Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 25 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२५ नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भातल्या
याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय सुनावणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी
काँग्रेस या तीन पक्षांनी केंद्र सरकार, राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात काल दाखल
केली होती, न्यायालयाच्या निर्देशानुसार आजच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने सत्ता
स्थापनेसंदर्भात राज्यपालांशी झालेल्या पत्रव्यवहारांचे पुरावे न्यायालयासमोर सादर
केले, यामध्ये अजित पवार यांनी दिलेलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांच्या स्वाक्षरी
असलेल्या पत्राचाही समावेश आहे. न्यायालयानं या सरकारला आजच्या आज बहुमत सिद्ध करण्याचे
आदेश द्यावे, ही काँग्रेसचे वकील कपिल सिब्बल यांची मागणी फेटाळून लावत, न्यायालयाने
या प्रकरणी उद्या सकाळी निर्णय सुनावणार असल्याचं सांगितलं.
****
महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली
असून, संविधान पायदळी तुडवलं गेल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी
केला आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी
काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीकडे १५४ आमदार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे
आणखी काही आमदार भाजपच्या तावडीतून सुटून परत आल्यावर ही संख्या आणखी वाढेल, असं सुरजेवाला
यांनी म्हटल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. विधानसभेत बहुमत चाचणीदरम्यान भाजपला
सडेतोड उत्तर मिळेल, असं ही सुरजेवाला यांनी म्हटल्याचा उल्लेख या बातमीत आहे.
****
दरम्यान शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षानं आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा सादर
केला. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे
सदनात ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत, त्यामुळे ते बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर
शिवसेनेला तत्काळ सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्यात यावं, अशी मागणी या पत्रातून
करण्यात आली आहे. शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
नवनियुक्त विधीमंडळ गटनेते जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात
यांच्या स्वाक्षरीने सादर झालेल्या या निवेदनासोबत या तीनही पक्षांच्या आमदारांच्या
स्वाक्षरीची यादी जोडण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
****
राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या संघर्षाचे
पडसाद आज संसदेतही उमटले. राज्यसभेत काँग्रेस, डावे पक्ष तसंच इतर विरोधी पक्षाच्या
सदस्यांनी या मुद्यावरुन भाजपविरोधी घोषणाबाजी करत दिलेले स्थगन प्रस्ताव सभापती व्यंकय्या
नायडू यांनी फेटाळून लावले, त्यानंतर गदारोळ वाढत गेल्यानं, सभापतींनी कामकाज दुपारी
दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.
लोकसभेतही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह विरोधी
पक्षांच्या सदस्यांनी या प्रकरणी जोरदार घोषणाबाजी करत फलक झळकावले. फलक झळकावणाऱ्या
दोन खासदारांना अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मार्शलद्वारे सदनाबाहेर काढलं. त्यानंतरही
गदारोळ सुरुच राहिल्यानं, सदनाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत
स्थगित करण्यात आलं.
****
महाराष्ट्र सरकार स्थापनेसंदर्भात सुरू असलेल्या मुद्यावर आज
संसद परिसरात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसच्या खासदारांनी
निदर्शनं केली, हे सर्व जण हातात फलक झळकावत घोषणा देत होते.
****
राज्याचे
पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन
करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयाच्या
परिसरात चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी
यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली.
राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याच्या
आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. ते आज कराड इथं यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर
पुष्पांजली अर्पण केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. भाजपसोबत जाण्याचा अजित पवार यांचा
निर्णय त्यांचा वैयक्तिक निर्णय असून, त्याचा पक्षाशी संबंध नाही, असंही शरद पवार यांनी
स्पष्ट केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार
दौलत दरोडा, अनिल पाटील तसंच नरहरी झिरवळ आज दिल्लीहून मुंबईत परतले. आपण राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षातच असून, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच असल्याचं, दौलत दरोडा यांनी
वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं.
****
भारताच्या लक्ष्य सेननं स्कोटिश खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष
एकेरीच विजेतं पद पटकावलं आहे. ग्लासगो इथं त्यानं ब्राझीलच्या गोर कोल्हो यांचा १८-२१,
२१-१८, २१-१९ असा पराभव केला. गेल्या तीन महिन्यातलं लक्ष्यचं हे चौथं विजेतं पद आहे.
No comments:
Post a Comment