Friday, 29 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.11.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्यात आज नवी दिल्ली इथं हैदराबाद हाऊसमधे चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याचे मार्ग तसंच सहकार्याच्या विविध क्षेत्रांबाबत उभय नेत्यांमधे यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. राजपक्षे त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी राजपक्षे काल संध्याकाळी नवी दिल्लीला पोचले. राष्ट्रपती भवनात त्यांचा स्वागताचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
****
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी काल समन्स बजावले आहेत.  विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्हेगारी खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी दाखल याचिकेप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या निवाससस्थानी हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती सदर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. एक स्थानिक वकील सतीश उके यांनी या संदर्भातील याचिका दाखल केली आहे. स्थानिक न्यायालयानं ही याचिका रद्द करण्याचा दिलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं ग्राह्य ठरवला होता तथापि, सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भातील याचिकेवर कारवाईचे निर्देश दिले आहेत.  फडणवीस यांच्याविरुद्ध फसवणूक आणि बनवेगीरीप्रकरणी १९९६ आणि १९९८मध्ये गुन्हे नोंदवण्यात आले होते पण आरोपपत्र दाखल झालं नव्हतं. फडणवीसांनी ही माहिती दडवल्याचं उके यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
****
मुंबई - पुणे महामार्गावर आज पहाटे एका भीषण अपघातात चार जण जागीच ठार  झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. एका मोटारीनं टँकरला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना पनवेल इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
अकोला इथल्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे "कृषि अभियांत्रिकी- कृषि आधारित स्वयंरोजगार निर्मितीद्वारे शेतकरी सेवेतील पन्नास वर्षे" या विषयावर आज आणि उद्या, दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजीत केली आहे. अकोला कृषी महाविद्यालयामध्ये आज या परिषदेचं उदघाटन झालं.
****


No comments: