Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२८ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø कोकणातून पाणी आणून मराठवाड्याचा दुष्काळ संपवण्याचा राज्य सरकारचा निर्धार
Ø औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी सोळाशे कोटी तर रस्त्यांसाठी २००
कोटी रूपये देण्याचं राज्य सरकारचं आश्वासन
Ø
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातलं जागा वाटप एका दिवसात करू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि
Ø
मराठवाड्यातला मानव विकास निर्देशांक वाढवण्यासाठी
पन्नास कोटी रूपयांचा निधी
****
मराठवाड्यातला दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी कोकणातून
पाणी आणलं जाईल, यामुळे मराठवाड्यातल्या भावी पिढ्यांना दुष्काळ पाहावा लागणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद
तसंच जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं महाजनादेश यात्रे दरम्यान जाहीर सभेत ते काल बोलत होते.
औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेला संबोधित करतांना मुख्यमंत्री
फडणवीस यांनी समृध्दी महामार्ग तयार झाल्यानंतर उद्योगांचं मॅग्नेट औरंगाबाद - जालना
शहरादरम्यान राहील, असं सांगितलं.
दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिका -डीएमआयसीमध्ये अनेक उद्योग येऊ घातले असून
मोठ्या प्रमाणावर रोजगारीचा प्रश्न सुटणार असल्याचं ते म्हणाले. औरंगाबाद शहराच्या
विकासासाठी सरकार कटीबध्द असून पिण्याच्या पाण्यासाठी सोळाशे कोटी रूपयांची योजना आणणार
असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. ते म्हणाले..
औरंगाबाद सभेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, ३-४ वर्ष आम्ही त्याठिकाणी
लक्ष घातलं, सुप्रिम कोर्टापर्यंत जाऊन लढलो. शेवटी सांगितलं , याचं नायनाट होऊद्या.
आता जो नवीन भाग आलाय या भागासहित योजना तयार करा. सोळाशे कोटी रूपयाची योजना तयार झाली. राज्य सरकार
मंजूर करेल आणि पाण्यापासून वंचित राहू देणार नाही.
याशिवाय औरंगाबाद शहरातल्या रस्त्यांसाठी आणखी २००
कोटी रूपये राज्य सरकार देईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
अंबड इथं झालेल्या जाहीर सभेत बोलतांना फडणवीस
यांनी मराठवाडा एकात्मिक पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून वीस हजार कोटी रुपये
खर्चून चौसष्ट हजार किलोमीटर जलवाहिनीच्या माध्यमातून धरणं एकमेकांना जोडण्यात येणार
असल्याचं सांगितलं. ते म्हणाले…
आपल्या पालक मंत्र्यांनी या ठिकाणी
मराठवाडा वॉटर ग्रीडची सुरूवात केली आणि या वॉटर ग्रीडच्या माध्यमातंन वीस हजार कोटी
रूपयांची ६४ हजार किलोमिटरची पाईपलाईन या संपूर्ण मराठवाड्यात टाकून, मराठवाड्यातील
प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरा मध्ये पिण्याचं पाणी, सगळी धरणे एकमेकांशी जोडून
त्या माध्यमातंन आम्ही करणार आहोत.
गावं आणि शहरातला पिण्याचा पाण्याचा दुष्काळ या योजनेच्या
माध्यमातून संपेल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी
यावेळी व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसला
विरोधी पक्ष बनवण्या इतक्याही जागा मिळणार नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी
शिवसेना आणि भाजप यांच्यात निश्चीतच युती होणार असून एका दिवसात जागा वाटप केलं जाईलं,
अस मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. मराठवाड्यातली
दुष्काळ परिस्थिती चिंताजनक असून एकात्मिक पाणी पुरवठा योजना तसंच कोकणातील पाणी गोदावरी
खोऱ्यात आणल्यानंतर मराठवाड्यातील दुष्काळ `इतिहास जमा` होईल, असं मुख्यमंत्री यावेळी
म्हणाले. मराठवाड्यात कृत्रिम पावसाची चाचणी सुरू असून ढगाळ वातावरण जसं येईल तसा पाऊस
पाडला जाईल. आतापर्यंत कृत्रिम पाऊस पाडण्यात यशं आलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
कायम विनाअनुदानित शिक्षक आंदोलनाबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच योग्य तो निर्णय
होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
राज्य सरकारकडून कोयनेचं
सहासष्ट अब्ज घनफूट पाणी मुंबईला नेण्याचा विचार सुरू असून कोकणची पाण्याची गरज पूर्ण
झाल्याशिवाय मुंबईला पाणी नेऊ देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी काल रोहा इथं वार्ताहरांशी बोलतांना जाहीर केली.
कोयनेचं सहासष्ट अब्ज घनफूट पाणी कुंडलिका नदीत येतं, त्यामुळं परिसरातल्या गावांना
पाणी मिळतं. मात्र हे पाणी इतरत्र गेल्यास पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळं
सरकारनं अगोदर कोकणातल्या गावांना पाण्याचा साठा उपलब्ध करून द्यावा आणि नंतरचं हे
पाणी अन्यत्र वळवावं असंही तटकरे यांनी यावेळी नमूद केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
मराठवाड्यातला मानव विकास
निर्देशांक वाढवण्यासाठी पन्नास कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती मराठवाडा
विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते.
जालना, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांचा मानव निर्देशांक सरासरीपेक्षा
कमी असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून
या संदर्भात योजना राबवण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात येणार आहेत. मानव विकास तसंच विभागीय
आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रस्तावांची छाननी करून मान्यता देणार असल्याचं
डॉ.कराड यांनी सांगितलं.
****
सांगली, कोल्हापूर, कोकण आणि इतर पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांचं कर्ज
माफ करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. मात्र, त्यामध्ये खरीप २०१९ हंगामातल्या पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ
करण्यात येईल, असं नमूद करण्यात आलं होतं. त्यामध्ये
पूरग्रस्त बाधीत शेतकऱ्यानं नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेलं कर्ज माफ होणार अशी सुधारणा केली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत
पाटील यांनी काल दिली. पिकांच्या पंचनाम्यानंतर पिकावरील बँकांच्या कर्ज
मर्यादेपर्यंतची रक्कम राज्य शासन बँकांना देणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले नाही, मात्र,
पुरामुळे पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही सर्वसाधारण नुकसान
भरपाईच्या तीन पट भरपाई देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
सोलापूर जिल्ह्यातले बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांनी काल आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
यांना दिला. या वेळी त्यांच्यासोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई तसंच मिलिंद नार्वेकर
होते. सोपल आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
****
परभणी तालुक्यातल्या सायाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच
लक्ष्मण खाटिंग यांना दहा हजार रूपयांची लाच घेतांना काल अटक करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या
गाळे बांधकामासाठी खर्च केलेल्या बेचाळीस हजार रूपयांचा धनादेश देण्यासाठी खाटींग यांनी
ही लाच मागितली.
****
देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं
तातडीनं धोरणं आखण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार
सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल नाशिक इथं पक्षाच्या संवाद दौऱ्यानिमित्त
आल्या असता वार्ताहरांशी बोलत होत्या. देशातल्या बेरोजगारीसह अनेक प्रश्न सोडवण्यात
केंद्र सरकार अयशस्वी ठरलं असल्याची टीका त्यांनी केली.
****
राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या चाळीस हजार प्राथमिक
शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबवण्यात येत असून, बावीस लाख विध्यार्थ्यांना त्याचा
लाभ मिळाला आहे. या कार्यक्रमातर्गंत विद्यार्थ्यांमधील रचनावादी दृष्टीकोन विकसित
करण्यावर भर देण्यात येणार आहे, तसंच विद्यार्थ्यांचं ज्ञान, कौशल्य आणि आकलन क्षमता
वाढवण्यास मदत होत आहे. हा कार्यक्रम मराठी प्रमाणेच हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषांमध्येही
उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती शासनानं कळवली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment