Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 04 August
2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
मुंबईत
अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरातली अतिवृष्टी लक्षात
घेता आणखी सहा तुकड्या पाठविण्याची विनंती राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडे करण्यात
आली असून, शासन लष्कर, नौदल आणि अन्य यंत्रणांच्याही संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं आहे.
****
नाशिक
जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह अन्य तालुक्यांतही मुसळधार पाऊस सुरू आहे. गंगापूर
धरणाचा पाणीसाठा ९३ टक्के झाल्यानं, धरणातून ४२ हजार घनफूट प्रतिसेकंद इतक्या वेगानं
पाणी सोडण्यात येत आहे. तसंच, नांदुर मधमेश्वर येथूनही १ लाख ५० हजार घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाणी गोदापात्रात सोडण्यात येत आहे.
त्र्यंबकेश्वर
मंदिरात पाणी शिरल्यानं भाविकांची आज गैरसोय झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षिततेचा
भाग म्हणून, सोमवारी सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. नाशिक-मुंबई रेल्वे
सेवा ठप्प असून, कसारा घाटात दरड कोसळल्यानं हा मार्गही एकेरी झाल्याचं वृत्त आहे.
****
दरम्यान,
नाशिकमध्ये आलेल्या पुरामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या गोदापात्रातून जायकवाडी प्रकल्पाच्या
नाथसागरात सतत आवक सुरू आहे. आज दुपारी ४ वाजता धरणाची पाणीपातळी १ हजार ५०१ फुटांवर
पोहोचली असून, धरण १६ पूर्णांक ३८ टक्के भरल्याचं जायकवाडी पाटबंधारे विभागानं कळवलं
आहे.
****
जालना
जिल्ह्यातही सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. दुपारी जालना शहरात हलका पाऊस झाला. जिल्ह्यात
आज सकाळपर्यंत २४८ पूर्णांक १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भोकरदन तालुक्यातले
धामणा आणि जुई धरण वगळता जिल्ह्यातले ४१ लघुप्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. विहिरींची
पाणीपातळीही वाढलेली नाही. त्यामुळे खरीपाच्या पिकांसाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची
प्रतीक्षा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोल्हापूर
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली
आहेत. नद्यांना आलेल्या महापुराचा फटका ऊस, भातासह सर्व खरीप हंगामी पिकांना बसला आहे.
****
सातारा
जिल्ह्यातल्या कोयनानगर परिसरात पावसाचा जोर कायम असल्यानं ओढे- नाले भरुन वाहत आहेत.
वाहत्या नाल्यात चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यानं शनिवारी रात्री कार पाण्यात वाहून
गेली. यात दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
****
बुलडाणा
जिल्ह्यात राज्य शासन विविध योजनांमधून राज्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न
करीत असल्याचं पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी म्हटलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात
विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तसंच, शासनाच्या विविध फ्लॅगशिप योजनांच्या
उद्दिष्टपूर्तीसाठी यंत्रणांनी समन्वयानं काम करीत जिल्ह्याला पुढे ठेवावं, असे निर्देशही
डॉ. कुटे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
****
राज्य
सरकार महाज्योती योजनेच्या माध्यमातून भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी प्रयत्न करत
असल्याचं मत दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केलं आहे. नंदुरबारमध्ये आज
झालेल्या भटके विमुक्त हक्क परिषदेच्या सामाजिक जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते.
****
अनुसूचित
जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी सिंचनाच्या शाश्वत सुविधांचा लाभ
घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषि क्रांती
योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन बुलडाणा कृषि विकास अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे
केलं आहे. ही योजना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार असून, इच्छुक
शेतकऱ्यांना संकेतस्थळावर ४ सप्टेबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
****
परभणी
जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातल्या महिला बचत गटांच्या नाविन्यपूर्ण व्यवसायांना प्रोत्साहन
देण्यासाठी - हिरकणी नव उद्योजक महाराष्ट्राची - ही स्पर्धा काल पंचायत समितीच्या सभागृहात
पार पडली. महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानाच्या या संधीचा महिलांनी लाभ घेत समूहासह
स्वतःचा विकास साधण्याचं आवाहन तहसीलदार अशिष बिरादार यांनी केलं.
****
No comments:
Post a Comment