्यात यावं, या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिक्षण संस्थाचालकांनी आज शाळा, कनिष्ठ महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ संघटनेनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे या आंदोलनाची माहिती दिली आहे. 
****

 भारतानं वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अँटीगुआ इथं ३१८ धावांनी दणदणित विजय मिळवला आहे. विजयासाठी ४१९ धावांचं लक्ष्य असलेला यजमान संघाचा डाव चौथ्या दिवशी केवळ शंभर धावांत गारद झाला. दुसऱ्या डावात शतक झळकवणारा अजिंक्य रहाणे आणि पाच गडी बाद करणारा जसप्रित बुमराह या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले. भारतीय क्रिकेट संघाचा विदेशातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेतील पुढील कसोटी ३० ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे.
****

 जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतपद मिळवलेल्या पी. व्ही. सिंधुवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद  यांनी संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे. सिंधुचं यश भविष्यातल्या खेळाडूंनाही प्रेरणा देत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
*****
***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...