Tuesday, 6 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.08.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक तसंच जम्मू काश्मीर आरक्षण संशोधन विधेयकावरच्या चर्चेला गृहमंत्री अमित शहा सध्या लोकसभेत उत्तर देत आहेत. त्यापूर्वी आज दिवसभर झालेल्या चर्चेदरम्यान, बहुजन समाज पक्ष, तेलगुदेशम पक्ष, अण्णाद्रमुक, बिजू जनता दल, आम आदमी पक्षासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांनी या विधेयकाच्या बाजूने मत मांडली, तर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, एमआयएम, आणि इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाच्या विरोधात मतं मांडली.

या चर्चेदरम्यान काही सदस्यांनी, सदनाचे सदस्य असलेले जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या सदनातल्या गैरहजेरीमुळे त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली, मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी ही शक्यता फेटाळून लावत, फारुख अब्दुल्ला हे आपल्या घरी असून, त्यांच्या मर्जीने ते आज लोकसभेत गैरहजर राहिल्याचं शहा यांनी स्पष्ट केलं.

****
ग्राहक संरक्षण विधेयक २०१९ आज राज्यसभेत एकमतानं मंजूर झालं. ग्राहक हक्क संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी हे विधेयक मांडलं, राज्यसभेनं हे विधेयक एकमतानं मंजूर केलं. या विधेयकातल्या तरतुदींनुसार आता 'केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण' स्थापन करण्यात येईल. ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी असलेले जिल्हा मंच, राज्य आयोग तसंच राष्ट्रीय आयोग यांच्या कक्षेत वाढ झाली आहे, आता जिल्हा मंचाकडे २० लाख रुपयांऐवजी एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे सुनावणीसाठी दाखल करता येतील. राज्य आयोगाकडे एक कोटी ते १० कोटी रुपयांपर्यंत तर राष्ट्रीय आयोगाकडे १० कोटी रुपयांवरील प्रकरणं सुनावणीसाठी दाखल करता येतील.
****
शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची योजना सुरु ठेवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भाजपाची महाजनादेश यात्रा आज यवतमाळ जिल्ह्यात पोहोचली. त्यानंतर राळेगाव इथल्या सभेत ते बोलत होते. आपल्या सरकारनं गेल्या ५ वर्षांमध्ये कर्जमाफी, बोंडअळी मदत, अवर्षण, अतिवृष्टी अशा सर्व संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यातल्या बाल हक्क उल्लंघनाच्या तक्रारींसाठी नऊ ऑगस्ट रोजी उस्मानाबाद इथं सकाळी नऊ वाजता सुनावणी होणार आहे. बालकांवर होणारा हिंसाचार, अत्याचार, भीक्षावृत्तीला प्रवृत्त करणे, आदी संदर्भातल्या तक्रारी पीडित बालकं स्वत: अथवा त्यांच्यावतीने इतर कोणतीही व्यक्ती करू शकते असं आयोगानं सांगितलं आहे.
****
पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे भीमा नदीची पाण्याची पातळी वाढली असून पंढरपूर शहरासह, नदीकाठच्या १०४ गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पंढरपूरातल्या ५०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
दरम्यान, पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे दोन लाख पस्तीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणी पातळी सध्या ४३ टक्क्यांवर पोहोचली आहे.
****
जालना गुन्हे शाखेच्या पथकानं अंबड तालुक्यातल्या राणी उंचेगाव इथल्या एका गोदामावर छापा टाकून ७ लाख ११ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात गुटखा निर्मिती, साठवणूक, वाहतुक तसंच विक्रीवर बंदी आहे.
****
लातूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्सप्रेस रेल्वेगाडी आज रद्द करण्यात आली आहे. अतिपर्जन्यवृष्टी मुळे मध्य रेल्वेनं काही गाड्या रद्द तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याचं मध्य रेल्वेनं ट्वीटर संदेशाद्वारे कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध गावातल्या महिला पुरुषांनी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं.
औरंगाबाद तालुक्यात विविध गावांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गावांचे सर्वेक्षण करून टँकर सुरू करण्याची मागणी औरंगाबाद तालुका काँग्रेस समितीनं केली आहे.
****
अखिल भारतीय विद्यार्थी महासंघ एआयएसएफच्या औरंगाबाद शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आज डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ डॉ. प्रवीण वक्ते यांची भेट घेऊन, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात निवेदन त्यांना सादर केलं. कमवा आणि शिका योजनेच्या मानधनात वाढ, वसतीगृहांमध्ये वाचन कक्ष सुरू करावा, उस्मानाबाद उपकेंद्रातल्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची व्यवस्था करावी, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी, या सह अन्य मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.
****

No comments: