आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यसरकारची
बहुमत चाचणी उद्या बुधवारी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. शिवसेना,
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार
स्थापन करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका परवा रविवारी सर्वोच्च न्यायालयात
दाखल केली होती, या याचिकेवर आज निर्णय सुनावताना, न्यायालयानं उद्या नवनिर्वाचित आमदारांचा
शपथविधी आणि त्यानंतर लगेचच बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. हंगामी अध्यक्षांद्वारेच
ही चाचणी घेण्यात यावी, त्यासाठी नियमित अध्यक्ष निवडीची आवश्यकता नसल्याचंही न्यायालयानं
सांगितलं. ही चाचणी गुप्त मतदान पद्धतीद्वारे न घेता, या प्रक्रियेचे थेट प्रसारण करण्यासही
न्यायालयानं सांगितलं आहे.
****
२६ नोव्हेंबर
२००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज अकरा वर्ष होत आहेत. हा हल्ला मोडून
काढताना वीरमरण आलेले पोलिस, सैन्यदलाचे जवान आणि हल्ल्यात बळी पडलेले सर्वसामान्य
नागरिक यांना आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं. मुंबई पोलिस
जिमखान्यात पोलिस स्मारक परिसरात झालेल्या या अभिवादन सभेत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,
मुख्य सचिव अजॉय मेहता, पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, मुंबईचे पोलिस महानिरीक्षक
संजय बर्वे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभागी होत, आदरांजली अर्पण केली.
उपराष्ट्रपती
व्यंकय्या नायडू यांनी ट्वीट संदेशाच्या माध्यमातून या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना
अभिवादन केलं. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सैनिकांच्या शौर्याला आपण प्रणाम करतो,
त्यांचं बलिदान राष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील, असं नायडू यांनी या संदेशात म्हटलं
आहे.
पाकिस्तानी
अतिरेक्यांनी केलेल्या या हल्ल्यात १६६ भारतीय तसंच परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला
होता, तर ३०० नागरिक जखमी झाले होते.
****
नांदेड इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण पांडूरंग
चन्नावार यांचं काल सायंकाळी निधन झाले. ते ९० वर्षे वयाचे होते. चन्नावार हे नांदेड
कापड व्यापारी संघटना तसंच, नांदेड मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिव देहावर
आज दुपानंतर अंत्यसंस्कार
होणार आहेत.
****
No comments:
Post a Comment