Thursday, 28 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.11.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -२८ नोव्हेंबर २०१दुपारी .०० वा.
****
भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी कारवाईचे संकेत भाजप कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिले आहेत. ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. ठाकूर यांचं वक्तव्य तसंच विचारधारेचं भाजप कधीही समर्थन करत नसल्याचं नड्डा यांनी सांगितलं. ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीवरून हटवलं जाईल, तसंच संसदेच्या या सत्रात त्यांना संसदीय पक्षाच्या बैठकीत सहभागाची परवानगी नसेल, असंही नड्डा यांनी सांगितलं.

ठाकूर यांनी काल लोकसभेत केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ आज विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी या प्रकरणी ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यासह या मुद्यावर सदनात चर्चेची मागणी केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही मागणी फेटाळून लावताच, काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेससह इतर सदस्यांनी या मुद्यावरून सभात्याग केला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या या वक्तव्याचा निषेध करत, ठाकूर यांच्या विचारधारेचा निषेध केला. महात्मा गांधी हे देशाचे आदर्श होते, आणि राहतील, असं राजनाथसिंह यांनी नमूद केलं.
राज्यसभेतही या मुद्यावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी या विषयावरून स्थगन प्रस्ताव दिले होते, सभापती व्यंकय्या नायडू यांनी हे प्रस्ताव फेटाळून लावत नियमित कामकाज सुरू ठेवलं.
****
ग्रामीण कारागीरांचा विकास हे सरकारचं ध्येय असल्याचं सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे, ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी चीन मधुन येणाऱ्या बांबूच्या वस्तुंवर ३० टक्के आयात कर लावला असून, चारशे रेल्वे स्थानकांवर कुल्हड बंधनकारक करण्यात आल्याचं, गडकरी यांनी सांगितलं. मध उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात येत असून, साखरेप्रमाणे मधाचे स्फटिक तयार करण्यात येत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
****
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा वाढवाव्यात, अशी मागणी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. ते लोकसभेत शून्यकाळात बोलत होते. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या पुरेशा शाखा नाहीत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याही अनेक शाखा बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना विमा रक्कम भरण्यासह इतर बँक व्यवहार करण्यात अडचणी येतात, याकडे चिखलीकर यांनी लक्ष वेधलं.
****
आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना जामीन देण्यास अंमलबजावणी संचालनालय - ईडीने विरोध दर्शवला आहे. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, चिदंबरम हे न्यायालयीन कोठडीत असूनही महत्त्वाच्या साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं ईडीने न्यायालयाला सांगितलं. या गैरव्यवराशी संबंधित बारा बँक खाती तपास यंत्रणांना आढळली असून, विविध देशांमधल्या बारा अचल संपत्तीची माहितीही मिळाली असल्याचं, ईडीनं न्यायालयाला सांगितलं.
****
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येऊ नये, यासाठी भारतीय जनता पक्षाने लोकशाहीची कुचेष्टी केल्याचं, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्या आज दिल्लीत काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होत्या. या संदर्भात राज्यपालांची भूमिकाही निंदनीय असल्याची टीका गांधी यांनी केल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी मुंबईत शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ, जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
****
भंडारा इथं आज अतिरिक्त जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते बालकामगार प्रथेविरुध्द जनजागृती अभियानाचं उदघाटन करण्यात आलं. कामगार आयुक्त कार्यालयातल्या  अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कृतीदलातर्फे विविध ठिकाणचे वीटभट्टी मालक तसंच विविध आस्थापनांची तपासणी करुन बालकामगार विरुध्द माहितीपत्रक देण्यात आली. तसंच हमीपत्र लिहून घेत जनजागृती करण्यात आली.
****
वाशिम जिल्ह्यात रबी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. गहू आणि हरभरा पिकांची चांगली वाढ झाली असल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला निफाड तालुक्यात नांदूर मधमेश्वर इथं देश विदेशातून १८ हजारांहून अधिक पक्षी दाखल झाले आहे.
****


No comments: