Saturday, 2 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.11.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०२ नोव्हेंबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात भाजप आणि शिवसेने दरम्यानची चर्चा अद्याप व्हायची आहे. या पार्श्र्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी म्हणजे, जनादेशाचा अपमान असल्याची प्रतिक्रीया शिवसेना नेते संजय राऊत यांनी नोंदवली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी सत्ता स्थापनेच्या पार्श्वभुमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील वक्तव्य़ केलं होतं. त्यावर राऊत प्रतिक्रीया देत होते. युतीमधे सत्ता स्थापनेसाठी कोणतीही चर्चा सुरू नसून, त्या संदर्भात केवळ अफवा सुरू आहेत, असं त्यांनी नमुद केलं. ज्यांच्याकडे बहुमत असेल, ते राज्यात सरकार बनवतील असंही राऊत या वेळी म्हणाले.
****

 राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात `वॉटर ग्रीड` योजना, परतूर औद्योगिक विकास क्षेत्र आदी कामांचा आढावा घेतला. ही कामं गुणवत्तापूर्ण तसंच निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
****

 मराठवाड्यातल्या अनेक भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा, कळमनुरी, आखाडा बाळापूरसह अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. परभणीतही पहाटेपर्यंत पाऊस सुरु होता. जालना जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाऴ वातावण असून अधुन मधून पावसाच्या सरी पडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड शहरातही रात्रीत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जळगांव, ठाणे आदी जिल्ह्यांतही पाऊस पडत आहे.
****

 नाशिक जिल्ह्यात मनमाड, मालेगाव, नांदगाव तालुक्यांमधे आलेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात पाऊस नसला तरी `कयार’चक्रीवादाळामुळे समुद्रात गेलेल्या अनेक स्थानिक तसंच परप्रांतीय नौका मोठ्या संख्येनं देवगड बंदराच्या आश्रयाला आल्या आहेत.
****

 परतीच्या पावसानं सांगली जिल्ह्यातल्या पंचावन्न हजार एकशे छत्तीस हेक्‍टर क्षेत्राला तडाखा बसला असून पिकांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनानं व्यक्त केला आहे.
*****
***

No comments: