Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –21 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्यात
सरकार स्थापन करण्यासंदर्भातली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यानच्या
चर्चेची आणखी एक फेरी आज दिल्लीत पूर्ण झाली. यात पूर्ण एकमत झालं असल्याची माहिती
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांना दिली आहे. या संदर्भातली पुढली
चर्चा उद्या मुंबईत होणार आहे. निवडणुकीपुर्वी आघाडीत असलेल्या पक्षांशी चर्चा आपण
करू, त्यांना आतापर्यंतच्या चर्चेची माहिती दिली जाईल, असं त्यांनी नमुद केलं. या चर्चेनंतर
शिवसेनेशी संयुक्त चर्चा केली जाईल आणि ती बोलणी पूर्ण झाल्यानंतरच सरकार स्थापनेसंदर्भात
जे निश्चित होईल, त्याचा तपशील माध्यमांना दिला जाईल, असंही चव्हाण यांनी यावेळी नमुद
केलं.
****
तत्पूर्वी, काँग्रेसची सर्वोच्च समिती म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या कार्यकारी समितीनं एका बैठकीमध्ये शिवसेनेशी हातमीळवणी करण्याला मान्यता दिली.
पक्ष प्रमुख सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. दरम्यान, सरकार स्थापनेसंदर्भातला
सूक्ष्म तपशील उद्यापर्यंत निश्चित होणार असल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची काल दिल्लीत प्रदीर्घ बैठक
झाल्यानंतर राज्यात स्थीर सरकार स्थापन करण्याबाबतचा विश्र्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी व्यक्त केला, त्यावेळी हे पक्ष परंपरागत प्रतिस्पर्धी शिवसेनेशी हातमिळवणी
करतील असे स्पष्ट संकेत देण्यात आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध
नेत्यांनी प्रशासनातील किमान समान कार्यक्रमाला अंतिम स्वरुप देण्यासाठी आज दुपारी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. काँग्रेसचे
नेते अहमद पटेल, जयराम रमेश आणि मल्लीकार्जुन खरगे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि नवाब मलिक आदी या बैठकीत सहभागी
झाले. राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी हातमिळवणी केल्याची औपचारिक घोषणा हे
तिनही पक्ष उद्या करण्याची शक्यताही पीटीआय वृत्तसंस्थेनं व्यक्त केली आहे. राज्यात
सरकार स्थापनेसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचं हे तिनही पक्ष नंतर स्वतंत्र
पत्राद्वारे राज्यपालांना कळवतील.
****
राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात तिनही पक्षांचा निर्णय
येत्या एक ते दोन दिवसांत होईल, अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही आज दिली
आहे. येत्या तीस नोव्हेंबर रोजी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचं
मतदान होणार असून त्या आधी राज्यात सरकार स्थापन होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या
एका नेत्यानं दिली.
****
शेतकऱ्यांवर ओढावलेल्या अस्मानी संकटाला तोंड देण्यासाठी
आणि त्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी राज्यात सरकार स्थापन होणं गरजेचं असल्याचं मत
सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सव उद्घाटन प्रसंगी
बोलत होते. औरंगाबाद शहरात कलावंत घडवणाऱ्या संत एकनाथ रंगमंदिराचं लवकरात लवकर नुतनीकरण
व्हावं, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अभिनेते शंतनू गंगणे, कुलगुरू डॉ.
प्रमोद येवले यावेळी उपस्थित होते.
****
राज्यातल्या साखर कारखान्यांमधे उद्यापासून
गाळप सुरु करायला, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
यांनी परवानगी दिली आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडून गाळप परवाना न घेता गाळप करणाऱ्या
कारखान्यांना दंड ठोठावण्याची सूचना राज्यपालांनी केली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या तेवीस साखर कारखान्यांचे परवाने रास्त
हमीभाव न दिल्यानं स्थगित करण्यात आले आहेत. गाळप परवान्यासाठी अर्ज केलेल्यांपैकी
नव्व्याण्णव कारखान्यांना
साखर आयुक्त कार्यालयानं आतापर्यंत परवानगी दिली आहे.
****
उस्मानाबाद तालुक्यातल्या तेर इथल्या रामलिंग अप्पा
लामतुरे पुराणवस्तू संग्रहालयाला एक्क्वावन्न वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त घेण्यात आलेल्या
तगर महोत्सवात आज वारसा फेरी झाली. या फेरीत शाळकरी विद्यार्थी संत गोरोबा कुंभार यांच्या वारकरी संप्रदायाचा वारसा
मांडत सहभागी झाले होते.
****
ठाणे महानगरपालिकेच्या
महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के तर उपमहापौर पदी पल्लवी कदम यांची आज
बिनविरोध निवड झाली आहे.
****
No comments:
Post a Comment