Wednesday, 27 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.11.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****

 सामाजिक आणि आर्थिक विकासासोबतच उच्च शिक्षणात सुधारणा आवश्यक असल्याचं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ - फिक्कीच्या पंधराव्या उच्च शिक्षण परिषदेत बोलत होते. सातत्यानं सुधाराची प्रक्रिया राबवून आपली शिक्षण व्यवस्था २१ व्या शतकाला अनुकूल करण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही राष्ट्रपतींनी नमूद केलं.

 या तीन दिवसीय परिषदेत ७६ देशांचे साडे तीनशे प्रतिनिधी तसंच विविध शैक्षणिक संस्थाचे दीड हजारावर प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
****

 ई-सिगारेट्सवर बंदी घालणारं विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकानुसार ई-सिगारेट्सचं उत्पादन, खरेदी-विक्री, वाहतूक, साठा आणि जाहिरात करण्यावर देशात निर्बंध लावण्यात आले आहेत. या गुन्ह्यासाठी एक वर्षाची कैद आणि एक लाख रुपये पर्यंतचा दंड किंवा दोन्ही, अशा शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे.
****

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाजप सरकारला दिलेला पाठिंबा, याबाबत योग्य वेळ आल्यावर बोलू असं काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज विधान भवनात पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार यांच्या पाठिंब्यावर स्थापन झालेलं सरकार चौथ्या दिवशी कोसळलं, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.
****

 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचं नाव निश्चित होताच धुळे तसंच यवतमाळसह अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी आतिषबाजी, घोषणांसह मोठा आनंद व्यक्त केला. नाशिक इथंही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 अवकाळी पावसानं झालेल्या पीक नुकसानाच्या भरपाईसाठी राज्य सरकारकडून नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी एकशे तेवीस कोटी चौदा लाख तेवीस हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला होता. त्यातून जिल्ह्यातल्या एक लाख त्रेपन्न हजार आठशे बारा शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदानाचं वाटप करण्यात आलं आहे. आतापर्यंत नव्वद टक्के शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं मराठवाडा विभागातल्या शेतकऱ्यांसाठी ”सेंद्रीय शेती ”या विषयावर तीन दिवसांचा  सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्या अट्ठावीस तारखेला या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथे आदिवासी विभागाच्या वतीनं आयोजित, शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत. हिंगोलीचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं.
****

 महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना आणि औरंगाबाद जिल्हा व्हॉलीबॉल संघटना यांच्यातर्फे गंगापूर इथे राज्य युवा अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून येत्या एकोणतीस तारखेपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातल्या आठ विभागांचे एकशे ब्याण्णव खेळाडू, बत्तीस प्रशिक्षक आणि तीस पंच या स्पर्धेत सहभागी होणार असून केरळ राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा महाराष्ट्र राज्याचा संघ या स्पर्धेतून निवडण्यात येणार आहे.
****

 बँकॉक इथे सुरू असलेल्या एकविसाव्या आशियायी तीरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मा आणि ज्योतिसुरेखा वेण्णम या जोडीनं मिश्र दुहेरी प्रकारात आज सुवर्णपदक जिंकलं. या जोडीनं चिनी तैपेईच्या प्रतिस्पर्धी जोडीचा १५८-१५१ असा पराभव केला. या स्पर्धेत भारतानं एक सुवर्ण, दोन रजत आणि चार कांस्य पदकं जिंकली.
*****
***

No comments: