Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 August
2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
येत्या पाच वर्षांत मराठवाडा दुष्काळ मुक्त करू, असं आश्र्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते आज बीड जिल्ह्यातील कडा- आष्टी इथं
महाजनादेश यात्रा जाहीर सभेत बोलत होते. बीड
जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला बदलण्यासाठी मतदारांनी पुन्हा एकदा
संधी द्यावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा बीडच्या
पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाड्यात आगमनाप्रसंगी धामनगाव इथं या यात्रेचं मोठं स्वागत करण्यात आलं. तत्पूर्वी,
राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारनं सर्वात मोठी कर्जमाफी केली असून यापूर्वी
कोणत्याच सरकारनं अशी कर्जमाफी केलेली नव्हती, असं मुख्यमंत्री अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी
इथं आयोजित महाजनादेश यात्रे दरम्यान म्हणाले. मुख्यमंत्री या महाजनादेश यात्रेसाठी
उद्या औरंगाबाद जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्यात आडूळ इथं ही महाजनादेश यात्रा सुरू होईल
आणि संध्याकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होईल, असं राज्याचे
उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
राज्यात उद्योग वाढीला चालना देण्यासाठी शासनानं विविध
धोरणं आखली असून येत्या काळात किनारपट्टीलगत डेटा सेंटर पार्क, एकात्मिक औद्योगिक क्षेत्र, निर्यात परिषद स्थापन
करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत दिली.
औद्योगिक विकास महामंडळ आणि उद्योजकांच्या संघटनेनं देशातील काही प्रमुख कंपन्यांच्या
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून
ते बोलत होते. राज्याला लाभलेल्या सातशे वीस किलो मीटर लांबीच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर
ऑप्टिकल फायबरयुक्त डेटा सेंटर पार्क सुरू करण्याचा शासनाचा विचार असून याद्वारे अनेकांना
रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शासन उद्योग वाढीसाठी नवनवीन
धोरणं आखत आहे. त्याचा लाभ उद्योगांना होत आहे. फिनटेक, इलेक्ट्रिक वाहनं, महिला धोरणांचा
नव्या औद्योगिक धोरणात समावेश करण्यात आलेला असल्याचं उद्योग मंत्री देसाई यावेळी म्हणाले.
****
श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर आणि पालखीतळ
मार्गावरील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनानं सुमारे एक हजार चारशे अठ्ठावीस
कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी दिली आहे. ते आज मुंबईत बोलत होते. या आराखड्यातील या वर्षातील कामांसाठी पुणे
विभागीय आयुक्तांना अठ्ठेचाळीस कोटी नऊ लाख चौऱ्यान्नव हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून
देण्यात आल्याची माहितीही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
वीस टक्के अनुदानित शाळांना प्रचलित नियमांनुसार अनुदान
द्यावं, तसंच राज्यातल्या अघोषित शाळांना घोषित करून अनुदान द्यावं, या मागण्यांसाठी
आज औरंगाबाद जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या शैक्षणिक बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यातल्या सुमारे एक हजार प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसंच जवळपास दिडशे महाविद्यालयं
या बंदमध्ये सहभागी झाली. शिक्षक संघटनांनी एकत्रित येत औरंगाबाद इथं आंदोलनही केलं.
जोपर्यंत शासन अनुदान देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा या
शिक्षक संघटनांनी दिला आहे. दरम्यान, परभणी जिल्यात या आंदोलनादरम्यान शाळा, महाविद्यालयं बंद होती. संस्था चालकांनीही शिक्षकांच्या या बंदमध्ये सहभाग
घेतला होता.
****
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग इथं श्रावण
महिन्यांमधील चौथ्या आणि शेवटच्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. चार लाख
भाविकांनी यावेळी श्री नागनाथाचं आज दर्शन घेऊन प्रामुख्यानं मराठवाड्यावरील दुष्काळाचं
सावट दूर व्हावं आणि भरपूर पाऊस पडावा यासाठी साकडं घातल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे. मंदिर समितीनं रात्री दोन वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं केलं होतं.
****
जालना पोलीस दलानं चोरी, घरफोडी यासारखे २७ गुन्हे उघडकीस
आणून आरोपींकडून हस्तगत केलेला अठ्ठावीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक एस.
चैतन्य यांच्या हस्ते मूळ मालकांना परत केला. पोलिस अधीक्षक कार्यालयातल्या सभागृहात
यानिमित्त आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
No comments:
Post a Comment