Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
महाराष्ट्रात
जनतेने भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी नैतिक आणि मतदानाच्या माध्यमातून जनाधार दिलेला
आहे, असं केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या परिस्थितीमुळे
अजित पवार यांच्यासह सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी स्पष्ट
केलं. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस
आणि शिवसेना हे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष फक्त सत्ता मिळण्यासाठी एकत्र आले
होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांच्या
पक्षांच्या आमदारांच्या सह्यांचे पत्र सादर केल्यानंतर राज्यपालांनी त्यांना पद आणि
गोपनियतेची शपथ दिल्याचंही प्रसाद यावेळी म्हणाले.
****
पाच वर्ष
अत्यंत ताकदीनं आणि मजबुतीनं हे सरकार काम करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिलं आहे. मुंबईतल्या भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आज
सरकार स्थापनेचा जल्लोष करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. विशेषत: राज्यातल्या शेतकऱ्यांच्या
पाठीशी उभं राहण्याचं काम हे सरकार करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. सर्व मित्र पक्ष
आपल्या सोबत असून छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या
संविधानावर आधारीत महाराष्ट्र तयार करण्याचं काम हे सरकार करणार असल्याचं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले.
****
राज्यपालांनी
बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे, मात्र आम्हाला विश्वास आहे की, त्यांना ते करता
येणार नाही असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार
यांनी पक्षाच्या नेत्यांना अंधारात ठेवून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पवार
आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली, त्यावेळी ते
बोलत होते. बहुमत स्पष्ट झाल्यावर पुन्हा एकदा आम्ही तिन्ही पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी
खबरदारी घेण्याबरोबरच एकत्र असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गैरसमजातून कोणी गेलं असेल
तर त्याच्यावर कारवाई केली जाणार नाही, मात्र जाणूनबुजून जे गेले असतील त्यांच्या विरोधात
नक्कीच कारवाई केली जाईल असा इशारा पवार यांनी यावेळी दिला. महाराष्ट्रात राजकारणाचा
हा जो खेळ सुरु आहे तो लाजिरवाणा आहे. ‘मी पुन्हा येईन’ ऐवजी ‘मी जाणारच नाही’ हेच
त्यांना दाखवायचे आहे, अशी जोरदार टीका उध्दव ठाकरे यांनी यावेळी केली.
****
राज्यात
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी प्रक्रियेत चूक झाली असून संविधानाची
अवहेलना झाली आहे, अशी टीका काँग्रेसनं केली आहे. पक्षाच्या आज मुंबईत झालेल्या वार्ताहर
परिषदेत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी ही भूमिका मांडली. काँग्रेसकडून सरकार स्थापनेबाबतच्या
प्रक्रियेत कोणताही उशीर झाला नसून पक्षानं प्रक्रियेसाठी वेळ घेतला असल्याचं त्यांनी
स्पष्ट केलं. मुख्यमंत्रीपदाची शपथ लपून-छपून घेतली जाते, याची महाराष्ट्राच्या इतिहासात
काळ्या अक्षरात नोंद होईल असंही ते म्हणाले. भाजप बहुमत सिद्ध करु शकणार नसून भविष्यात
महाविकास आघाडीचंच सरकार येईल असा दावाही त्यांनी केला. तर राज्यातल्या घडामोडींवरून
भाजप लोकशाहीचा मारेकरी असल्याचं सिध्द होत असल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते
रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद आणि गोपीनियतेची शपथ घेतल्यानंतर
राज्यात विविध ठिकाणी पक्ष कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नाशिक, उस्मानाबाद,
जालना, सांगली इथंही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मात्र सोलापूर इथं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं
दहन करत निषेध व्यक्त केला. वर्धा इथंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या
बैठकीत अजित पवार यांच्या निर्णयाचा निषेध केला.
जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असा एक
मुखी ठराव या बैठकीत पारीत करण्यात आला.
****
अवकाळी
पावसामुळे जळगाव जिल्ह्यात बाधित झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी केंद्रीय मंत्रालयाच्या
एका पथकानं आज पाहणी केली. या पथकानं शिरसोली, खेडगाव नंदी, भोरटेक, हिंगोणे खुर्द
शिवारातल्या शेतांमध्ये जाऊन सकाळी नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं आठशे कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालं असून असून शासनाकडून
जवळपास १८० कोटी ९८ लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं
अभिनंदन केलं आहे. दोन्ही नेते महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उत्तम काम करतील,
असा विश्वास देखील पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे. गृहमंत्री अमित शाह, रस्ते
वाहतूक मंत्री, नितीन गडकरी आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीदेखील नव्या सरकारला
शुभेच्छा दिल्या असून हे सरकार लोकांच्या कल्याणासाठी काम करेल, असा विश्वासही त्यांनी
व्यक्त केला आहे.
****
No comments:
Post a Comment