Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 August 2019
Time 1.00 to
1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ ऑगस्ट २०१९ दुपारी १.०० वा.
****
राज्यसभेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. त्यापूर्वी,
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींची संख्या वाढवण्याबाबतचं विधेयक राज्यसभेनं चर्चेविना
संमत केलं. पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत ३५ बैठका झाल्या, यामध्ये ३२ विधेयकं संमत
झाली.
दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांना
राज्यसभेनं श्रद्धांजली अर्पण केली. सभापती व्यंकय्या नायडू यांनी स्वराज यांच्या निधनाचा
शोकप्रस्ताव सदनाला वाचून दाखवला. सुषमा स्वराज यांचं योगदान सदनाच्या सदैव स्मरणात
राहील, असं सभापती म्हणाले. सर्व सदनानं दोन मिनिटं मौन पाळून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली
वाहिली.
सुषमा स्वराज यांचा पार्थिव देह सध्या दिल्लीत भारतीय
जनता पक्षाच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. त्यापूर्वी राष्ट्रपती
रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान
डॉ मनमोहन सिंह, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी
तसंच डॉ मुरली मनोहर जोशी, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती, यांच्यासह अनेक पक्षांचे
ज्येष्ठ नेते, विविध राज्यांचे विद्यमान तसंच माजी मुख्यमंत्र्यांनी सुषमा स्वराज यांचं
अंत्यदर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आज दुपारी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार
केले जाणार आहेत.
अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद वाद प्रकरणी
आज सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. निर्मोही आखाड्याचे वकील
सुशील जैन यांनी आजही आपला युक्तिवाद सुरू ठेवला आहे, निर्मोही आखाड्यानं कालच्या सुनावणीत
युक्तिवाद करताना, या सुमारे पावणे तीन एकर जमीनीवर आपला दावा सांगितला. शेकडो वर्षांपासून
या जागेचा ताबा निर्मोही आखाड्याकडे होता, त्यामुळे या जागेचा ताबा आणि व्यवस्थापन,
आपल्याकडे देण्याची मागणी निर्मोही आखाड्यानं केली आहे.
****
राज्याच्या काही जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली
आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी पूरस्थितीचा आढावा
घेऊन आवश्यक निर्देश दिले. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, तसंच कोकणातल्या जिल्ह्यांचे
जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पूरग्रस्त भागात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद
दलाच्या बावीस तुकड्या दाखल झाल्या असून, हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात
आलं आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातल्या सुमारे त्रेपन्न हजार, कोल्हापूर जिल्ह्यातल्या
अकरा हजार ४३२, तर रायगड जिल्ह्यातल्या तीन हजार नागरिकांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागात आवश्यकतेनुसार
वैद्यकीय पथक पाठवण्याचे तसंच आवश्यक औषधांचा पुरवठा तातडीनं करण्याचे निर्देश दिले.
पूरग्रस्त भागातल्या पीक नुकसानाचे पंचनामे करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली
आहे.
****
राज्यातील अशासकीय खाजगी शाळांमधील
अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक
यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी काल
केली. त्याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. राज्यात एक हजार बारा अर्धवेळ
शिक्षक, एक हजार चारशे एकतीस अर्धवेळ ग्रंथपाल, एकशे पासष्ट रात्र शाळांमधे काम करणारे सहाशे रात्र
शाळा शिक्षक, तसंच दोनशे शिक्षकेत्तर कर्मचारी असून या सर्वांना
१ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.
****
जालना जिल्ह्यातील ५१ हजार हेक्टर
क्षेत्रावर लागवड झालेलं मका पीक लष्करी अळीमुळे बाधित झालं आहे. त्यामुळे उत्पादनात
घट होण्याची भीती मका उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी एकात्मिक पध्दतीनं दोनशे गावांमध्ये, कामगंध सापळे
बसवण्याचं नियोजन जिल्हा कृषी विभागानं केलं आहे. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून २५
लाख रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले
आहेत.
****
भंडारा जिल्हात पीक कर्जवाटपाचे
उद्दिष्ट निर्धारित
वेळेत पूर्ण करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात
आली. यावेळी जिल्हा उपनिबंधक, जिल्हातील विविध बँकेचे व्यवस्थापक तसेच बँक अधिकारी उपस्थित होते. जिल्हयाला
४१४ कोटी ५० लाख रुपये पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट दिलं आहे. जिल्हा सहकारी बँकेने आतापर्यंत ९६ टक्के कर्ज
वाटप केले आहे. ज्या बँकांनी ५० टक्क्यांपेक्षा कमी कर्ज वाटप केले त्यांना उद्दिष्ट
पूर्ण करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या तर ज्या बँका उद्दिष्ट पूर्ण
करणार नाहीत त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment