Saturday, 30 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.11.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० नोव्हेंबर २०१सकाळी ७.१० मि.
****

Ø  राज्य विधानसभेचं आजपासून दोन दिवसाचं अधिवेशन; महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर आज विश्वासदर्शक ठराव
Ø  विकास कामं करतांना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे लक्ष देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
Ø  मुंबईतल्या आरे मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती
Ø  पथकर भरणीसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या फास्टटॅग संलग्नीकरणाला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
आणि
Ø  कामात कसून केल्याच्या कारणावरून अंबडच्या तहसीलदार मनिषा मेने निलंबित
****

 राज्य विधानसभेचं दोन दिवसाचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आज विश्वासदर्शक ठरावाला सामोर जाईल. आज दुपारच्या सत्रात विधानसभेत हा विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल.  या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांनी काल आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. अधिवेशन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री नव्या मंत्रीमंडळाचा परिचय करून देतील, त्यानंतर विश्वसादर्शक ठराव मांडला जाईल. हा ठराव मंजूर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम घोषित केला जाईल. उद्या अध्यक्षाची निवडणूक होईल. सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे.    

 दरम्यान,  विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये १६ ते २१ डिसेंबर दरम्यान घेण्यात येणार असल्याचं विधीमंडळ सूत्रानं सांगितलं. 
****

 विकास कामं करतांना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात काल पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह विविध विभागाचे सचिव यावेळी उपस्थित होते. सेवाभावनेनं कामं केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येईल. सरकार माझं आहेअशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचं, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा, जनसेवेसाठी पारदर्शक आणि स्वच्छ कारभारावर लक्ष द्यावं, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  प्रगतीचे उद्दिष्ट गाठण्यास शासन यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
****

 विधीमंडळ वार्ताहर संघटनेकडून मुख्यमंत्र्यांचा काल सत्कार करण्यात आला, या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, राज्याचं मुख्यमंत्रिपद हे आपल्यासमोर एक आव्हान असून, पत्रकारांनी प्रश्र्न मांडताना ते सोडवण्यासंदर्भातही मार्गदर्शन करावं, असं आवाहन केलं. आपलं सरकार जनतेशी नम्रपणे वागेल तसंच जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही, यावर आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. महागाई, टंचाई आणि भ्रष्टाचार ही राज्यासमोरची आव्हानं असून त्यांचा सामना करायचा ते म्हणाले.

 दरम्यान, मुंबईत आरे इथल्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पूर्ण कामाचं परीक्षण केल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी जाहीर केलं
****

 राष्ट्रीय महामार्गांवर पथकर भरणीसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांना फास्टटॅग संलग्नीकरणाला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उद्या एक डिसेंबरपासून महामार्गांवर फक्त फास्टटॅग द्वारे पथकर वसुलीची घोषणा परिवहन मंत्रालयानं केली होती. मात्र नागरिकांच्या सोयीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली. पंधरा डिसेंबरपर्यंत फास्टटॅग मोफत मिळणार असून, त्यानंतर मात्र दुप्पट शुल्क आकारलं जाणार आहे. माय फास्टटॅग ॲपवर याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
****

 शासनाकडून धोरणात्मक पाठबळ मिळालं तर शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढता येईल, असा आशावाद परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक ढवण यांनी व्यक्त केला आहे. महाॲग्रो या सहाव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला कालपासून औरंगाबाद इथं प्रारंभ झाला. या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. शेती आणि शेतकरी सध्या मान्सून आणि मार्केट या दुष्टचक्रात अडकला असल्याची खंत डॉ ढवण यांनी यावेळी व्यक्त केली.

 शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या जातील, तो सोन्याचा दिवस ठरेल, असं मत महापौर महापौर नंदकुमार घोडेले, यांनी व्यक्त केलं, तर मराठवाड्यातल्या तीस अविकसित तालुक्यात कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग उभारण्यावर प्राधान्य असल्याचं डॉ कराड यांनी सांगितलं.

 या उद्घाटन समारंभात, मराठवाड्यातल्या आठ प्रगतीशील शेतकऱ्यांना बॅरिस्टर जवाहर गांधी कृषी पुरस्कार प्रदान करण्यात आले. दोन डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात पीक प्रात्यक्षिक तसंच आधुनिक शेती औजारं पाहता येणार आहेत, शेती संबंधीत विविध विषयांवर चर्चासत्रं ही या प्रदर्शनात होणार आहेत.
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 कामात कसून केल्याच्या कारणावरून अंबडच्या तहसीलदार मनिषा मेने यांना निलंबित करण्यात आलं आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काल निलंबन आदेश जारी केले. मेने यांनी, अवैध वाळू वाहतुक रोखणे, दुष्काळी अनुदान वाटप तसंच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वाटप या कामात कसूर केल्याचा अहवाल जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
****

 तरुण साहित्यिकांनी भयमुक्त साहित्य निर्माण करणं आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ नाटककार तथा ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केलं आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा काल समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात कृषी, साहित्य, संगीत आणि युवा या क्षेत्रातल्या चार गुणवंतांचा यावेळी यशवंतराव चव्हाण पुरस्कार देवून गौरवण्यात आलं. यामध्ये प्रसिद्ध पखवाजवादक उद्धवबापू आपेगावकर, देगलूरचे ज्येष्ठ साहित्यिक बाबू बिरादार, हिंगोलीचे कृषी उद्योजक रामेश्वर मांडगे, नांदेडचे पत्रकार संदीप काळे यांचा समावेश आहे.
****

 लातूर इथं  जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय पाणी परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. पाणी बचत आणि पाण्याचा अपव्यय याबाबत जाणीव-जागृती, आणि नागरिक जलसाक्षर व्हावेत, या उद्देशानं ही पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे. शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये आयोजित या परिषदेसाठी लातूर शहरातल्या गंजगोलाई भागातून मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
****

 जालना जिल्ह्यातले दोन लाख नव्वद हजार नऊशे बत्तीस शेतकरी `प्रधानमंत्री किसान सन्मान निधी` योजनेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मिळवून एकशे सहा कोटी एकोणसत्तर लाख शेहचाळीस हजार रुपयांचं अनुदान जमा करण्यात आलं आहे. लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या `पीएम किसान पोर्टलवर` अद्ययावत करण्यात येत असून, अनुदान रक्कम लवकरच त्यांच्या खात्यांवर जमा केली जाईल, असं जालना जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****

 परभणी जिल्यातल्या तहसील कार्यालयात केंद्र सरकारच्या भारतनेट या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्याला जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. राज्य माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाद्वारे परभणी जिल्हातली चार तहसील कार्यालयं आणि त्याअंतर्गत येणाऱ्या चारशे अठ्ठावीस ग्रामपंचायती, ऑप्टीकल फायबर नेटवर्कनं जोडण्यात येणार आहेत.
****

 मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं जालना जिल्ह्यातलं तीस टक्के काम पूर्ण झालं आहे. या टप्प्यात या मार्गावरच्या नियोजित १०६ पुलांपैकी ५२ पुलांची उभारणी झाली असून, उर्वरित काम सुरू असल्याचं, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. या कामांवर आतापर्यंत साडे तीनशे कोटी रुपये खर्च झाल्याची माहितीही या कार्यालयाकडून देण्यात आली.
****

 कापूस पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात पाथरी तसंच गंगाखेड इथं सोमवारपासून केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदी सुरू होणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कापूस शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असं आवाहन कापूस पणन महासंघाचे परभणी विभागाचे संचालक पंडितराव चोखट तसंच विभागीय व्यवस्थापक ए.डी.रेणके यांनी केलं आहे.
****

 परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं काल एका रस्ता अपघातात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख भाऊसाहेब जामगे यांचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. परळीहून गंगाखेड कडे येणाऱ्या जामगे यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाला असावा, असं पोलिसांकडून सांगण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं शहरात दोन डिसेंबर ते मार्च २०२० पर्यंत केंद्र शासनाची विशेष इंद्रधनुष्य मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. महानगरपालिकेल्या २९ आरोग्य केंद्र आणि पाच रूग्णालयत आणि छावणी नगरपरिषदेचा एक असे एकूण ३५ आरोग्य केंद्रात ही मोहिम चार टप्प्यात राबवण्यात आहे. नागरिकांनी या मोहिमे दरम्यान नजीकच्या लसीकरण सत्राच्या ठिकाणी लसीकरण करून घेण्याचं आवाहन महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केलं आहे.
*****
***

No comments: