आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात
सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस
तिनही पक्षांच्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. शिवसेना
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी नेते आणि आमदारांची बैठक सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षांच्या नेत्यांची
बैठक होत आहे. काँग्रेस आमदारांची बैठक दुपारी विधीमंडळात होणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ
नेते अहमद पटेल, मल्लीकार्जुन खरगे आणि सचिव
वेणुगोपाल या बैठकीत सहभागी होणार असून यावेळी पक्षाच्या विधीमंडळ नेत्याची
निवड होणार आहे. तीनही पक्षांच्या स्वतंत्र बैठका झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ
नेत्यांची एकत्रित बैठक होण्याची शक्यता आमच्या वार्ताहरानं व्यक्त केली आहे.
****
शिवसेना,
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार स्थापन होईल तेंव्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री
होईल, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी
बोलत होते. भाजपनं शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायला मान्यता दिली असल्याच्या
वृत्ताबद्दल विचारलं असता त्यासाठीची वेळ आता संपली असल्याचं ते म्हणाले. इंद्र देवाचं
सिंहासन जरी देऊ करण्यात आलं तरी शिवसेना भाजपच्या बाजुनं जाणार नाही, असंही त्यांनी
यावेळी नमुद केलं. राज्यातील जनतेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेलं
पहायचं आहे, असं त्यांनी म्हटलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आजच राज्यपालांची
भेट घेणार का, असं पत्रकारांनी विचारलं असता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना
राज्यपालांना भेटण्याची गरज काय, असंही संजय राऊत म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा देण्यास विमा कंपन्या तयार
होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा रोष आपलं सरकार सेवा केंद्र चालकांना भोगावा लागत आहे.
सदर विमा कंपनीची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि शेतकऱ्यांच्या रोषापासून
सर्व आपलं सरकार सेवा केंद्र चालकांना संरक्षण द्यावं, अशी मागणी हिंगोली जिल्ह्यातल्या
या केंद्रांच्या चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
****
No comments:
Post a Comment