Saturday, 3 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.08.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०३ ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 संसदेत काल, भारतीय विमानतळ आर्थिक नियमन प्राधिकरण दुरुस्ती विधेयक २०१९ संमत झालं. या विधेयकाद्वारे देशातल्या मोठ्या विमानतळांसाठी वार्षिक प्रवासी संख्येची मर्यादा आधीच्या १५ लाखवरुन ३५ लाख प्रवासी इतकी वाढवण्यात आली आहे. यापूर्वी वार्षिक १५ लाख प्रवासी वाहतूक असलेलं किंवा केंद्र सरकारनं जाहीर केलेलं विमानतळ, मोठं विमानतळ म्हणून घोषित करण्यात येत होतं. नवीन सुधारणा विधेयकानुसार ज्या विमानतळांचं संपूर्ण व्यवस्थापन आणि कार्यवाही लिलावक्रियेद्वारे ठरवली आहे, त्या विमानतळावरील जकात कर, कररचना किंवा इतर विकासशुल्क प्राधिकरण ठरवू शकणार नाही. विमानानं प्रवास करणाऱ्यांची संख्या २००८ मधे ११७ दशलक्ष इतकी होती, ती आता ३४५ दशलक्ष झाल्याचं केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या विधेयकावरील चर्चेदरम्यान सांगितलं.
****

 राज्य परिवहन महामंडळानं बसच्या चालक- वाहक म्हणून दिडशे महिलांची नियुक्ति केली आहे. या महिन्यापासून त्यांना एक वर्षाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या महिला चालकांना प्रथम छोट्या अंतरावरील बस चालवण्याचा अनुभव दिला जाईल, त्यानंतर लांब पल्ल्याच्या मार्गावर त्यांची नियुक्ती केली जाईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 ठाण्यातल्या एका मुस्लिम इसमाने पत्नीला फोनवरून तिहेरी तलाक दिल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित इसमाची आई आणि बहिणी विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****

 अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी पंचायत समितीतला स्थापत्य अभियंता पंढरीनाथ आव्हाड याला काल चाळीस हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडलं. जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामाचं देयक काढण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****

 भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आजपासून टी ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या  दौऱ्यात तीन टी ट्वेंटी सामने, तीन एक दिवसीय सामने, तर दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
*****
***

No comments: