Thursday, 28 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.11.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी मुंबईत शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ, जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, द्रमुकचे अध्यक्ष एम के स्टॅलिन, यांचा समावेश आहे. याशिवाय राज्यभरातून ५०० शेतकरी या शपथविधी सोहळ्यास उपस्थित असतील.

दरम्यान, शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होणार असल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं सुरक्षेच्या मुद्यावरुन चिंता व्यक्त केली आहे. शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान आहे की मनोरंजनाचं, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकेवर काल सुनावणी घेताना न्यायालयानं, सार्वजनिक जागेवर असे कार्यक्रम घेण्याची प्रथा पडता कामा नये, असं म्हटलं. या कार्यक्रमाबद्दल काहीही बोलणार नसून, यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये, अशी प्रार्थना करत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
अमरावती जिल्ह्यात यंदाच्या शासकीय कापूस खरेदीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते करण्यात प्रारंभ आला. शेतकऱ्यांना कापूस वेचणी यंत्रासह इतरही साहित्य पुरवण्यात येईल, वेगवेगळ्या प्रयोगांसाठी शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासन सहकार्य करेल असं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.
****

गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या पन्नासाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या आशियातल्या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात विविध विषयांवरची तीस पेक्षा अधिक चर्चासत्रं झाली, तसंच विविध भाषेतले अनेक चित्रपट दाखवण्यात आले.
****

No comments: