Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्याचं मुख्यमंत्रीपद हे आपल्यासमोर एक आव्हान असल्याचं उद्धव
ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विधीमंडळ वार्ताहर
संघटनेकडून त्यांचा आज सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एक तर हे सरकार
तीन पक्षांचं असून महागाई, टंचाई, भ्रष्टाचार ही राज्यासमोरची आव्हानं असून त्यांचा
आपल्याला सामना करायचा असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. मंत्रिमंडळाच्या आजच्या
बैठकीत मुंबईतील आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या
पूर्ण कामाचं परीक्षण केल्यानंतरच हे काम केलं जाईल, असं त्यांनी जाहीर केलं. पत्रकारांनी
सरकारचे नाक, कान, डोळे व्हावं तसंच प्रश्र्न मांडताना ते सोडवण्यासंदर्भात मार्गदर्शन
करावं, असं आवाहन त्यांनी केलं. हे सरकार जनतेशी नम्रपणे वागलं पाहिजे तसंच जनतेच्या
पैशाची उधळपट्टी होणार नाही, यावर आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे
यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह नवीन शपथविधी झालेल्या मंत्र्यांनी
तत्पूर्वी मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता
जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी नव्या मंत्रिमंडळातील
मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत
आदींसह महाराष्ट्र विकास आघाडीतले अनेक नेते उपस्थित होते.
****
मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत
देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपून-छपून बहुमत कसं सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात
नव्या सरकारनं धन्यता मानली अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली
आहे. त्यांनी आज एका संदेशात ही टीका केली आहे. मग बहुमताचे दावे कशासाठी, या सरकारकडे
बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का, नियमबाह्य पद्धतीनं हंगामी
अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी, स्वतःच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का,
असे प्रश्नही फडणवीस यांनी या संदेशात उपस्थित केले आहेत.
****
तरुण साहित्यिकांनी भयमुक्त साहित्य निर्माण करणं आवश्यक असल्याचं
मत ज्येष्ठ नाटककार तथा ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी
यांनी व्यक्त केलं आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण
स्मृती समारोहाचा आज समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात कृषी, साहित्य,
संगीत आणि युवा या क्षेत्रातल्या चार गुणवंतांचा यावेळी यशवंतराव चव्हाण पुरस्कार देवून
गौरवण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यातले दोन लाख नव्वद हजार नऊशे बत्तीस शेतकरी ‘प्रधानमंत्री
किसान सन्मान निधी’ योजनेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपर्यंत
पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मिळवून एकशे सहा कोटी एकोणसत्तर लाख शेहचाळीस
हजार रुपयांचं अनुदान जमा करण्यात आलं आहे. आजपर्यंत या योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या
याद्या ‘पीएम किसान पोर्टलवर’ अद्ययावत करण्यात येत असून, अनुदान रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या
खात्यावर जमा केली जाईल, असं जालना जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्यातल्या तहसिल कार्यालयात आजपासून केंद्र सरकारच्या भारतनेट
या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्याला जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या प्रमुक उपस्थितीत
सुरूवात करण्यात आली. भारतनेट-महानेट प्रकल्प महाराष्ट्र राज्य माहिती आणि तंत्रज्ञान
महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत असून या प्रकल्पाद्वारे परभणी जिल्हातली
चार तहसिल कार्यालयं आणि त्याअंतर्गत येणाऱ्या चारशे अठ्ठावीस ग्रामपंचायतींना ऑप्टीकल
फायबर नेटवर्कनं जोडण्यात येणार आहेत.
****
परभणी शहरातील धारमार्ग परिसरात रस्त्यांवर पडलेले खड्डे त्वरित
बुजवण्यात यावेत, असे आदेश महापौर अनिता सोनकांबळे यांनी दिले आहेत.
****
कापूस पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात पाथरी तसंच गंगाखेड इथं
सोमवार दिनांक दोन डिसेंबर २०१९ पासून केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदी
सुरू होणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कापूस शासकीय खरेदी केंद्रावर
विक्रीसाठी आणावा, असं आवाहन कापूस पणन महासंघाचे परभणी विभागाचे संचालक पंडितराव चोखट
तसंच विभागीय व्यवस्थापक ए.डी.रेणके यांनी केलं आहे.
****
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातल्या गावातील शेतकऱ्यांचे
बासस्ट हेक्टर शेतातील धानाचे पुंजके जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक
नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आज याची पाहणी करून मोबदला
देण्यात यावा, अशा सूचना दिल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment