Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 24 August
2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना राजकीय तसंच सामजिक क्षेत्रासह समाजाच्या
विविध स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोंविद, उपराष्ट्रपती
एम.व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेटली यांच्या निधनाबद्दल तीव्र
दुःख व्यक्त केलं आहे. राष्ट्र उभारणीच्या काळात त्यांनी दिलेलं योगदान लक्षणीय असल्याचं
राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह
भाजपच्या अनेक नेत्यांनी जेटली यांच्या निवासस्थानी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली
अर्पण केली. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी यांनीही जेटली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
जेटली यांचं आज दुपारी दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्स रुग्णालयात
निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. गेल्या ९ ऑगस्टपासून त्यांना एम्स रुग्णालयात भरती
करण्यात आलेलं होतं. गेल्या वेळच्या मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात त्यांनी अर्थमंत्री
तसंच संरक्षण मंत्री म्हणून काम केलं होतं.
अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी कायदा मंत्रालयाचं काम पाहिलं होतं. अरुण
जेटली यांनी संरक्षण, कंपनी व्यवहार, वाणिज्य आणि उद्योग, कायदा तसंच न्याय आणि माहिती
- प्रसारण मंत्रालयात आपला ठसा उमटविला. आजारपणामुळे ते २०१९ चा अर्थसंकल्प सादर करू
शकले नव्हते. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी २०१९ची लोकसभा निवडणुकही लढवली नाही. तसंच
यावेळी मंत्रीपदाची जबाबदारी देऊ नये असं त्यांनी लेखी पत्राद्वारे पंतप्रधान मोदी
यांना कळवलं होतं. जेटली यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळातच मोदी सरकारने नोट बंदी आणि
वस्तू आणि सेवा कर-जीएसटी सारखे महत्त्वपूर्ण निर्णय लागू केले.
जेटली यांचा पार्थिव देह उद्या भाजप मुख्यालयात बारा ते दोन यावेळेत अंत्यदर्शनासाठी
ठेवण्यात येणार असून दुपारी चार वाजता नवी दिल्ली इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहेत.
****
इंडियन मेडिकल असोसिएशन-आय एम ए लातूरच्या वतीनं सांगली, कोल्हापूर परिसरातल्या
पूरग्रस्तांना जीवनावश्यक औषधी तसेच नवीन कपड्यांची मदत नुकतीच रवाना करण्यात आली.
मिरज - सांगली येथील आयएमएचे सर्व पदाधिकारी पूरग्रस्तांना मदत करण्याकामी सक्रिय आहेत.
त्यांच्या माध्यमातूनच गरजूंना ही मदत पोहचवली जात आहे. पाणी टंचाईच्या वेळी मिरज
- सांगलीकरांनी रेल्वेच्या माध्यमातून लातूरला पाणी पुरवठा केला होता. याची जाणीव ठेऊन
पूरग्रस्तांना मदत पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ.अजय जाधव
यांनी सांगितलं.
****
आज देशभरात कृष्णजन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या
मथुरा आणि वृंदावनमध्ये जन्माष्टमीनिमित्त मोठी तयारी करण्यात आली आहे. जन्माष्टमीनिमित्त
देशविदेशातून भाविक मथुरा आणि वृंदावनमध्ये जमले आहेत.
दरम्यान, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्येही जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी
उत्सव साजरा करण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात
आलेल्या महापूरामूळं फारसा उत्साह नाही.
****
खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईल. भाजपमध्ये येण्याचा
सर्वस्वी निर्णय त्यांचाच असेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. येत्या विधानसभा निवडणुकीत
आमच्या महायुतीलाच जनता अभूतपूर्व यश देईल. तर गेल्या पाच वर्षांत विरोधकांना सूरच
सापडला नाही असंही ते म्हणाले. एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना केंद्रात
पाठवायचे की राज्यात ठेवायचं, हे पक्षश्रेष्ठी ठरवतील अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
****
पत्र सूचना कार्यालय, मुंबई यांच्या वतीने आज धुळे जिल्हा माहिती कार्यालयाच्या
सहकार्याने धुळे शहरात माध्यम कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेचे
उद्घाटन माहिती महासंचलानालयाचे संचालक हेमराज बागुल यांनी केलं. लोक कल्याण साधण्यासाठी
शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं
बागुल यावेळी म्हणाले.
****
भंडारा जिल्ह्यात महिला रुग्णालयाचं भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ परिणय फुके
यांनी आज केलं. १०० खाटांच्या या महिला रुग्णालयामुळे राज्य तसंच मध्यप्रदेशातील महिला
रूग्णांना आरोग्य सेवांचा लाभ मिळेल असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment