Friday, 23 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑगस्ट २०१९ दुपारी .०० वा.
****
तिहेरी तलाक कायद्यातल्या दंडात्मक तरतुदीची वैधता तपासण्यास, सर्वोच्च न्यायालयानं मंजूरी दिली आहे. यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीसही बजावली आहे. नव्याने झालेल्या या कायद्यात, तिहेरी तलाक दिल्यास तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.
या कायद्याच्या वैधतेला आव्हान देत, मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण २०१९ कायद्याअंतर्गत घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन केल्यानं असंवैधानिक म्हणून घोषित करावं, अशा आशयाच्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. न्यायालय या प्रकरणाची तपासणी करेल, असं न्यायमूर्ती एन.व्ही.रमणा आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या पीठानं याचिकाकर्त्यांचे वकील सलमान खुर्शीद यांना सांगितलं आहे.
****
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सुनावणी घेत असलेल्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ सुनावणी पूर्ण होईपर्यंत वाढवण्याबाबतचे आदेश दोन आठवड्यात जारी करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला पुन्हा एकदा दिले आहेत. यापूर्वीही न्यायालयानं राज्यसरकारला हे निर्देश दिले होते, मात्र त्यासंबंधी काहीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. दरम्यान या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मागणी केल्यानुसार त्यांना सुरक्षा पुरवण्याची सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला केली आहे. संबंधित न्यायाधीशांनीही बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल पुढच्या नऊ महिन्यांत लावावा, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात एका सैनिकाला वीरमरण आलं. राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये आज पहाटे झालेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्यानंही चोख उत्तर दिलं. सतरा ऑगस्टपासून पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात वीरमरण आलेला हा चौथा सैनिक आहे.
****
दहशतवादाला खतपाणी आणि काळा पैसा वैध करण्यावर लक्ष ठेवण्यासंदर्भात स्थापन आशिया प्रशांत समूहाच्या आर्थिक कृती दलानं पाकिस्तानला काळ्या यादीत टाकलं आहे. यासंदर्भात आवश्यक असलेल्या चाळीस पैकी बत्तीस नियमांचं पाकिस्तानकडून पालन होत नसल्यानं, ही कारवाई करण्यात आली.
****
माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह यांनी आज राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. सदनाचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. सभापतींच्या दालनात झालेल्या या शपथग्रहणाला काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते.
****
राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा प्रमाणे दोषींविरोधात कारवाई करु असं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज महाजनादेश यात्रे दरम्यान धुळे इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपात प्रवेश देतांना कार्यकर्त्यांना खुलेपणाने मात्र नेत्यांना फिल्टर लावून प्रवेश दिला जाईल. कोणाला पक्षात घ्यायचं हे तपासूनच घेतले जाईल. असे सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केलं. विरोधकांनी भाजपच्या मेगा भरतीची काळजी करण्याऐवजी आपल्या पक्षांला लागलेल्या मेगा गळतीची चिंता करावी, असंही मुख्यमंत्री म्हणाले. धुळे जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांची पूर्तता तसंच मनमाड-धुळे -इंदूर रेल्वे मार्गाचं भूसंपादन, या अनुषंगाने बोलतांना मुख्यमंत्र्यांनी, या भागाच्या विकासासाठी भविष्यातही निधीची कमतरता पडू देणार नाही, असं नमूद केलं.
****
कृष्णा खोऱ्यातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्याला देण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यासाठी माहिती संकलनाचं काम सध्या सुरू आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी ५२९ मीटर उंच आहे तर पंढरपूर जवळ भीमा नदीची पातळी ४४० मीटर इतकी आहे. कृष्णा नदीचं पाणी ९० मीटर उंच असल्याने हे पाणी देता येणं शक्य असल्याचा अभिप्राय जलसंपदा विभागाने दिलेला आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात हा प्रकल्प मार्गी लावण्याचे नियोजन सुरू झालं असल्याचं, आमच्या सांगलीच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे.
****
पूर्णा ते पाटणा दरम्यान धावणारी गाडी क्रमांक १७६१० सात्पाहिक एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या १७६०९ पटना ते पूर्णा साप्ताहिक एक्स्प्रेस २५ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभागानं दिली आहे.
****
श्रीकृष्ण जन्माष्टमी आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी होत आहे. आज मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये या निमित्तानं कृष्ण जन्म सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****




No comments: