Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 21 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२१
नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
काँग्रेस कार्यकारी समितीनं
आज एका बैठकीमध्ये राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षा दरम्यान शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी काल झालेल्या प्रदीर्घ बैठकीच्या
पार्श्र्वभूमीवर ही बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दरम्यान काल झालेल्या
बैठकीची माहिती आजच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्यात आली, अशी
माहिती पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. सरकार स्थापने संदर्भातील अंतिम
निर्णय उद्या जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेस कार्यकारी समितीनं राज्यात शिवसेना
आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सरकार स्थापन करायला स्पष्ट मान्यता दिली असल्याचं पीटीआय
वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांदरम्यान आज रात्री
पुन्हा बैठक होणार असून शिवसेनेसोबत निर्णायक बैठक उद्या मुंबईत होणार आहे. राज्यात
सरकार स्थापनेसंदर्भातला निर्णयही उद्या जाहीर केला जाणार असल्याचंही पीटीआय वृत्तसंस्थेनं
म्हटलं आहे.
****
राज्यात डिसेंबरपुर्वी
नवं सरकार स्थापन होईल आणि या संदर्भातील अंतिम निर्णय एक ते दोन दिवसांत घेण्यात येणार
असल्याचं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत
होते. शिवसेना तसंच कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दरम्यान सरकार स्थापन करण्यासंदर्भात
सुरू चर्चेच्या फेऱ्यांच्या पार्श्र्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं आहे. ते आज राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहितीही राऊत यांनी यावेळी
दिली. सरकार स्थापनेसंदर्भात आणखी तपशील ठरवण्यासाठी तिन्ही पक्षांदरम्यान मुंबईत आणखी
एक बैठक होणार असल्याचंही त्यांनी नमुद केलं. राज्याला शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार
प्राप्त होईल आणि राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकार स्थापन करण्यात येईल आणि ते पाच
वर्षांसाठी असेल, असं राऊत यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री कोण असेल हे आपल्याला
लवकरच कळेल पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी पक्ष
कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेची मागणी असल्याचं त्यांनी नमुद केलं. मुख्यमंत्रीपद
विभागून मिळावं, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे, या संदर्भात विचारलं असता त्यांना
या संदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं राऊत
म्हणाले. शिवसेनेला कट्टरवादी भूमिका सोडावी लागेल असा मुद्दा काँग्रेसनं उपस्थित केला
होता. धर्मनिरपेक्षता ही देश आणि घटनेचा पाया असल्याचं या पार्श्र्वभूमीवर राऊत यांनी
म्हटलं आहे.
****
आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकातल्या गरजू रुग्णांना मदतीपासून वंचित रहावं लागू नये यासाठी मुख्यमंत्री सहायता
निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रपती
राजवट लागू असेपर्यंत गरजू रुग्णांना त्यांच्या उपचार आणि शस्त्रक्रियेकरता आर्थिक
सहाय्य देण्याबाबत ही यंत्रणा काम करेल. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात
आला. मुंबईतल्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात गरजुंना अर्ज सादर करता येतील,
असं या आदेशात म्हटलं आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
केंद्रीय युवक महोत्सवाला आजपासून सुरूवात होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या युवक महोत्सवाचं
उद्घाटन प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आलं. अभिनेता श्ंतनु गंगणे, कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले, प्र-कुलगुरु
डॉक्टर प्रविण वक्ते यावेळी उपस्थित होते. उद्घाट्नापूर्वी समाजातम्या विविध विषयांवर
विद्यार्थ्यांनी देखावे सादर केले आणि शोभायात्रा ही काढण्यात आली. विद्यापीठाशी संलग्न सुमारे दोनशे महाविद्यालयांचे संघ
आणि तीन हजार कलावंत या युवक महोत्सवात सहभागी होणार आहेत.
****
राज्यात थंडीचा कडाका
वाढतो आहे. आज सकाळी नाशिक इथं १५ पूर्णांक ८ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात
आलं.
****
अहमदनगर शहरातल्या बालिकाश्रम
रस्त्यावर असलेल्या फर्निचरच्या दुकानाला आज पहाटे भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या
प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत सुमारे ५० लाख रुपयांचं फर्निचर जळून खाक
झाल्याचा अंदाज आहे.
****
पालघर जिल्ह्यातला डहाणू , तलासरी , धुंदलवाडी भाग
आज सकाळी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. आज सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी या भागांत तीन पूर्णांक पाच रिक्टर तीव्रतेच्या
भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू
१० किलोमीटर खोलीवर होता .
*****
***
No comments:
Post a Comment