Friday, 22 November 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.11.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रमुख नेते मुंबईत एका बैठकीत शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली राज्यात सरकार स्थापनेला आकार देण्यासंदर्भात चर्चा करत आहेत. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि संजय राऊत, काँग्रेसचे अहमद पटेल, मल्लीकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल, जयंत पाटील, अजित पवार हे नेते या बैठकीत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसंच शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे ही या बैठकीला उपस्थित आहेत. 
****
ही आघाडी आज रात्री उशीरा किंवा उद्या सकाळी राज्यात सरकार स्थापनेचा दावा करेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तिनही पक्ष पाच वर्ष सरकार चालवण्याला प्राधान्य देईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे जाईल, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रीपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून घेणार असल्याच्या वृत्ताबद्दल विचारलं असता त्याला महत्त्व नसून सरकार पाच वर्ष चालावं आणि जनतेच्या भावनांचा आदर व्हावा हे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. लवकरात लवकर सरकार स्थापन करायला प्राधान्य दिलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं.
****
अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य प्रशासनानं आठशे एकोणीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विभागीय उपायुक्त पराग सोमण यांनी ही माहिती दिली. या दुष्काळग्रस्त भागात पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही पण राज्यात अवकाळी पावसामुळे हातात आलेली पिकं सुद्धा गेल्यामुळे शेतकऱ्यांचं अधिक नुकसान झालं. शासकीय यंत्रणांनी पीक नुकसानीचं सर्वेक्षण केल्यानंतर मराठवाड्यासाठी दोन हजार नऊशे नऊ कोटी छत्तीस लाख रुपयांच्या मदतीची मागणी राज्य प्रशासनाला सादर करण्यात आली होती.
गेल्या अठरा तारखेला सरकारनं संमत केलेल्या ठरावानुसार मराठवाड्यात सर्वाधिक मदत निधी बीड जिल्ह्याला एकशे चव्वेचाळीस कोटी अठरा लाख रुपये मंजूर झाला आहे. औरंगाबादसाठी एकशे एकवीस कोटी एक्क्याऐंशी लाख तर नांदेडसाठी एकशे तेवीस कोटी चौदा लाख रुपये मंजूर झाले आहेत. जालना आणि लातूरकरता अनुक्रमे एकशे दहा कोटी एकवीस लाख आणि शंभर कोटी अडूसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उस्मानाबादसाठी अठ्ठ्याहत्तर कोटी एकोणीस लाख, हिंगोलीसाठी त्रेपन्न कोटी शहात्तर लाख तर परभणीसाठी सत्त्याऐँशी कोटी बासष्ट लाख रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला आहे.
****
दरम्यान, अवकाळी पावसामुळं झालेल्या पीक नुकसानीची पहाणी करण्यासाठी एक केंद्रीय पथक आज तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर औरंगाबादमध्ये दाखल झालं आहे. केंद्रीय कृषी विभागाच्या दोन अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश आहे. हे पथक आज सिल्लोड, फुलंब्री, आणि कन्नड तालुक्यांना भेट देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयानं दिली आहे. उद्या गेवराई, माजलगाव आणि धारूर तसंच वडवणी या बीड जिल्ह्यातल्या गावांना तर रविवारी जालना जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद इथं पथक भेट देणार आहे.
****
लातूरच्या महापौरपदी कॉंग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांची तर उपमहापौरपदावर भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत बिराजदार यांची आज निवड झाली. विक्रांत गोजमगुंडे यांना पस्तीस तर भाजपचे शैलेश गोजमगुंडे यांना तेहतीस मतं पडली. बिराजदार यांनी काँग्रेसला मतदान केलं. भाजप नगरसेवक शकुंतला गाडेकर या मतदानप्रक्रियेला अनुपस्थित राहिल्या. 
****
मराठी वृत्तपत्रसृष्टीत ‘अग्रलेखांचे बादशाह’ अशी ओळख असलेलं दैनिक नवाकाळचे जेष्ठ संपादक आणि जेष्ठ लेखक नीलकंठ खाडिलकर यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं महत्वाच्या गाड्याेत तात्पुरत्या स्वरुपात डबे वाढवून प्रवाशी सुविधेत वाढ केली आहे. `नांदेड-पनवेल-नांदेड` आणि नांदेडहून सोडण्यात येणारी विशेष रेल्वे गाडी `नांदेड-पनवेल विशेष-नांदेड` या दोन रेल्वेंमध्ये हा अतिरिक्त डबा असून येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत ही सोय उपलब्ध असेल, असं रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.
****

No comments: