Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
महाराष्ट्राच्या सत्ता
स्थापनेचे पडसाद आज संसदेतही उमटले. संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज या मुद्यावरून
वारंवार बाधित होऊन अखेर दिवसभरासाठी स्थगित झालं. राज्यसभेत काँग्रेससह विरोधी सदस्यांच्या
गदारोळामुळे कामकाज दुपारी दोनपर्यंत आणि त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं, उद्या
दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं. लोकसभेतही विरोधकांनी या मुद्यावरून हौद्यात उतरून
फलक झळकावत घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात
आलं.
दरम्यान, औद्योगिक कर
कपातीसंदर्भातलं कर कायदा सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आलं. अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांनी सप्टेंबर महिन्यात औद्योगिक कर तीस टक्क्यांवरून २२ टक्के करण्याचा
निर्णय जाहीर केला होता.
****
संविधान दिवस उद्या सर्वत्र
साजरा केला जाणार आहे. देशभरात यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात
आलं आहे. संविधानाला ७० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उद्या संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या
एका संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद या बैठकीला संबोधित
करणार आहेत. उद्या ११ वाजता ही बैठक होणार असल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज
उद्या दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना समितीनं
तयार केलेलं संविधान, २६ नोव्हेंबर १९४९ ला संसदेने स्वीकारलं होतं आणि २६ जानेवारी
१९५० पासून हे संविधान देशभरात लागू झालं.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
आज विधान भवनात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे नेते
दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ आणि सुनिल तटकरे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. सुरूवातीला
सभापती नाईक-निंबाळकर आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली. अजित पवार यांनी आपली भूमिका
बदलावी यासाठी निर्णायक प्रयत्न म्हणून भेटणार असल्याच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितल.
****
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत नऊ सिंचन
प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबी मार्फत सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा
निर्णय प्रशासनानं घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यातला खडकपूर्णा प्रकल्प, यवतमाळ जिल्ह्यातला
बेंबळा प्रकल्प, यासह एकूण नऊ प्रकल्पांच्या कामात अनियमितता असल्याच्या आरोपांवरून,
एसीबीमार्फत ही चौकशी सुरू होती. भविष्यात शासनाने किंवा न्यायालयाने आदेश दिल्यास,
चौकशी पुन्हा सुरू केली जाईल, असं याबाबत जारी पत्रात म्हटलं आहे. या सर्व नऊ प्रकरणांचा
२०१३ च्या सिंचन घोटाळ्याशी संबंध नसल्याचा खुलासाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केला
आहे.
चौकशी बंद करण्याच्या या निर्णयावर काँग्रेस पक्षाने
टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी, भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणं
पाठिशी घालणं, हाच भाजपचा सत्यनिष्ठेचा मार्ग असल्याची उपरोधिक टीका एका ट्वीट संदेशातून
केली आहे.
****
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीस निवडणूक लढवण्यास
प्रतिबंधाची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर तर्कसंगत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च
न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी या
संदर्भात दाखल एक याचिका फेटाळताना, निवडणूक आयोगानं या संदर्भात तीन महिन्यात निर्णय
सुनावण्याचे निर्देश दिले. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतल्या एकूण आठ हजार १६३
उमेदवारांपैकी चौदाशे उमेदवारांविरोधात गुन्हेगारी प्रकरणं नमूद होती, त्यामधली अकरा
टक्के प्रकरणं गंभीर स्वरुपाची असल्याचं, या याचिकेत म्हटलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या
कृषी तंत्र विद्यालयाच्या मैदानावर मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या वतीनं २९ नोव्हेंबर
ते दोन डिसेंबर दरम्यान सहाव्या महाॲग्रो कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक वसंत देशमुख यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत
ही माहिती दिली. या प्रदर्शनात शेती, शेतीपुरक उद्योगांशी संबंधित विषयांवर नामवंतांचं
मार्गदर्शन आणि शेती पीक प्रात्याशिकाचा अभिनव उपक्रम असणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मराठवाड्यातल्या दहा प्रगतिशील शेतकऱ्यांना बॅरिस्टर जवाहरलाल गांधी शेतकरी पुरस्कारनं
गौरवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागातर्फे फक्त
महिलांसाठी अहमदनगर-पुणे एसटी बस सुरू करण्यात आली आहे. महिला वाहक संध्या हाळगावकर
यांच्या हस्ते या सेवेचा आजपासून प्रारंभ करण्यात आला. अहमदनगरच्या तारकपूर स्थानकातून
ही बस सुटेल. ४४ प्रवाशी क्षमतेच्या या बसला पहिल्याच फेरीत ४३ प्रवाशांनी प्रतिसाद
दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अवकाळी पावसामुळे नुकसान
ग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपूंजी असल्याचं सांगत, शिवसेनेच्या वतीनं आज
औरंगाबा जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यात शासकीय कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले. ही
मदत वाढवून देण्याची मागणी करणारं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment