Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -३० ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** निरोगी आणि समृद्ध आयुष्यासाठी सुदृढता आवश्यक; देशव्यापी फिट इंडिया मोहिमेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
** मुंबई-नागपूर
समृध्दी महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद आणि जालन्यात औद्योगिक गुंतवणूक
वाढण्याची मुख्यमंत्र्यांना अपेक्षा
** शालेय
क्रीडा विभागानं बंद केलेले ४८ क्रिडा प्रकार पुन्हा सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
आणि
** भारत
आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून दुसरा कसोटी क्रिकेट सामना
****
सुदृढता आणि निरोगी राष्ट्र ही नवीन भारताची ओळख असणार आहे, असं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं पंतप्रधानांनी
काल देशव्यापी फिट इंडिया मोहिमेची सुरुवात केली. सुदृढता हा केवळ शब्द नाही, तर निरोगी
आणि समृद्ध आयुष्यासाठी आवश्यक अट आहे, असं ते म्हणाले. लोकांना त्यांच्या दैनंदिन
आयुष्यात शारिरीक परिश्रम आणि खेळांना प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित करणं हा या
मोहिमेचा उद्देश आहे. तंत्रज्ञानाच्या शोधामुळे शारिरीक परिश्रम कमी होऊ लागले. मधुमेह,
अतितणाव सारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांचं प्रमाण भारतात वाढत आहे. आपल्या जीवनशैलीतील
छोट बदल हे आजार रोखू शकतात, असं त्यांनी यावेळी सांगितलं. या बदलांसाठी देशाला प्रेरित
करण्यासाठीच फिट इंडिया मोहीम आहे, असं त्यांनी सांगितलं. ही मोहीम काळाची गरज असून,
देशाला निरोगी भविष्याकडे घेऊन जाणारी असल्यामुळे जनतेनं फिट इंडिया मोहिमेचं नेतृत्व
करावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
****
राष्ट्रीय
क्रीडा पुरस्कार काल नवी दिल्लीत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात
आले. यामध्ये कुस्तीपटू बजरंग
पुनिया आणि पॅरा ॲथलिट दिपा मलिक यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात
आलं. अन्य खेळाडूंना अर्जून, ध्यानचंद तसंच द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरवण्यात
आलं.
****
मुंबई-नागपूर
समृध्दी महामार्गाचं काम वेगात सुरू असून, कामाची गती अशीच राहिल्यास डिसेंबर २०२०
पर्यंत या महामार्गावरून प्रवास करता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी व्यक्त केला आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत
होते. समृध्दी महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद आणि जालन्यात औद्योगिक गुंतवणूक
मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.. ते म्हणाले...
समृध्दी महामार्गाचं काम
वेगात सुरू आहे, कदाचित डिसेंबर २०२० पर्यंत
या महामार्गावरून प्रवास करता येईल,इतक्या वेगाने हे काम चालले आहे. याच्यामुळे जालना
आणि औरंगाबादला देखील Industrial stratgy location तयार होणार आहे आणि
DMIC जो आहे त्याच्या करता खूप मोठे वरदान याठिकाणी समृद्धी महामार्ग आणि ड्रायपोट
ठरणार आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो आपण करतो आहे.
केंद्रीय
मंत्री रावसाहेब दानवे, जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर,
यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. परतीच्या पावसाचा अंदाज घेऊन, दुष्काळ
निवारण योजनांचा आढावा घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शासन सूक्ष्म
सिंचन योजनेअंतर्गत ८० टक्के अनुदान देत असून, दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्यातल्या
शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करून उसाचं पीक घ्यावं, त्याचवेळी पर्यायी
पिकांचांही प्राधान्यानं विचार करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
परभणी
इथंही काल महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी बोलतांना
मराठवाड्यातील पाणी, रोजगार, रस्ते आणि इतर विकाम कामं मार्गी लावण्यात येत असल्याचं
त्यांनी सांगितलं.
दरम्यान,
महाजनादेश यात्रा आज लातूर जिल्ह्यात दाखल होणार असून जिल्ह्यात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या
सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
एकात्मिक
पाणीपुरवठा वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातल्या परतूर, मंठा आणि जालना तालुक्यातल्या
१७६ गावांच्या संयुक्त पाणीपुरवठा योजनेचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते लोकार्पण करण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा आणि
स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची यावेळी उपस्थिती होती.
****
शालेय क्रीडा विभागानं बंद केलेले सुमारे
४८ खेळ पुन्हा सुरू करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षण क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री
अशिष शेलार यांनी केली आहे. ते काल पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. २०१७
मध्ये क्रीडा संचालनालयानं हे खेळ बंद केले होते, ते पुन्हा सुरू करण्याचा शासन निर्णय
काल तातडीनं जारी करण्यात आल्याचं शेलार म्हणाले. यामध्ये टेनिस, फुटबॉल, लंगडी या
खेळांचा समावेश आहे.
****
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं जुलै महिन्यात घेतलेल्या
इयत्ता दहावीच्या फेरपरिक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. मंडळाच्या
डब्लु डब्लु डब्लु डॉट महारिझल्ट डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार
असून विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटही काढता येईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
राज्य शासनाचे डॉ. बाबासाहेब
आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ. एस. आर. रंगनाथन २०१८-२०१९चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारात
डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ग्रंथमित्र पुरस्कार लातूरच्या संजय
सुर्यवंशी यांना तर ग्रंथालय सेवक ग्रंथमित्र पुरस्कार परभणीच्या मधुकर चौधरी आणि औरंगाबादच्या
मोहन गोरे यांना मिळाला आहे.
****
बैलपोळ्याचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. यासाठी काल
सायंकाळी हळद दुधानं बैलांची खांदेमळणी करण्यात आली. आज बैलाला विविध आभुषणांनी सजवून
संध्याकाळी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या निमित्तानं पुरण पोळीचं खास जेवण बैलांना
खाऊ घातलं जातं.
****
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या आणि शेवटच्या
क्रिकेट कसोटी सामन्याला आजपासून किंगस्टन इथं सुरूवात होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार
सायंकाळी आठ वाजता हा सामना सुरू होईल. दोन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना
भारतानं जिंकला आहे.
****
लातूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य
योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला बचत गटाच्या कुटुंबांना गोल्डन कार्ड तयार करून देण्यासाठी
महानगरपालिका विशेष मोहीम राबवत आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका
अभियानांतर्गत शहरी भागातील लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये त्यासाठी विशेष
शिबीराचं आयोजन करण्यात येणार असुन सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन
जिल्हा समन्वयक डॉ कुलदीप शिरपूरकर यांनी केलं आहे.
****
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याचं,
राज्याचे उद्योग आणि खनिकर्म तसंच अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री अतुल सावे यांनी म्हटलं
आहे. ते काल हिंगोली इथं, विभागीय वनाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर
बोलत होते. गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या दुष्काळ सदृष्य परिस्थितीला आपणच
जबाबदार असल्याचं मत, सावे यांनी व्यक्त केलं.
****
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे
नांदेड -औरंगाबाद-नांदेड अशी नवीन विशेष गाडी चालवणार आहे. ही विशेष गाडी ३ सप्टेंबर ते
३० सप्टेंबर दरम्यान रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस चालणार आहे. आठ डबे असलेली
ही गाडी सकाळी ८ वाजता नांदेडहून सुटेल आणि दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी औरंगाबादला
पोहोचेल तर परतीच्या प्रवासात औरंगाबादहून् सायंकाळी ६ वाजून १० मिनीटांनी सुटेल आणि
नांदेडला रात्री ११ वाजता पोहोचेल.
****
शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आर्शिवाद
यात्रा आज औरंगाबादमध्ये येणार आहे. शहरातल्या ताठे मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता
ते विजय संकल्प मेळाव्यात युवकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ही जन आर्शिवाद यात्रा
जिल्ह्यातल्या पैठण, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड तालुक्यांमध्ये जाणार असून तिथंही ते युवकांशी संवाद साधणार असल्याचं पक्षाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.
****
जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या सातोना इथल्या
महावितरण कार्यालयातला कनिष्ठ अभियंता अमोल
मोहिते याला पाच हजार रूपयाची लाच घेतांना काल लाच लुचपत विभागानं रंगेहाथ पकडलं. नवीन
डिपी बसवण्यासाठी सर्वेक्षण करून अंदाजपत्रक काढून देण्यासाठी मोहिते यानं दहा हजार
रूपयांची लाच तक्रारदाराकडं मागितली होती. तडजोडीअंती ठरलेली पाच हजार रूपये लाच स्वीकारतांना
काल त्याला पोलिसांनी अटक केली.
****
No comments:
Post a Comment