आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्याचे मुख्यमंत्री
म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी
राजभवनात फडवणीस आणि पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गेले काही दिवस राज्यात
सत्ता स्थापनेसाठी विविध पक्षांच्या बैठका सुरु होत्या. काल रात्री पर्यंत शिवसेना,
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांच्या बैठका सुरु होत्या. त्या
पार्श्वभूमीवर आजची घडामोड मोठी धक्कादायक मानली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीटरद्वारे पक्षाचा अजीत पवार यांच्या निर्णयाला
पाठिंबा नसून तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याच म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या
वर्षा बंगल्यावर भाजपच्या बैठकीला नुकतीच सुरुवात झाली आहे.
****
या सर्व घडामोडींविषयी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आज दुपारी
साडे बारा वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं वृत्त आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ट्विटरद्वारे
अभिनंदन केलं आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनीही राज्यात नवीन सरकार स्थापनेच्या
शुभेच्छा दिल्या आहेत.
****
भारतीय जनता पक्षाला
राज्यातून स्पष्ट जनादेश मिळाला आहे आणि राज्याला स्थिर सरकारची आवश्यकता असल्याचं
मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते पद आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर
बोलत होते. राज्यात शेतकऱ्यांच्या समस्यांसह अनेक मुद्दे आहेत, त्यामुळे स्थिर सरकार
स्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, अजित पवारांनी
महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत
यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. अजित पवार यांची देहबोली संशयास्पद होती, मात्र
या सगळ्या घडामोडींशी शरद पवारांचा कोणताही संबंध नाही, हे ठामपणे सांगू शकतो, असं
राऊत यावेळी म्हणाले.
*****
***
No comments:
Post a Comment