Friday, 23 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.08.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३  ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
महाजनादेश यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी म्हटलं आहे. ते आज धुळ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. या यात्रेचा दुसरा टप्पा कालपासून सुरू झाला, आतापर्यंत 43 विधानसभा मतदार संघांपर्यंत पोहोचलो असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या दुसऱ्या टप्प्याचा सोलापूरला समारोप होईल. तर तिसरा टप्पा १३ ते १९ सप्टेंबरदरम्यान प्रामुख्याने कोकण भागात राबवला जाणार आहे. 
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. या निमित्तानं विद्यापीठाच्या सभागृहात विशेष समारंभ आयोजित करण्यात आला आहे, या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ रा श्री मोरवंचीकर यांना जीवनसाधना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी औष्णिक केंद्रातला वीज निर्मितीचा एक संच काल सुरु करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या ८ महिन्यांपासून या केंद्रातली वीज निर्मिती प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यात आली होती. जायकवाडी धरणातून डाव्या कालव्याद्वारे खडका बंधाऱ्यात पाणी पोहोचल्यामुळे वीज निर्मीतीचा निर्णय घेतला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पाण्याच्या उपलब्धतेमुळे या केंद्रातले इतरही संच सुरु करण्याची तयारी प्रशासनानं केली आहे.
****
जालना जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ३९ टक्केच पाऊस झाल्यानं, पाणीटंचाईची समस्या ऐन पावसाळ्यातही कायम आहे. टंचाई निवारण्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यातल्या १०७ गावं आणि २२ वाड्यांमध्ये १२० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, सर्वाधिक ५६ टँकर अंबड तालुक्यात सुरू आहेत. पावसाअभावी खरीपाची पिकं धोक्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****

No comments: