Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 25 August 2019
Time 7.10 AM to 7.20
AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२५ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
Ø
वीज निर्मितीत
मुबलक वाढ झाल्यानं राज्य भारनियमन मुक्त - ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Ø दहीहंडी फोडतांना मुंबई आणि ठाण्यात १३३ गोविंदा जखमी
Ø
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.
सिंधूची अंतिम फेरीत धडक
आणि
Ø वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतची दुसऱ्या डावात २६० धावांची
आघाडी
****
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या पार्थिवावर
आज दुपारी चार वाजता दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जेटली यांचं काल
दीर्घ आजारानं निधन झालं,
ते ६७ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून आजारी असलेल्या जेटली यांना नऊ ऑगस्टपासून
दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं,
उपचारादरम्यान काल दुपारी त्यांचं निधन झालं.
राष्ट्रपती रामनाथ कोंविद,
उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेटली यांच्या निधनाबद्दल
तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राष्ट्र उभारणीच्या काळात त्यांनी दिलेलं योगदान लक्षणीय
असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी
जेटली कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचं सांत्वन केलं. केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा आणि केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांसह, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच
अनेक नेत्यांनी जेटली यांच्या निवासस्थानी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण
केली. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता
बॅनर्जी, यांनीही जेटली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मोदी सरकारच्या पहिल्या
कार्यकाळात अर्थमंत्री तसंच संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या जेटली यांनी,
अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये कायदा मंत्रालयाचं काम सांभाळलं होतं. कंपनी व्यवहार,
वाणिज्य आणि उद्योग, कायदा तसंच न्याय, आणि माहिती - प्रसारण मंत्रालयावर जेटली यांनी
आपला ठसा उमटवला. आजारपणामुळे ते २०१९ चा अर्थसंकल्प सादर करू शकले नव्हते. प्रकृती
अस्वास्थामुळे त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रिपदाची जबाबदारी देऊ
नये असं लेखी पत्राद्वारे पंतप्रधान मोदी यांना कळवलं होतं. जेटली यांच्या अर्थमंत्रिपदाच्या
काळातच मोदी सरकारने विमुद्रीकरण तसंच वस्तू आणि सेवा करासारखे महत्त्वपूर्ण निर्णय
लागू केले.
****
गेल्या पाच वर्षात वीज
निर्मितीत मुबलक वाढ झाल्यानं राज्य भारनियमन मुक्त झालं असून सर्व भागांमध्ये अखंडित
वीजपुरवठा शक्य झालं असल्याचं उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते
काल मुंबईत बोलत होते. अखंडित वीज पुरवठ्यामुळे कृषी ग्राहकांना चक्राकार पद्धतीने
दररोज आठ ते दहा तास वीजपुरवठा शक्य झाला आहे. सौर कृषीपंप देऊन शेतजमीन ओलिताखाली
आणण्यासाठी सहाय्य केलं जात असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं
****
खासदार उदयनराजे भोसले
भाजपमध्ये आल्यास आपल्याला आनंदच होईल. भाजप प्रवेशाचा निर्णय सर्वस्वी त्यांचाच असेल,
अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान, जळगाव
जिल्ह्यातल्या भुसावळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ
नेते आहेत. त्यांना केंद्रात पाठवायचे की राज्यात ठेवायचे, हे पक्षश्रेष्ठी ठरवतील
असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानाचा पदभार स्विकारल्यानंतर
हा या कार्यक्रमाचा तिसरा भाग आहे. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्या, दूरदर्शनवरून या कार्यक्रमाचं
प्रसारण केलं जाणार आहे.
****
मुंबई आणि महाराष्ट्राच्या
अनेक भागांत काल दहीहंडी उत्सव साजरा झाला. मुंबई आणि उपनगरात दहीहंडी फोडतांना ११९
तर ठाणे इथं १४ गोविंदा जखमी झाले. यातले बहुसंख्य गोविंदा थर लावतांना जखमी झाले.
पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापूरामूळं मुंबईसह
अनेक ठिकाणच्या मोठ्या दहिहंड्या रद्द करून, हा निधी पूरग्रस्तांसाठी देण्यात आला.
जालना शहरात मुंबई इथल्या १२० गोपिका पथकासमवेत हा उत्सव साजरा करण्यात आला. महिलांना
प्रेरणा मिळावी, तसंच सामाजिक ऐक्य टिकवून राहावं, या उद्देशानं जालन्यात प्रथमच मोठ्या
स्वरुपात या उत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी यावेळी
सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठाचा ३८ वा वर्धापनदिन काल साजरा झाला. यावेळी बोलतांना सर्वोच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती उदय ललित यांनी वकिली करतांना
तरूण वकिलांनी नाउमेद न होता पुढे जायला हवं असं मत व्यक्त केलं. मेहनत केली तर मोबदला
मिळतोच, असं सांगून ध्येयाशक्ती कायम ठेवली पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं. १९८१ मध्ये
या खंडपीठाची स्थापना झाली. कार्यक्रमात औरंगाबाद खंडपीठाच्या इतिहासाची ध्वनी चित्रफित
दाखवण्यात आली.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं
काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या सहाव्या दिवशी बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं सभा झाली. यावेळी
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर जोरदार
टिका केली. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत खोटं बोलत असतील तर यासारखं दुर्दैव नाही
असं सांगून सध्याच्या मंदीच्या काळात नोकरभरती नाहीतर ही ओहोटी असल्याचीही टिका त्यांनी
केली. दरम्यान, यात्रा शहरात येताच राष्ट्रवादी काँगेसच्या अडीच हजार कार्यकर्त्यांनी
शहरातून मोटारसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं.
****
औरंगाबाद इथं दोन दिवसीय
राज्यस्तरीय पाणी परिषदेला कालपासून प्रारंभ झाला. नाशिक इथून सायकलपटूंनी आणलेल्या
गोदावरी नदीचं पाणी, मान्यवरांच्या हस्ते झाडांना टाकून या परिषदेचं उद्घाटन करण्यात
आलं. पुढच्या पिढीसाठी पाणी संवर्धनाचं काम सर्वच क्षेत्रातल्या नागरिकांनी करणं गरजेचं
असल्याचं मत या परिषदेत सहभागी जलतज्ज्ञांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केलं. महात्मा
गांधी मिशन संस्थेत आयोजित या दोन दिवसीय परिषदेत, जलसंवर्धन, वृक्षलागवड आणि भूजल,
कृषी आणि सिंचन, सामाजिक तसंच स्वयंसेवी संस्थाचं पाण्याविषयी कार्य, जलयुक्त शिवार,
शेततळे, सौर उर्जा या विषयांवर जलतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
****
विधानसभा निवडणुकीसाठी
संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. संभाजी
ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी औरंगाबाद इथं, पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन विधानसभा निवडणूक
लढवत असल्याचे, डॉ. भानुसे यांनी सांगितलं. संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाकडून शिलाई
मशीन हे अधिकृत चिन्ह मिळालं आहे.
****
इंडियन मेडिकल असोसिएशन-आय
एम ए लातूरच्या वतीनं सांगली, कोल्हापूर परिसरातल्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक औषधी
तसेच नवीन कपड्यांची मदत काल रवाना करण्यात आली. पाणी टंचाईच्या वेळी मिरज - सांगलीकरांनी
रेल्वेच्या माध्यमातून लातूरला पाणी पुरवठा केला होता. याची जाणीव ठेऊन पूरग्रस्तांना
मदत पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ.अजय जाधव यांनी सांगितलं.
****
स्वित्झर्लंड मधल्या
बसेल इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन
अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूनं अंतिम फेरीत धडक मारली आहे.
सिंधूनं तिसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेती गाठली असून काल झालेल्या उपांत्य फेरीत
तिनं चीनच्या खेळाडूचा २१-७, २१-१४ असा पराभव केला, पुरुष एकेरीत बी साई प्रणितला मात्र
या स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानानं लागलं.
****
वेस्ट इंडिज आणि भारत
यांच्यात ॲन्टिगुआ इथं सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी
काल खेळ संपला तेव्हा भारतानं आपल्या दुसऱ्या डावात तीन गड्यांच्या मोबदल्यात १८५
धावा केल्या होत्या. कर्णधार विराट कोहली ५१
तर अजिंक्य राहणे ५३ धावांवर खेळत आहेत. त्याआधी वेस्टइंडिजचा पहिला डाव २२२ धावांवर
संपुष्टात आला. भारताकडे आतापर्यंत एकूण २६० धावांची आघाडी झाली आहे
*****
***
No comments:
Post a Comment